कोरोनासंबंधांच्या साहित्य खरेदीसाठी 25 कोटी मंजूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनासंबंधांच्या साहित्य खरेदीसाठी 25 कोटी मंजूर

कोरोनासंदर्भातील आवश्यक साहित्य व साधनांच्या खरेदीसाठी, तसेच जम्बो हॉस्पिटलमधील सुविधांसाठी वर्गीकरणाद्वारे 25 कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली.

मानवतावादी दूरदृष्टी
राजधानीत प्रशासन-सरकारमधील विरोधाभास
निर्बंध शिथिल करा अन्यथा उपोषण; महाबळेश्‍वर येथील व्यापार्‍यांचा इशारा

पुणे/प्रतिनिधीः कोरोनासंदर्भातील आवश्यक साहित्य व साधनांच्या खरेदीसाठी, तसेच जम्बो हॉस्पिटलमधील सुविधांसाठी वर्गीकरणाद्वारे 25 कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर खासगी संस्थेमार्फत चालविण्यात येणार्‍या खाटांसाठीच्या हेल्पलाइनच्या कामासाठीच्या खर्चाला; तसेच जम्बो हॉस्पिटल व बाणेर येथील कोव्हिड हॉस्पिटलसाठीच्या अतिरिक्त खर्चालाही मंजुरी देण्यात आली. 

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाबाधितांवरील उपचार व सीओईपी येथे उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी वर्गीकरणाद्वारे 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. वैद्यकीय उपचार साधने, मुखपट्या, विलगीकरणातील नागरिकांसाठी जेवण व आवश्यक सुविधा, तसेच दवाखान्यांमध्ये आवश्यक यंत्रणा, देखभाल दुरुस्तीची कामे, नव्या हॉस्पिटलची निर्मिती, पोर्टेबल स्वच्छतागृह, वाहतूक व्यवस्था, तसेच जम्बो हॉस्पिटलसाठी येणारा खर्च यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

2021-22 या आर्थिक वर्षात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्य केलेल्या 146 कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी 10 कोटी, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मंजूर 105 कोटी रुपयांपैकी पाच कोटी, तर इलेक्ट्रिक बसखरेदीसाठी मान्य झालेल्या 35 कोटी रुपयांपैकी दहा कोटी रुपये अशा एकूण 25 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाला स्थायी समितीने मान्यता दिली. सीओईपी येथील जम्बो हॉस्पिटलसाठी तीन कोटी रुपये, तर बाणेर येथील कोव्हिड हॉस्पिटलसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यासही स्थायी समितीने मंजुरी दिली. गंभीर कोरोनाबाधितांसाठी खाटांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी महापालिकेने हे काम ’आय हिल वेल’ (इंडो हेल्थ सॉफ्टवेअर सोल्युशन्स) या कंपनीला दिले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने महापालिकेने खासगी रुग्णालयांतील खाटाही ताब्यात घेतल्या आहेत. यासाठी केंद्रीय खाट व्यवस्थापन प्रणाली कक्ष व हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ही संस्था शहरातील एकूण 55 खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून, गंभीर कोरोना रुग्णांची माहिती एकत्र करीत आहे. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व वाढीव फोन लाइन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत ही कंपनी खाटा व्यवस्थापनाचे काम करील. यासाठी या कंपनीला दरमहा 15 लाख 75 हजार रुपये मोबदला देण्यास मंजुरी देण्यात आल्याचे, रासने यांनी सांगितले.

कर्करोगावर आधुनिक उपचार सुविधा

विविध प्रकारच्या कर्करोगावरील उपचारांसाठी लिनिअर अ‍ॅक्सलेटर रेडिओथेरपी सुविधा लवकरच पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. सध्या ही सुविधा मोजक्याच खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. महापालिकेतर्फे खासगी संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारण्यात येईल. त्यासाठी महापालिका 14 कोटी 80 लाख रुपये देणार आहे, तर उर्वरित 21 कोटी रुपयांची रक्कम संस्था किंवा कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात येणार आहे. याची देखभाल दुरुस्ती, वेतन आदी खर्च संबंधित संस्था करणार आहे. नागरिकांना केंद्र सरकारी कर्मचार्‍यांसाठीच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरानुसार ही सुविधा उपलब्ध होईल. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला आहे, असे रासने यांनी सांगितले. 

COMMENTS