अहमदनगर/प्रतिनिधी : कोपरगांव येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक भरत चिंतामणी नागरे यांना सन 2018 मध्ये नक्षलवादी कारवायांचा खात्
अहमदनगर/प्रतिनिधी : कोपरगांव येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक भरत चिंतामणी नागरे यांना सन 2018 मध्ये नक्षलवादी कारवायांचा खात्मा करण्यासाठी केलेल्या शौर्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार लवकरच राज्यपाल यांच्या हस्ते त्यांना बहाल करण्यात येणार आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक भरत नाररे हे 2018 पासून कार्यरत आहेत. त्याआधी तेे औट पोस्ट कोटमी या ठिकाणी प्रभारी पीएसआय असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी आली. नागरे यांना इटापल्ली तालुक्यातील मेंढरी या ठिकाणी नक्षलवादी दबा धरुन बसलेले असून ते काही घातपाती कारवाया करणार असल्याची पक्की खबर मिळाली. त्या खबरीनुसार नागरे यांच्या नेतृत्वाखाली 40-45 जणांचा पोलिस फौजफाटा मेंढरी या ठिकाणी जावून धडकला. त्या ठिकाणी संपूर्ण घनदाट जंगल होते व अशा जंगलात नक्षलवाद्यांना हुडकणे हे एक धाडसाचे काम होते. पोलीस आपल्या मागावर आहेत याची कुणकुण नक्षलवाद्यांना लागताच पोलीस ताफ्याच्या मार्गावर नक्षलवाद्यांनी स्फोटक बॉम्ब पेरुन ठेवले. पण त्यापैकी चार बॉम्ब नागरे यांच्या पथकाने निकामी केले. हे बॉम्ब निकामी केल्यानंतर दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांना शरण येण्याचे अगोदर आवाहन करण्यात आले, परंतु त्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी त्यांच्या दिशेने कूच केले, पण नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरु झाल्यानंतर नागरे यांच्या पथकाने त्याला गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. त्यात एक नक्षलवादी ठार झाला. ही घटना 25 मार्च 2018 रोजी घडली. नागरे यांच्या या शौर्याची दखल केंद्र सरकारच्या गृह खात्याने घेतली व या शौर्याबद्दल ते राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरले. नागरे यांना 2018 मध्ये पोलीस खात्याचा खडतर सेवा पुरस्कार मिळाला असून 2019 मध्ये त्यांना विशेष सेवा पुरस्कार मिळाला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस निरीक्षक वासुदेव देसलेंसह अन्य अधिकार्यांनी नागरे यांचे अभिनंदन केले.
COMMENTS