कृष्णाचे ते 820 सभासद मतदानास पात्र ; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल : सत्ताधारी भोसले गटाला दणका

Homeमहाराष्ट्रसातारा

कृष्णाचे ते 820 सभासद मतदानास पात्र ; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल : सत्ताधारी भोसले गटाला दणका

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानास पात्र ठरलेल्या 820 सभासदांना पुन्हा अपात्र करण्यासाठी सत्ताधारी भोसले गटाने कृष्णा कारखान्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवार, दि.25 जून रोजी फेटाळून लावली आहे.

कौंडिण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या माहेरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
३ मिनटात जाणूनघ्या दिवसभरातील २४ ठळक बातम्या | सुपरफास्ट २४ | LokNews24

इस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानास पात्र ठरलेल्या 820 सभासदांना पुन्हा अपात्र करण्यासाठी सत्ताधारी भोसले गटाने कृष्णा कारखान्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवार, दि.25 जून रोजी फेटाळून लावली आहे. यामुळे अविनाश मोहिते यांनी सभासदांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवणे करता दिलेला लढा न्यायालयात यशस्वी ठरला असून या निवडणुकीत वादग्रस्त ठरलेले 820 सभासद मतदानास पात्र ठरल्यामुळे सत्ताधारी भोसले गटाला फार मोठा धक्का बसला आहे.
याबाबत मुंबई उच्च न्यायालयात संस्थापक पॅनेलच्यावतीने 820 सभासदांचे कामकाज पाहणारे अ‍ॅड. प्रभंजन गुजर यांनी दिलेली माहिती अशी की, य. मो. कृष्णा कारखान्याने मतदानास अपात्र ठरवलेल्या 820 सभासदांना मंत्री महोदय बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयात पात्र ठरवण्यात आले होते. याबाबत सत्ताधारी भोसले गटाने कृष्णा कारखान्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी साठी अंतिम तारीख 25 जुन नेमली होती. आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सत्ताधारी भोसले गटाने 820 सभासदांना अपात्र करणेकामी दाखल केलेली याचिका फेटाळून लावून सर्वांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार अबाधित ठेवला असल्याचे सांगितले. सदरील सर्व सभासद या निवडणुकीत मतदानास पात्र राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सन 1999 च्या निवडणुकीत 13 हजार 528 सभासदांच्या अपात्रतेबाबतचा मुद्दा न्यायालयीन लढाईत भोसले यांच्या बाजूने गेला होता. तसेच 2015 च्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर संस्थापक पॅनेलने केलेली याचिका अद्याप प्रलंबित आहे. 820 सभासदांच्या अपात्रतेबाबत भोसले यांनी गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन हेलपाटे सुरू ठेवले होते. मात्र, अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अपात्र सभासदांची बाजू मांडल्यामुळे पहिल्यांदाच भोसले यांना न्यायालयीन लढाईत पराभवास सामोरे जावे लागले आहे. 820 मते निर्णायक ठरण्याची शक्यता असून याचा मोठा फटका भोसले गटाला बसण्याची शक्यता आहे.
पात्र ठरलेल्या सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सिनियर कौन्सिल वाय. एस. जहागीरदार यांनी कामकाज पाहिले. त्यांना अ‍ॅड. सुरेल शाह व अ‍ॅड. प्रभंजन गुजर यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाच्या वतीने माजी महाधिवक्ता विजयसिंह थोरात यांनी कामकाज पाहिले.


आता जनतेच्या न्यायालयात पराभव : अविनाश मोहिते
पैशाच्या जोरावर सभासदांच्या मतदानाचा हक्क डावलू पाहणार्‍या सत्ताधारी भोसले गटास न्यायालयाने खुप मोठी चपराक लगावली असून आजपर्यंत पहिल्यांदाच त्यांचा न्यायालयीन लढाईत पराभव झाला आहे. आता 29 तारखेला सभासद त्यांना जनतेच्या न्यायालयात पराभूत करणार आहेत.
       -अविनाश मोहिते


COMMENTS