देवळाली प्रवरा/प्रतिनिधी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी कुंडल येथील छोट्या गोपालक कु. राजवीर स्मिता रविंद्र
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी कुंडल येथील छोट्या गोपालक कु. राजवीर स्मिता रविंद्र लाड यांच्या घरी खास करून भेट देऊन खिलार, कोकण कपिला या त्याच्या लाडक्या गाईची पाहणी केली.
गेल्या आठवड्यामध्ये सकाळ अॅग्रोवन यांनी गोधन विशेषांक सादर केला. त्यामध्ये देशी गाईंचे महत्त्व नमूद केले. सदर पुरवणी अंकामध्ये डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषि महाविद्यालय, पुणे यांनी गोपर्यटनावरती एक लेख लिहिला होता व त्या लेखाच्या शिर्षकामध्ये या छोट्या गोपालकाचा फोटो पाहिला होता.
स्वतः कृषि विद्यापीठाचे कुलगुरू यांनी सदर गोपालकाची पूर्ण माहिती काढून स्वतः ते भेटीला गेले. खरंतर देशी गाईंचे संवर्धन करण्यासाठी लहानपणापासूनच असे छोटे गोपालक तयार झाले तर नक्कीच देशी गोपालनाला सोनेरी दिवस येऊन पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशी गोपालन फक्त दुधापुरते मर्यादित नसून ती आपली संस्कृती आहे व कुटुंबाचे आरोग्य, जमिनीचे आरोग्य व निसर्गाचा समतोल राखण्याचे काम देशी गाई करत आहे.
कृषि महाविद्यालय, पुणे येथे देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्र अंतर्गत विविध देशी गाईंचे संशोधन व प्रशिक्षण कार्य विद्यापीठाने हाती घेतलेले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परिसरातील शेतकरी गोपालकांना त्याचा नक्कीच लाभ होणार आहे. तसेच दुधाच्या देशी गाईंबरोबर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या खिलार गाईंचे सुद्धा संवर्धन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले.
COMMENTS