मुंबई, दि. ७ : अकोला जिल्ह्यातील कुटासा येथे इको टुरिझम विकसित करण्याच्या प्रस्तावाला तात्काळ गती द्यावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. आमदार अमोल मिटकरी यांनी ‘कुटासा इको टुरिझम’ होण्याबाबत आग्रह धरला आहे. मंत्रालयात श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या अनुषंगाने झालेल्या बैठकीस मिटकरी यांच्यासह वनविभागाचे उपसचिव गजेंद्र नरवने उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, यवतमाळचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता आदी उपस्थित होते.
कुटासा हे एक ऐतिहासिक ठिकाण असून पुरातन मिठागराच्या विहिरी, ऐतिहासिक तलाव, जुने हेमाडपंती मंदीर आहे. यांचा विकास झाल्यानंतर पर्यटनवृद्धी आणि तेथील स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. तलावातील गाळ काढणे, खोलीकरण, मिठागरांच्या विहीतून गाळ काढून पुनूरुज्जीवन करणे, मंदिर विकास या कामांचा विस्तृत कार्य अहवाल लवकरात लवकर मंजूर करावा, असे निर्देश श्री. भरणे यांनी दिले. या परिसरात वृक्ष आच्छादन चांगले असून वनांच्या वाढत्या विस्तारामुळे वन्यजीव शेतात येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यासाठी वनक्षेत्राला काटेरी कुंपण तात्काळ करावे, अशी मागणी श्री. मिटकरी यांनी केली. त्यांनी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कुंपण करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याबाबत निर्देश दिले.
COMMENTS