काँग्रेसच्या पुढाकाराने बारामतीत ओबीसींचा एल्गार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसच्या पुढाकाराने बारामतीत ओबीसींचा एल्गार

येत्या 29 ला राज्यातील पहिला मेळावा होणार, जिल्ह्यातूनही कार्यकर्ते नेण्याचे नियोजन सुरूअहमदनगर/प्रतिनिधी- केंद्र सरकारने सरकारी कंपन्या व संस्थांचे

विखे-जगतापांना फाईट देणार आता लंके – काळे; एकमेकांना ताकद दिली जाणार, नगर दक्षिणेच्या राजकारणात येणार रंगत
मनपा निवडणुकीची काँग्रेसने सुरू केली आतापासून तयारी
आमदारांमुळे शहराची दुरवस्था; काळे यांचा आरोप; आसूड मोर्चाचा दणदणाट

येत्या 29 ला राज्यातील पहिला मेळावा होणार, जिल्ह्यातूनही कार्यकर्ते नेण्याचे नियोजन सुरू
अहमदनगर/प्रतिनिधी- केंद्र सरकारने सरकारी कंपन्या व संस्थांचे खासगीकरण सुरू केल्याने ओबीसींच्या नोकर्‍या गेल्या आहेत व दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाने ओबीसींचे रााजकीय आरक्षणही रद्द झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रदेश काँग्रेसने ओबीसींचे संघटन हाती घेतले असून, राज्यातील पहिला ओबीसींचा मेळावा येत्या 29 जुलैला राष्ट्रवादी व ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बारामतीमध्ये घेतला जाणार आहे. या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातूनही काँग्रेस ओबीसी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी शुक्रवारी नगरला भेट देऊन 29 जुलैच्या बारामती मेळाव्याचे नियोजन केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांचे स्वागत केले. ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, अनंत गारदे, अनिस चुडीवाला, सय्यद खलील यांच्यासह जरीना पठाण, मंगल भुजबळ, प्रवीण गीते, कौसर खान, उषा भगत, अजय मिसाळ, रिजवाना पटेल आदींसह अन्य उपस्थित होते.

बारामतीत लाखाचा मेळावा
यावेळी ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बारामतीमध्ये स्थानिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे 29 रोजी मेळावा होणार असून, राज्यभरातून 1 लाखावर ओबीसी कार्यकर्ते या मेळाव्यास येणार आहेत, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा करण्याचे व राज्यात 150पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट काँग्रेसचे असल्याने ओबीसी, मागासवर्गीय, मुस्लिम व अन्य समाजघटकांचे संघटन हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात बारामतीच्या मेळाव्यात केली जाणार आहे. ओबीसींचे वाटोळे भाजपने केले असल्याने या मेळाव्यास उपस्थित राहणारांना त्याची वस्तुस्थिती सांगितली जाणार आहे, असे ते म्हणाले.

नोव्हेंबरमध्ये दिल्लीत आंदोलन
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने एकीकडे शासकीय नोकर्‍या व दुसरीकडे राजकीय आरक्षण गमावल्याने ओबीसींमध्ये भाजपबद्दल संतप्त भावना आहेत, असे सांगून माळी म्हणाले, ओबीसींच्या संख्येचा इम्पिरिकल डाटा केंद्र सरकारकडे असून तो जाणीवपूर्वक दिला जात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विचित्र संघटना असून, त्यांना आरक्षणमुक्त भारत करायचा असल्याने देशात नरेंद मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशभरातील आरक्षण संपवण्याचा घाट त्यांनी घातला आहे. पण येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत केंद्र सरकारने इम्पिरिकल डाटा दिला नाही तर त्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरवर ओबीसींचे आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठीची जनजागृती सुरू केली असून, राज्यभरात दौरे सुरू आहेत व ओबीसींमध्ये याबाबत जागृती केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ओबीसींमधील बारा बलुतेदारांनी स्वतंत्र चूल मांडण्याचे ठरवले असल्याबद्दल बोलताना माळी म्हणाले, बारा बलुतेदारांनी स्वतंत्र आरक्षण मागणी करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. बलुतेदारांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडख करून त्यांना आर्थिक ताकद देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याशिवाय ओबीसी महामंडळाचे 10 हजार कोटींचे बजेटही केले आहे. सारथी एवढेच महाज्योतीलाही आर्थिक संरक्षण मिळण्यासाठीही काँग्रेसचा पाठपुरावा सुरू आहे, असे ते म्हणाले.

दहशतीला प्रत्युत्तर देऊ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केला असल्याने नगरच्या महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. नगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना काहीजणांकडून दहशत केली जाते, पण यापुढे असे काही घड़ले तर त्याला जशास तसे उत्तर काँग्रेसकडून दिले जाईल, असा इशाराही माळी यांनी कोणाचेही नाव न घेता दिला. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी नसताना काँग्रेसच्या माध्यमातून लोकांची कामे करण्यास पुढाकार घेणारांनी स्वतःला आवर घालावा. काँग्रेस हीच ताकद आहे व तिच्या माध्यमातूनच काम करावे, नाहीतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS