कर्नाटकातील अंतर्कलह

Homeसंपादकीय

कर्नाटकातील अंतर्कलह

भारतीय जनता पक्ष कायम स्वतःला ’पार्टी वुईथ डिफरन्स’ असे समजत होती; परंतु पक्षाचा विस्तार करताना तो प्रवाहपतीत झाला आहे. इतर पक्षांच्या नेत्यांना सामावून घेताना त्यांचे गुणदोषही या पक्षात आले आहेत.

सोयीचे राजकारण, मुखवट्याचे धोरण
एका नव्या युद्धाची नांदी
लोकायुक्तांमुळे भ्रष्टाचार संपेल का ?

भारतीय जनता पक्ष कायम स्वतःला ’पार्टी वुईथ डिफरन्स’ असे समजत होती; परंतु पक्षाचा विस्तार करताना तो प्रवाहपतीत झाला आहे. इतर पक्षांच्या नेत्यांना सामावून घेताना त्यांचे गुणदोषही या पक्षात आले आहेत. भाजपचे वर्णन आता ’पार्टी वुईथ डिफरन्सेस’ असे केले जात आहे. पश्‍चिम बंगालमध्ये मुकुल रॉय यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये परतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे 25-30 आमदार आणि दोन खासदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर आहेत. तिकडे त्रिपुरात 25 वर्षांची डाव्यांची राजवट मोडीत काढल्यानंतर आता तिथेही भाजपत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपला तिथे शिष्टमंडळ पाठविले आहे.  

राजस्थानात तर दुरावा वाढत चालला आहे. तिथे माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजपच्या फलकांवरचे वसुंधराराजे शिंदे यांचे छायाचित्र गायब करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्याविरोधात भाजपचेच आमदार आवाज उठवित आहे. भाजपने मुख्यमंत्री आणि खासदार होण्यासाठी जी वयाची अट घातली आहे, त्यात येदियुरप्पा यांच्याबाबतीत अपवाद करण्यात आला. याच येदियुरप्पा यांना खाण घोटाळ्यातील नेत्यांना पाठिशी घातले, म्हणून पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी स्वतःचा पक्षही काढला होता; परंतु त्यांच्या पक्षामुळे भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. भाजपलाही अपिरहार्यपणे येदियुरप्पा यांना पुन्हा पक्षात आणावे लागले. येदियुरप्पा, वसुंधराराजे, प्रेमकुमार धवल या तीन नेत्यांच्या मागे भाजपला धावावे लागते आहे. पक्ष छोटा आणि व्यक्ती मोठी असे झाले आहे.

कर्नाटक भाजपत अंतर्कलह दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांना हटविण्याची मागणी जोर धरत आहे. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार फोडून भाजपचे सरकार आणल्यापासून येदियुरप्पा यांच्याविरोधात अधूनमधून आवाज उठविला जात आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अनेक नेते येदियुरप्पा यांना हटविण्याची मागणी वारंवार करीत आहेत. आतापर्यंत भाजपत येदियुरप्पा यांना पर्याय नाही, असे सांगितले जात होते; परंतु विरोधाचा आवाज तीव्र झाल्यानंतर येदियुरप्पा यांनीच पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याची तयारी असल्याचे जाहीर केले, तसेच नेतृत्व करण्यासाठी भाजपत अनेक पर्याय असल्याचे मान्य केले. येदियुरप्पा यांना गेल्या काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींनी अभय दिले; परंतु आता त्यांच्याविरोधातील आवाज आणखीच वाढ झाली आहे. भद्रा अप्पर कालवा प्रकल्प व कावेरी पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित पाटबंधारे विभागात 20 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे कंत्राट तयार केले गेले आहे. वित्त विभागाकडून कोणतीही आर्थिक मंजुरी घेण्यात आली नाही, मंडळाची बैठक घेण्यात आली नाही. हे घाईघाईने केले गेले, असे आरोप भाजपच्याच आमदारांनी केले असून, त्यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या महिन्यात येदियुरप्पा यांच्याविरोधात अनेक आमदारांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. येदियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास कधीही राजीनामा देऊ, असे जाहीर केले. पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी अरूण सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिली नाही. त्यांनी पक्षाच्या आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले; परंतु त्यांनी बंडखोरांनाच इशारा दिला. पक्षात कोणताही गोंधळ नाही. कॅबिनेटमधील कुणीही सदस्य दुःखी नाही, असे येदियुरप्पा यांनी म्हटले आहे. जर काही मुद्दा असेल तर आम्ही त्यावर चर्चा करू आणि दोन-तीन सदस्यांच्या शंकेचे समाधान करू. मी भाजपचे विधान परिषद सदस्य ए. एच. विश्‍वनाथ यांच्या आरोपावर आणि टीकेवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या संदर्भात निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले असले, तरी आरोपावर उत्तर न देणे म्हणजे विश्‍वनाथ यांच्या आरोपात तथ्य आहे, असे वाटण्याचा संभव आहे. सिंह यांनी पक्षात एकी आहे आणि काही नाराज आमदार सरकार आणि त्यांच्या नेतृत्वाविरोधात वक्तवे करत आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी अशा नेत्यांना इशारा देत, त्यांच्या अशा वागण्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे, असेही म्हटले आहे; परंतु त्यांच्या इशार्‍याचा बंडखोरांवर कोणताही परिणाम झालेला नाही. ते दररोज वेगवेगळे आरोप करीत असून त्यामुळे भाजपच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. विश्‍वनाथ यांनी उघडपणे येदियुरप्पा यांना हटविण्याची मागणी केली असून त्यांचा छोटा मुलगा आणि कर्नाटक भाजप उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. विश्‍वनाथ पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर 21 हजार 473 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. पाटबंधारे विभागाने 21 हजार 473 कोटी रुपयांची निविदा कुठल्याही प्रकारची वित्तय मंजुरी न घेताच घाईघाईने तयार केली आणि यात घोटाळा झाला असल्याचे म्हटले आहे. सिंह बंगळूरमध्ये असतानाच कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत वादाला पेव फुटले आहे. भाजपच्या एका गटाकडून येदियुरप्पा यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह तीन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर ते एक-एक करून आमदारांच्या भेटीगाठी घेत असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, भाजपचे हुबळी धारवाड पश्‍चिमचे आमदार अरविंद बेल्लद यांनी येदियुरप्पा यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला. तसेच आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी गृहमंत्री बासवराज एस बोम्मई यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. आपण बाहेर पडल्यानंतर काही लोकांकडून आपला पाठलाग केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यांचा रोख येदियुरप्पा यांच्या दिशेने आहे. 

COMMENTS