कर्जत ::प्रतिनिधी कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या शिक्षण क्षेत्रात आ.रोहित पवारांनी विविध संकल्पना राबवल्या आहेत. कोव्हिडच्या परिस्थितीतही आंतराष्ट
कर्जत ::प्रतिनिधी
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या शिक्षण क्षेत्रात आ.रोहित पवारांनी विविध संकल्पना राबवल्या आहेत. कोव्हिडच्या परिस्थितीतही आंतराष्ट्रीय दर्जा असलेली व शिक्षण क्षेत्रात नावाजलेली ‘टिच फॉर इंडिया’ ही संस्था आता कर्जत- जामखेडसाठी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. या अभिनव शिक्षण प्रणाली कार्यशाळेतून जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ११५१ शिक्षकांना अभिनव शिक्षण प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले.
आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन तसेच ‘टिच फॉर इंडिया’ व कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जामखेडच्या नागेश्वर विद्यालय व कन्या विद्यालय या कॅम्पसमध्ये तर कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. जामखेड येथील कार्यशाळेचे उद्घाटन कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात पार पडले. या प्रशिक्षणात जामखेड तालुक्यातील ४६२ शिक्षक सहभागी झाले होते.तर कर्जत तालुक्यातील ६८९ शिक्षक सहभागी झाले होते.
यामध्ये ऑनलाईन डिजिटल शिक्षण पद्धती, नवीन शिक्षण धोरण, कोविडमुळे शाळा बंद असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर झालेला परिणाम लक्षात घेऊन त्यांच्यात शिक्षणाची गोडी कशी निर्माण होईल आणि त्यासाठी आत्ता शिक्षण कसे असावे?अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.’टिच फॉर इंडिया’ ही संस्था सध्या देशातील १२ राज्यांमध्ये प्रभावीपणे काम करत आहे.देशातील विविध राज्यात आणि विविध भागात शिक्षण क्षेत्रात काम करत असताना ‘टिच फॉर इंडियाने’ आत्तापर्यंत केवळ शहरी भागातच काम केलेले आहे.
आ.रोहित पवारांच्या पुढाकारातून या प्रशिक्षणात कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेतर्फे सर्व शिक्षकांना नोट पॅड,पेन आणि प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्रही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) विषयी योजनेच्या समन्वयकांनी माहिती सांगितली.याबाबतची व्हिडीओ चित्रफीतही दाखवण्यात आली.जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक विकासासाठी संरक्षक भिंती, क्रिडांगणे, स्वच्छतागृहे, स्वयंपाकगृहे शाळेसाठी असलेल्या या गरजेच्या बाबी नरेगाच्या माध्यमातून करता येणार आहेत.आणि यामधून विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच आवश्यक सुविधाही मिळतील आणि अनेकांच्या हाताला कामही मिळेल.त्यासाठी शिक्षकांनी नरेगासाठी पालकांना प्रवृत्त करावे असे आवाहन आ.रोहित पवार यांनी केले. विद्यार्थी घडवण्यासाठी आ. पवारांच्या माध्यमातून विविध संस्थांकडून आत्तापर्यंत चार वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे देण्यात आली आहेत.
या कार्यशाळेसाठी टिच फॉर इंडियाचे एकूण १६ स्वयंसेवक प्रशिक्षक, गटशिक्षणाधिकारी, टिच फॉर इंडियाचे व्यवस्थापक तुषार झा, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे व्यवस्थापक धनंजय ठाकरे व शिक्षक उपस्थित होते.
COMMENTS