ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुण्यातही तुटवडा

Homeताज्या बातम्यापुणे

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुण्यातही तुटवडा

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिक कोरोनाची लागण झाल्यानंतर प्राथमिक अवस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच ऑक्सिजन लावत आहेत.

शेतकऱ्यांनी संघटित व्हावे : डॉ. अजित नवले
एसटी आंदोलनात ठिणगी; इस्लामपूर डेपोतून वाटेगावला निघालेली एसटी बस अज्ञातांनी फोडली
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

पुणे/प्रतिनिधी : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिक कोरोनाची लागण झाल्यानंतर प्राथमिक अवस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच ऑक्सिजन लावत आहेत. त्यामुळे बाजारातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसाला सव्वाशे ते दीडशे यंत्रांची मागणी नोंदविली जात आहे; परंतु या यंत्राचादेखील तुटवडा निर्माण झाला असून वितरकांकडे त्या प्रमाणात स्टॉक उपलब्ध नाही. 

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्राच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्याच्या किमतीही काही प्रमाणात वाढल्या आहेत. हे यंत्र हवेतून ऑक्सिजन खेचून घेते. बाजारामध्ये 5, 7, 10 लिटरचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळतात. यातील 5 ते 7 लिटरच्या कॉन्सन्ट्रेटरला सर्वाधिक मागणी आहे. साधारणपणे 40 हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान या यंत्राच्या किमती आहेत. ही यंत्र पुरवणारे जवळपास 50 ते 60 वितरक आहेत. धोका नको म्हणून नागरिकांकडून खबरदारी म्हणून त्याची मागणी केली जात आहे; मात्र त्याची खरोखरच किती आवश्यकता आहे हे तपासणे आवश्यक आहे; परंतु नागरिकांकडून भीतीपोटी आणि आवश्यकता नसतानाही हे यंत्र खरेदी केले जात आहे. हे यंत्र विजेवर चालणारे तसेच घरामध्ये सहज एका कोपर्‍यात मावणारे आहे. हे यंत्र सुरू केल्यानंतर त्याचा नेब्युलायझर तोंडाला लावावा लागतो. 5 लिटर ते 10 लिटर ऑक्सिजन फ्लो असलेल्या यंत्राला अधिक मागणी आहे. 99 टक्के यंत्रे ही परदेशातून आयात केलेली असतात. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सकाळी आठ ते रात्रीपर्यंत दर पाच-दहा मिनिटाला  या यंत्रासाठी कॉल येत आहेत. एरवी दिवसाला एखाददुसरे यंत्र विकले जातात होते. आता मात्र दिवसाला वीसपेक्षा अधिक यंत्रांची मागणी आहे. यासोबतच ऑक्सिजन सिलेंडर किटचीसुद्धा मागणी वाढली आहे. रुग्णालयामधून रुग्ण घरी सोडण्यापूर्वी वितरकांना संपर्क साधला जात आहे. रुग्णालयांकडून संबंधीत रुग्णांना घरी सोडल्यावर या यंत्रांची आवश्यकता भासणार असल्याचे कळविले जाते. त्यामुळे जसे रुग्ण मागणी करीत आहेत; तशाच प्रकारे रुग्णालयांकडूनही मागणी वाढली आहे.

’’ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर यंत्र कोरोना रुग्णांसाठी सुचविण्यात आलेले नाही; परंतु पाच लिटरच्या आत ज्यांना ऑक्सिजन लागू शकतो अशा रुग्णांना ते काही प्रमाणात फायदेशीर ठरते. रुग्णाची प्रकृती त्यामुळे स्थिर राहण्यास मदत मिळते. हे यंत्र कोरोनाच्या अगदी प्राथमिक अवस्थेत किंवा उपचारांनंतर घरी सोडल्यावर उपयोगी ठरू शकते. गंभीर रुग्णांना त्याचा उपयोग होत नाही.’’

– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

COMMENTS