मुंबई : एसटी कर्मचार्यांनी पुकारलेला संप बुधवारी देखील मिटविण्यात सरकारला अपयश आले असून, कर्मचार्यांनी आक्रमक पवित्रा घेत, जोपर्यंत एसटीचे राज्य सर
मुंबई : एसटी कर्मचार्यांनी पुकारलेला संप बुधवारी देखील मिटविण्यात सरकारला अपयश आले असून, कर्मचार्यांनी आक्रमक पवित्रा घेत, जोपर्यंत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. शिवाय जोपर्यंत राज्य सरकार लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. राज्य सरकारने दुसर्या दिवशी तब्बल 542 कर्मचार्यांचे निलंबन केल्यामुळे आतापर्यंत निलंबित केलेल्या कर्मचार्यांची संख्या 918 वर पोहचली आहे.
आझाद मैदानावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात हजारो एसटी कर्मचारी एकत्र जमले आहेत. अशावेळी गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोपर्यंत एसटी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर मुंबई सोडणार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केली. संकटाच्या काळात एसटी कर्मचारी तुम्हाला चालतो. पण विलिनीकरणाचा मुद्दा आला तेव्हा अवमान याचिका दाखल करता. कर्मचारी संकटात असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. मी इथे विरोधी पक्षनेता म्हणून आलेलो नाही. एसा एसटी कर्मचार्यांचा मुलगा म्हणून तुमच्यासमोर आलोय. मला तुमचं दु:ख माहिती आहे, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलीय. त्यावेळी दरेकर भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.
एसटी कर्मचार्यांच्या मागण्यावर तोडगा न निघाल्याने आजही कर्मचारी संपावर आहेत. त्यात आता भाजपने उडी घेतल्याने या आंदोलनाला हवा मिळाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. सोमय्या आणि पडळकर हे आमदार निवासातून बाहेर पडले आणि मोर्चात सामील झाले. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे सरकार हाय हाय, एसटीचे विलनीकरण झालंच पाहिजे अशा घोषणा द्यायला कर्मचार्यांनी सुरुवात केली. यावेळी शेकडोच्या संख्येने एसटीचे कर्मचारी उपस्थित होते. आंदोलकांच्या घोषणने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या आणि पडळकर आमदार निवासातून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यामुळे आंदोलक आणखीनच संतप्त झाले. यासंदर्भात आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन करणार्या कामगारांना पाठिंबा दर्शवणार्या भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. पडळकर, खोत कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार का? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे. माझी कामगारांना विनंती आहे की आपल्याला कुणी भडकवत असेल, तर त्याला बळी पडू नका. कारण नुकसान भडकवणार्याचं होत नाही, ते कामगारांचं होतं. प्रशासनाचा भाग म्हणून काल कारवाई झाली आहे. कुणावरही कारवाई करण्याची आमची इच्छा नाही. पण सरकार म्हणून आम्ही लोकांनाही तेवढेच जबाबदार आहोत. लोकांना कुठेही वेठीस धरलं जाऊ नये. त्यासाठी मी आवाहन करतोय की एसटी कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा. तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. उरलेल्या मागण्या दिवाळीनंतर चर्चा करून पूर्ण करू असं लेखी आश्वासन मी दिलं होतं, असं परब यावेळी म्हणाले.
एसटी कामगार संघटनांविरोधात अवमान याचिका
न्यायालयाचा आदेश झुगारून संपावर ठाम असलेल्या एसटी कामगार संघटना आणि कामगारांच्या विरोधात एसटी महामंडळाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. दरम्यान कामगार संघटनांना शुक्रवारपर्यंत अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या आग्रही मागणीसाठी कामगारांनी दिवाळीच्या आधीपासून संपाची हाक दिली होती.
संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्याचे हात जोडून आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी कामगार व संघटनांना कळकळीचे आवाहन केले आहे.न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.
COMMENTS