काही व्यक्ती या त्यांच्या जीवनात जित्या जागत्या दंतकथा बनतात. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाचा अनेकांना मोह पडतो.
काही व्यक्ती या त्यांच्या जीवनात जित्या जागत्या दंतकथा बनतात. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाचा अनेकांना मोह पडतो. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. अशी प्रेरणास्त्रोत अधिक काळ राहिली पाहिजेत. आताही भारतीय पथक टोकियो ऑलिंपिकसाठी जाणार असताना त्यांच्यापुढं मिल्खा सिंग यांचं बोलणं स्फुर्तीदायी ठरलं असतं; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही इच्छा कोरोनानं अपुरी ठरवली.
कोरोनानं जगात अनेकांना पोरकं केलं. कुटुंबच्या कुटुंबं उद्ध्वस्त झाली. बॉलिवूड, क्रीडा क्षेत्र ज्यांनी गाजविली, त्यांनाही कोरोनानं सोडलं नाही. पाकिस्तानी व्यक्तींकडून भारतीयांचं कधी कौतुक होत नाही; परंतु मिल्खा सिंग त्याला अपवाद ठरले. चार वेळा आशियाई पदक जिंकलेल्या मिल्खा सिंग आणि त्यांच्या व्हॉलिबॉलपट्टू असलेल्या पत्नी निर्मल यांचं अवघ्या पाच दिवसांच्या अंतरानं कोरोनानं निधन व्हावं, हा दुर्दैवी योगायोग आहे. टोकियो ऑलिपिंकमध्ये जाणार्या खेळाडूंना निरोप देण्यासाठी मिल्खा सिंग हजर राहतील, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता; परंतु हा आशावाद प्रत्यक्षात आला नाही. निर्मल यांचं 13 तारखेला कोरोनानं निधन झालं. त्यानंतर पाच दिवसांनी कोरोनानं मिल्खा सिंग यांचा बळी घेतला. मिल्खा सिंग यांच्यावर चंदीगडमधील पीजीआयएमईआरमध्ये 15 दिवस उपचार सुरू होते. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळं त्यांना तीन जून रोजी अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा कोरोना अहवाल 20 मे रोजी सकारात्मक आला. मिल्खा सिंग यांनी असंख्य भारतीयांच्या हृदयात एक विशेष स्थान कोरलं होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची लाखो लोकांना भुरळ पडली होती. 30 मे रोजी कुटुंबातील सदस्यांच्या विनंतीवरून त्यांना तिथून सोडण्यात आलं आणि काही दिवसांपूर्वी घरी परत आले. त्यानंतर त्याच्यावर घरी उपचार सुरू होते. काही दिवसांनंतर त्यांची तब्येत पुन्हा खालावली आणि ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली. तीन जून रोजी पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्याच वेळी निर्मल यांच्यावर मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. मोदी यांनी रूग्णालयात मिल्खा सिंग यांच्याशी चर्चा केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या खेळाडूंना आशीर्वाद आणि प्रेरणा देण्यासाठी मिल्खा लवकरच परत येणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले होते. निर्मल कौर या भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार होत्या. पंजाब सरकारमध्ये त्यांनी क्रीडा संचालक म्हणूनही काम केलं होतं. मिल्खा सिंग अतिदक्षता विभागात दाखल असल्यामुळं पत्नीच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकले नाहीत. पाकिस्तानमधील गोविंदपुरा येथे 20 नोव्हेंबर 1929 मध्ये जन्म झालेल्या मिल्खा सिंग यांना देश आणि क्रीडाप्रेम असल्यानं ते पाकिस्तानातून पळून भारतात आले आणि भारताचं नाव त्यांनी जागतिक पातळीवर नेलं. भारतीय सैन्यात त्यांनी काम केलं; परंतु त्यांना खेळाची आवड असल्यानं त्यांनी क्रॉस कंट्री स्पर्धांवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांनी चारशेहून अधिक स्पर्धांत भाग घेतला. 1958 मधील कॉमनवेल्थ गेम्समधील ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं. पुढील 56 वर्षे त्यांचा विक्रम कोणीही मोडू शकले नाही. मिल्खा सिंग यांची सुरुवातही धडपडतच झाली. मेलबर्न इथं झालेल्या 1956 च्या ऑलिम्पिक खेळात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना फार काही करता आलं नाही; परंतु पुढच्या दोन वर्षांत म्हणजे 1958 मध्ये कटक येथे झालेल्या नॅशनल गेम्समध्ये त्यांनी 200 आणि 400 मीटरमध्ये अनेक विक्रम नोंदवले. त्याच वर्षी त्यांनी टोकियो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 200 मीटर, 400 मीटर स्पर्धांमध्ये आणि राष्ट्रकुलमधील 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदकं जिंकली. त्यांचं यश पाहून भारत सरकारनं त्यांचा पद्मश्री देऊन गौरव केला. मिल्खा सिंग पाकिस्तानमध्ये आयोजित शर्यतीसाठी गेले होते. त्यांनी तिथं उत्तम काम केलं. त्यांची कामगिरी पाहून पाकिस्तानच्या जनरल अयूब खान यांनी त्याचं नाव ’द फ्लाइंग शीख’ ठेवलं. तीच पुढं त्यांची ओळख झाली. मिल्खा सिंगला रोममध्ये 1960 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये मोठी आशा होती. 400 मीटर शर्यतीत ते 200 मीटर पुढं होतं; परंतु त्यानंतर त्यांनी आपला वेग कमी केला. त्यामुळं ते शर्यतीत मागं राहिले आणि चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. 1964 मध्ये त्यांनी आशियाई खेळात 400 मीटर आणि 4ु400 रिलेमध्ये सुवर्णपदकं जिंकली. मिल्खा सिंग यांच्यावर 2013 ’भाग मिल्खा भाग’ हा बॉलिवूड हिंदी चित्रपट बनला होता. याचे दिग्दर्शन राकेश मेहरा यांनी केलं होतं, तर लेखन प्रसून जोशी यांचे होते. फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांची भूमिका केली. या चित्रपटाला एप्रिल 2014 मध्ये 61 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट करमणूकप्रधान चित्रपट पुरस्कार मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी पुरस्कारही देण्यात आला; मात्र या चित्रपटात मिल्खा सिंह यांच्या जीवनातील थोडासाच संघर्ष दाखवण्यात आला होता. 1960 मध्ये रोम ऑलिम्पिंकमध्ये 400 मीटर शर्यतीत ते चौथ्या स्थानावर राहिले. त्यांनी 45.6 सेकंदात शर्यत पूर्ण केली होती. या वेळी त्यांचं कास्यपदक थोडक्यात हुकले होतं. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून 46.6 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली, तर 200 मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ 21.6सेकंदात पूर्ण केली. मिल्खा सिंग यांच्या कुटुंबीयांनी मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी निर्मल कौर या दोघांच्याही एकापाठोपाठ मृत्यूबद्दल बोलताना त्यांच्यातील प्रेमपूर्ण संबंधांच्याही आठवणींना उजाळा दिला. मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर खेळाच्या मैदानावरच झाली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. विशेष म्हणजे याआधी मिल्खा सिंग यांच्या अनेक मुलींसोबतच्या प्रेमाच्या चर्चाही गाजल्या होत्या. मिल्खा सिंग यांचं नाव एक किंवा दोन नव्हे तर चांगल्या तीन मुलींसोबत जोडलं केलं आणि त्यांच्या प्रेमाचे किस्सेही चर्चिले गेले होते; मात्र यापैकी कुणाशीही त्यांचं लग्न झालं नाही. कारण अॅथलेटिक्सच्या राजाचं मैदानावर व्हॉलीबॉलच्या राणीवर प्रेम जडलं. मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर 1955 रोजी कोलंबोला झाली होती. तिथं एका उद्योगपतीनं भारतीय खेळाडूंसाठी मेजवानी आयोजित केली होती. तिथंच दोघांची एकमेकांशी ओळख झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणं ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले. तेव्हा त्यांनी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिल्याचाही किस्सा सांगितला. पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघं पुन्हा भेटले. त्यांच्या प्रेमाच्या गाडीनं 1960 मध्ये वेग पकडला. तेव्हा दोघांची भेट दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत केलं. मिल्खा सिंग यांचं नाव मोठं झालेलं असलं, तरी निर्मला कौर या हिंदू आणि मिल्खा सिंग शीख असल्यानं निर्मला कौर यांच्या वडीलांचा त्याला विरोध होता. त्यामुळं लग्नाच्या मार्गात अडथळा आला. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.
COMMENTS