एकाच दिवशी दोन महापौर…आणि बदलला कायदा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकाच दिवशी दोन महापौर…आणि बदलला कायदा

एकाच दिवशी म्हणजे सकाळी 11 वाजता दीप चव्हाण व दुपारी 3 वाजता संदीप कोतकर असे दोन महापौर करण्याचा इतिहास घडवणार्‍या नगरच्या महापालिकेने व येथील राजकारणाने चक्क शासनालाच अचंबित करून कायदाच बदलण्यास भाग पाडले.

रेमडेसिवीर नंतर आता फॅबिफ्लू चा तुटवडा ; संगमनेरातील एकही औषधालयात फॅबिफ्लू उपलब्ध नाही
Ahmednagar : नगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह (Video)
पंकजा मुंडे समर्थक मुकूंद गर्जे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

श्रीराम जोशी/अहमदनगर : एकाच दिवशी म्हणजे सकाळी 11 वाजता दीप चव्हाण व दुपारी 3 वाजता संदीप कोतकर असे दोन महापौर करण्याचा इतिहास घडवणार्‍या नगरच्या महापालिकेने व येथील राजकारणाने चक्क शासनालाच अचंबित करून कायदाच बदलण्यास भाग पाडले. नगरमुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील नवा महापौर निवडीच्या सभेस मावळता महापौर ठेवण्याचा नियम रद्द झाला व तेथे विभागीय आयुक्त वा त्यांचा प्रतिनिधी नेमला जाऊ लागला. नगरचा नववा महापौर येत्या तीन-चार दिवसात खुर्चीवर विराजमान होणार आहे. यानिमित्ताने आतापर्यंत होऊन गेलेल्या नगरी महापौरांच्या चित्तरकथांचा आढावा घेताना महापालिका झाल्यापासूनच्या मागील 18 वर्षांच्या इतिहासात अनेक राजकीय व प्रशासकीय घडामोडीही घडल्या आहेत व गाजल्याही आहेत. 

नगरला 30 जून 2003 रोजी महापालिका अस्तित्वात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा त्यावेळी पहिले मनपाचे आयुक्त झाले. त्यांनी मनपा झाल्यानंतर नवीन कर रचना करण्यासह अतिक्रमण हटवून शहराची नवी रचना करण्याचे नियोजन सुरू केले असतानाच तत्कालीन राज्य सरकारने सहा महिन्यातच निवडणूक जाहीर केली व डिसेंबर 2003मध्ये महापालिकेची पहिली निवडणूकही झाली. त्याआधी राज्यात नाशिक वा अन्य मोठ्या शहरांतून महापालिका झाल्यानंतर किमान 2-3 वर्षे प्रशासकीय काळ दिल्याने अतिक्रमणे हटवण्यासह शहराची नवी रचना करण्याचे नियोजन तेथे झाले व नंतर राजकीय सत्ता तेथे आल्या. पण दुर्दैवाने नगरला तसे घडले नाही. येथील प्रशासकीय काळ अवघ्या सहा महिन्यात संपुष्टात आला. त्यामुळे शहराची नवी रचना बासनातच राहिली व त्याचा परिणाम म्हणून आजही नगर शहराचा मध्यवस्तीचा भाग हा एका खेड्यासारखाच आहे.

पहिला महापौर व सेनेतील फूट

डिसेंबर 2003मध्ये मनपाची पहिली निवडणूक झाली व त्यावेळच्या भाजप-शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्याने शिवसेनेचे भगवान फुलसौंदर पहिले महापौर झाले. त्यावेळी निवडणुकीनंतर शिवसेनेचे सर्व नगरसेवक तत्कालीन आमदार (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्यासमवेत मातोश्रीवर शिवसेना प्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी खुद्द ठाकरेंनी नगरचा पहिला महापौर म्हणून फुलसौंदर यांचे नाव जाहीर केले. त्यावेळी टीव्ही चॅनेलचा आताच्यासारखा सुळसुळाट झालेला नव्हता. दूरदर्शनच्या सायंकाळच्या साडेसातच्या बातम्यांतून त्यावेळी नगरचा महापौर म्हणून भगवान फुलसौंदर यांचे नाव ठाकरेंनी निश्‍चित केल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर फुलसौंदर महापौर झाल्यावर नगर शहरातील बालिकाश्रम रोड, गुलमोहोर रोड व अन्य मिळून प्रमुख 5 रस्ते रुंद करण्याचे व राज्य सरकारच्या रस्ते विकास विभागाद्वारे त्यांचे काम करण्याचे निश्‍चित झाले होते. पण पुढे या रुंदीकरणात अनेकांची अतिक्रमणे व घरेही जाण्याची शक्यता व्यक्त झाल्याने हा प्रकल्पच बारगळला. पण नंतर नव्या मनपाचे नवनवे कामकाज व राजकारण सुखनैव सुरू असताना शिवसेनाअंतर्गत संघर्ष उफाळला. फुलसौंदर यांना सव्वा वर्षे महापौरपदी ठेवावे व दुसरे सव्वा वर्ष दुसरा महापौर करावा, अशी मागणी शिवसेनेतच जोर धरू लागली. पण ती फेटाळली गेल्याने शहर शिवसेनेत भूकंप झाला व काही पदाधिकारी आणि नगरसेवक मिळून 10जणांनी सेना सोडली. विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र नोंदणी केल्यावर नगरमध्ये या मंडळींची जंगी मिरवणूकही त्यावेळी रंगली होती. यातील काही नंतर मनसेमध्ये गेले तर काही राष्ट्रवादीमध्ये. मात्र, नगरमधील ही राजकीय घडामोड शहराच्या आमदारकीवर परिणाम करून गेली नाही, पण मनपाच्या राजकारणात मात्र उलथापालथ घडवून गेली.

एकाच दिवशी दोन महापौर

पहिले महापौर फुलसौंदर यांचा अडीच वर्षांचा काळ संपल्यावर 2006मध्ये दुसरा महापौर निवडीच्यावेळी तर विस्मयजनक घटना घडली. त्यावेळी शिवसेनेतून आधीच बाहेर पडलेल्यांनी थेट काँग्रेस व राष्ट्रवादीला साथ देणे पसंत केले तर भाजपमधील चारजणांनी महापौर निवडणुकीला गैरहजर राहून एकप्रकारे दोन्ही काँग्रेसला मदत केली. त्यामुळे नंतर स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांनी या चारही नगरसेवकांनी पक्ष विरोधी कृती केल्याने त्यांच्या घरासमोर ढोल-ताशा बजाव आंदोलन केले होते व त्या चौघांची पुरती बदनामी त्यातून झाल्याने ते नंतर पुन्हा कधीही नगरसेवक झाले नाही. त्यावेळच्या महापौर निवडणुकीला पीठासीन अधिकारी मावळते महापौर फुलसौंदर होते. काँग्रेसकडून संदीप कोतकर व शिवसेनेकडून दीप चव्हाण उमेदवार होते. महापालिका निवडणुकीतील संपत्ती माहितीसंदर्भातील मुद्द्यावरून फुलसौंदर यांनी कोतकर यांची उमेदवारी रद्द केली व चव्हाण हे महापौर झाल्याचे जाहीर केले. यावेळी जुन्या महापालिकेच्या सभागृहात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. बाहेर रस्त्यावरही तुफान गर्दी झाली होती. चव्हाण यांची निवड जाहीर करून फुलसौंदर यांच्यासह शिवसेना व भाजपच्या काही नगरसेवकांनी सभागृह सोडल्यावर दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुन्हा त्याच सभागृहात निवडणूक घेतली व आपल्यातील ज्येष्ठ सदस्यास पीठासीन अधिकारी नेमले. या सभेत संदीप कोतकर यांची महापौरपदी निवड करण्यात आली. त्यामुळे हा दिवस मनपाच्या इतिहासात आगळावेगळा ठरला. दुसर्‍या दिवशी राज्यभरातील सर्व माध्यमांतून नगरमध्ये एकाच दिवशी दोन महापौर झाल्याचे वृत्त दणक्यात झळकले होते. पुढे ही दोन महापौर निवड न्यायालयात गेली. तिचा निकाल लागेपर्यंत मनपाच्या कामकाजात एक महापौर दालनात बसायचा तर दुसरा बाहेर तंबू ठोकून बसत असे. न्यायालयीन निकालात चव्हाण यांचे पद रद्द झाले व कोतकरांचे महापौरपद कायम राहिले व त्याचवेळी महापौर निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून मावळता महापौर नव्हे तर विभागीय आयुक्त वा त्यांचा प्रतिनिधी नेमण्याचा कायद्यातील बदलही शासनाने केला. (क्रमशः)

दीड वर्षाचे औट घटकेचे राज्य

नगरच्या तत्कालीन नगरपालिकेची हद्दवाढ 1999मध्ये झाली. केडगाव, बोल्हेगाव, नागापूर, फकीरवाडा व बुरुडगाव अशा पाच ग्रामपंचायतींच्याअंतर्गत असलेल्या 12 गावांचा नगरच्या हद्दीत समावेश झाला. त्यानंतरच तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांनी नगरला महापालिका जाहीर करण्याच्या दृष्टीने हरकती व सूचनांसाठी नोटिफिकेशन जारी केले होते. त्यामुळे नगरला महापालिका होणार म्हणून तत्कालीन दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी चक्क महापालिकेचा मंगल कलश मिरवत मिरवत जुन्या महापालिकेत आणला होता. पण नंतर केडगावने नगरमधून वगळून स्वतंत्र नगरपंचायत करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली. पण यामुळे पुरेशी लोकसंख्या होत नसल्याने त्या निकषानुसार नगरला मनपा होण्याचा मार्गअडचणीत आला. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा नगरला नगरपालिकेची निवडणूक जाहीर केली. आपल्याच सरकारने महापालिका निर्णय रद्द करून पुन्हा नगरपालिका करण्याच्या घेतलेल्या या निर्णयाबद्दल स्थानिक दोन्ही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली व त्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे शिवसेना व भाजप या दोन पक्षांमध्येच ती निवडणूक झाली. पण त्या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष निवड झाली होती. त्यात भाजपने बाजी मारली. भाजपच्या अनिता आगरकर यांनी शिवसेनेच्या संगीता भोसले यांचा नगराध्यक्ष निवडणुकीत पराभव केला होता. त्यावेळी सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक जास्त, पण नगराध्यक्ष भाजपचा असे चित्र होते. याच काळात नगरला अखिल भारतीय नाट्य संमेलनही झाले व तेही गाजले. या संमेलनात नगरच्या मामा तोरडमल यांनी तत्कालीन नाट्य परिषदेच्या राजकारणावर भोजनभाऊ असा शब्द उच्चारल्याने गदारोळ झाला होता. पण त्यावेळी नगरपालिकेने नाट्य संमेलन यशस्वी पार पाडले होते. मात्र, त्यानंतर नगराध्यक्षा अनिता आगरकर यांचे नगराध्यक्षपद अवघे दीड वर्षेच राहिले. राज्य सरकारने 30 जून 2003 रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास नगरपालिका बरखास्त केली व महापालिका जाहीर केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी देवरा यांनी लगेच रात्री नऊच्या सुमारास मनपाचे पहिले आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलाही.

COMMENTS