केंद्र व राज्य सरकारने येत्या महाराष्ट्रदिनापासून (1 मे) 18 वर्षांवरील सर्वांच्या कोविड लसीकरणाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या कामात तसेच कोरोना सर्वेक्षणात शिक्षकांना सामावून घेतले जाणार असल्याचे समजते.
अहमदनगर/प्रतिनिधी-केंद्र व राज्य सरकारने येत्या महाराष्ट्रदिनापासून (1 मे) 18 वर्षांवरील सर्वांच्या कोविड लसीकरणाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या कामात तसेच कोरोना सर्वेक्षणात शिक्षकांना सामावून घेतले जाणार असल्याचे समजते. मात्र, या कामास शिक्षकांनी थेट विरोध दर्शवला नाही. पण आधी शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी केली आहे. सध्या शाळा बंद असल्याने व यंदा परीक्षाही होणार नसल्याने शिक्षकांना शासनाच्या कोविड लसीकरण मोहिमेत कोरोना सर्वेक्षण व अन्य अनुषंगीक कामांमध्ये कार्यरत करण्याचे घाटत आहे. या पार्श्वभूमीवर नगरमधील अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद व जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने आधी शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी केली आहे. तशी निवेदने या संघटनांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या शिक्षक विभागास दिली आहेत.
…म्हणजे,जीविताशी खेळणे-ठुबे
कोविड लसीकरण होईपर्यंत प्राथमिक शिक्षकांना कोविडसंदर्भातील कामे देऊ नयेत, अशी मागणी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी केली आहे. कोविड लसीकरण न करता प्राथमिक शिक्षकांना कोरोना सर्वेक्षण व इतर कामावर नियुक्त करणे म्हणजे त्यांच्या जीविताशी खेळणे आहे. कोविड लसीकरण झाल्याशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकाला कोरोनासंदर्भातील कामे देऊ नयेत, अशी मागणी ठुबे यांनी केली आहे. राज्यामध्ये बहुतांश जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने झाले आहे. नगरशेजारील पुणे, बीड, औरगाबाद, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सध्या दुसरा डोस शिक्षकांना दिला जात आहे. मात्र, सातत्याने मागणी करून देखील नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सध्या जे आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी व इतर विभागातील कर्मचारी कोविडसंदर्भात कामकाज करत आहेत, त्या सर्वांचे लसीकरण पहिल्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून करण्यात आले. पण शिक्षकांबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कोणतीही संवेदनशीलता न दाखवल्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आजअखेर लसीकरणापासून वंचीत आहेत. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये कोरोना लाटेच्या वेळी जिल्ह्यातील 90% शिक्षकांनी कोविड संदर्भातील वेगवेगळी कर्तव्ये शासन आदेशानुसार बजावली. मात्र, शिक्षण विभागाकडून या सर्व शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी न झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक वंचीत आहेत. आता नव्याने पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर प्राथमिक शिक्षकांना वेगवेगळी कामे दिली जात आहेत. राष्ट्रीय कार्य म्हणून प्राथमिक शिक्षक हे कार्य प्रामाणिकपणे नेहमीच पार पाडतात. परंतु आता मात्र कोविड लसीकरण न करता प्राथमिक शिक्षकांना या कामांवर नियुक्त करणे म्हणजे त्यांच्या जीविताशी खेळणे आहे. म्हणून कोव्हिड लसीकरण झाल्याशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकाला कोरोनासंदर्भातील कामे देऊ नयेत, अशी मागणी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे, असे ठुबे यांनी सांगितले.
आधी लसीकरण करा-सरोदे
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील 18 ते 20 प्राथमिक शिक्षक कोरोनाला बळी पडले आहेत. सध्या शासनाने जिल्हाभरात घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये शिक्षकांनादेखील नेमणुका देण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणी कोवीड सेंटरवर सुद्धा शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आधी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी व नंतर त्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी दिली. जिल्ह्यामध्ये कोरोनाला पायबंद घालण्यासाठी शहरी व ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन आशा वर्करसमवेत प्राथमिक शिक्षक व शिक्षिकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षकांच्या कुटुंबीयांमध्ये कोरोनाने बळी गेलेल्या शिक्षकांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून सर्वेक्षणासाठी नियुक्ती करण्याअगोदर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून निवेदनावर गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्युलता आढाव, दक्षिण विभाग प्रमुख संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, सरचिटणीस संदीप मोटे, कार्याध्यक्ष किसन वराट, रामेश्वर चोपडे, बाळासाहेब सरोदे आदींच्या सह्या आहेत.
शिक्षक सोसायटीने विमा उतरवावा-चौगुले
अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को ऑप. क्रेडिट सोसायटीने सभासदांचा आरोग्य विमा उतरावा, अशी मागणी प्राचार्य चंद्रकांत चौगुले यांनी केली आहे. माध्यामिक शिक्षक सोसायटीचा जिल्ह्यात नावलौकीक आहे. परंतु कोरोना महामारीने एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असताना सुद्धा सोसायटीने सर्व सभासदांचा पाच लाख रुपये विमा उतरविणे गरजेचे असतानासुद्धा तो उतरवला नाही. त्यामुळे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को ऑप. क्रेडिट सोसायटीने आतातरी सभासदांचा आरोग्य विमा उतरावा, अशी मागणी प्राचार्य चंद्रकांत चौगुले यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, अजिनाथ नेटके यांनी निवेदनाद्वारे सोसायटीकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात कोव्हिड-19 महामारीने थैमान घातले आहे; त्यातून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा सुटले नाहीत. सोसायटीच्या सभासदांंवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सोसायटीच्या काही सदस्यांना जीव गमावावा लागला आहे तर काही दवाखान्यात उपचार घेत आहेत. सुदैवाने काहीजण त्यातून बरे झाले आहेत. या महामारीच्या काळात सोसायटीच्या सर्व सभासदांना सोसायटीने वार्यावर सोडले आहे. त्यामुळे सर्व सभासदांचा सोसायटीने आपल्या फंडातून रुपये पाच लाख आरोग्य विमा तात्काळ उतरविणे, सोसायटीने आपल्या फंडातून सर्व सभासदांना रुपये दोन लाखपर्यंत कर्ज वितरित करावे व त्याचा व्याजदर हा 7.50%ठेवावा व त्याची वसुली इतर रकान्यात दाखवावी, मध्यम मुदत व शैक्षणिक कर्ज हे सहा महिन्याच्या मुदतीचा निकष न लावता काही कालावधीसाठी मागेल त्या सभासदांना नवे-जुने करण्यासाठी परवानगी द्यावी, सोसायटीचा एक जाचक नियम असून कर्जदार व दोन जमीनदार यापैकी ज्याची सेवा कमी असेल, त्यावर त्याचा कपातीचा हप्ता ठरविला जातो मात्र, त्यापेक्षा मूळ कर्जदाराचा सेवा कालावधी ग्राह्य धरून मासिक हप्त्याची आकारणी करण्यात यावी त्यामुळे सभासदांची हेळसांड होणार नाही अशा मागण्या यात केल्या आहेत. शेवगाव तालुकाध्यक्ष सुरेश विधाते, तुकाराम चिक्षे, किशोर दळवी, अनिल आचारी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, सतीश जगदाळे, सत्यवान थोरे, सुभाष ढेपे, बापू जगताप, प्रदीप बोरुडे, किरण शेळके, अनिल दरंदले, संदीप झाडे, मुकुंद आंचवाले, मेघा कुलकर्णी, समीना शेख, बाबासाहेब शिंदे, प्राचार्य चंद्रकांत भवर, विठ्ठल ढगे, प्रशांत सुरसे आदींनी या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
प्राथमिक शिक्षकांना 50 लाखांचे विमासरंक्षण व प्राधान्याने लसीकरण करण्याबाबत शिक्षक परिषद सातत्याने पाठपुरावा करीत असून मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदनाची दखल घेऊन शिक्षकांच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला तशा सूचना दिलेल्या आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनीदेखील सकारात्मकता दाखवली असून लवकरच सर्व शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने केले जाईल, अशी अपेक्षा परिषदेचे सरचिटणीस दत्तात्रय गमे व कार्याध्यक्ष राम निकम यांनी व्यक्त केली.
COMMENTS