गायरान जमिनीत राहणार्या भिल्ल समाजाच्या वस्तीत तब्बल 50 वर्षांनी कूपनलिका (बोअरवेल) खोदली गेली...हे खोदकाम सुरू असताना अवघे 50 फूट खोदून होत नाही तोच त्यातून पाण्याचे फवारे उडू लागले आणि हे काम पाहण्यास जमलेल्या सार्या वस्तीच्या चेहर्यावर हसू पसरले व त्यांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.
महिलांच्या चेहर्यावर फुलले हसू, काष्टीजवळच्या वस्तीत आनंदोत्सव
अहमदनगर/प्रतिनिधी-गायरान जमिनीत राहणार्या भिल्ल समाजाच्या वस्तीत तब्बल 50 वर्षांनी कूपनलिका (बोअरवेल) खोदली गेली…हे खोदकाम सुरू असताना अवघे 50 फूट खोदून होत नाही तोच त्यातून पाण्याचे फवारे उडू लागले आणि हे काम पाहण्यास जमलेल्या सार्या वस्तीच्या चेहर्यावर हसू पसरले व त्यांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. आपल्या हक्काचे पाणी आता आपल्याला फारशी पायपीट न करता मिळणार असल्याचे समाधान महिलांच्या चेहर्यावर पसरले.
श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी गावापासून 6 किलोमीटर अंतरावरील भिल्ल वस्तीच्या पाण्याची ही कथा. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावामध्ये सहा किलोमीटरच्या अंतरावर भिल्ल वस्ती आहे. हे सर्व आदिवासी 1926 पासून त्या गायरान जमिनीमध्ये वास्तव्य करीत आहेत. तेथे नुकताच संत तुकाराम महाराज पाणवठा करण्यात आला आहे. श्रीगोंद्यातील महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्थेचे प्रमुख अनंत झेंडे यांनी यासाठी केलेला पाठपुरावा व त्यांना दानशुरांनी दिलेली साथ यामुळे या वस्तीचा पाणीप्रश्न आता कायमस्वरुपी मिटला आहे.
प्रश्नांची सोबत कायमची
या भिल्ल वस्तीमध्ये पाणी, वीज व निवारा हे प्रश्न त्यांच्या नशिबाला पुजल्यासारखेच. गायरान जमीन असल्यामुळे शासकीय सुविधांपासूनही हा समाज अनेक वर्षापासून वंचित आहे. यामुळे ग्रामपंचायतही या आदिवासी भिल्ल कुटुंबासाठी ठोस पावले उचलू शकली नाही. येथील लोक अनेक वर्षापासून अर्धा किलो मीटर नदीवर जाऊन झर्याचे पाणी पिण्यासाठी व वापरण्यासाठी घेऊन येत होते. बाबा आमटे संस्थेच्या माध्यमातून या वस्तीचा सर्व्हे केला गेला. 200 लोकसंख्या असलेल्या या वस्तीत 50 कुटुंब असल्याने संस्थेच्या माध्यमातून प्रथम पाण्याच्या प्रश्नाला हात घालून काम सुरू केले गेले. ग्रामपंचायतीने आवश्यक कागदोपत्री मदत देण्याची ग्वाही दिली.
तुकोबांचे वंशज आले धावून
डॉ. प्रकाश शेठ यांच्या माध्यमातून आमटे संस्थेशी जोडलेले संस्थेचे संस्थापालक व मार्गदर्शन जगदगुरू तुकाराम महाराजांचे वंशज किरीटी मोरे यांनी या वस्तीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. येथे कूपनलिकेसाठी (बोअरवेल) त्यांनी आर्थिक मदत दिली. वस्तीवर बोअरवेल होत असल्याचे समजल्यावर महिलांनी आनंद व्यक्त केला व 50 वर्षात भिल्ल वस्तीत पहिला बोअरवेल होत असल्याने आम्ही नक्की काळजी घेऊ, अशी ग्वाहीही दिली. 22 मे 2021 रोजी सकाळी 8 वाजता बोअरवेल खोदकाम सुरू झाले. काष्टी गावचे सरपंच सुनील तात्या पाचपुते, काष्टी गावातील अभ्यासू व्यक्तिमत्व लालासाहेब फाळके, पाचपुते मेजर, केशव मोढवे, प्रा. किशोर सोनवणे आदींच्या उपस्थितीत वस्तीतील एका छोट्या लहान मुलीच्या हस्ते बोअरवेलचे पूजन झाले आणि काम सुरू झाल्यावर सुमारे तासाभरातच अगदी 56 व्या फुटावर पाहिले पाणी लागले. त्याचे फवारे उडाल्याने आनंद पसरला. पण तेथे पाणी इतके लागले की अवघ्या 80 व्या फुटावर खोदकाम बंद करावे लागले. त्यानंतर 24 मे रोजी बोअरवेलवर हापसा बसविला आणि भिल्ल वस्तीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला. हापसा बसल्यावर तेथील सर्व तरुणांनी श्रमदान करीत त्याभोवती सिमेंटचा पाणवठा बांधकाम केले.
त्यांचाही झाला विचार
बोअरवेल घेण्याचे निश्चित झाल्यावर दोन ठिकाणे पाहिली गेली. यातील एक ठिकाण वस्तीत एकदम मध्यभागी तर दुसरे वस्तीपासून 500 फुटावर असलेले व पंचक्रोशीचे दैवत असलेल्या पीरबाबाचा दर्गा जवळचे होते. वस्तीत बोअरवेल घेतला तर वस्तीसह आजूबाजूच्या लोकांना उपयोग होईल, असे आमटे संस्थेचे म्हणणे होते.पण वस्तीतील रहिवाशांचे म्हणणे वेगळे होते व त्यांनी पीराजवळ बोअरवेल घेण्याचे सांगितले. पीराला महाराष्ट्रभरातील लोक येतात. त्या भाविकांना जवळ पिण्यासाठी पाणी नाही, भांडी धुण्यासाठीही नदीवर जावे लागते. यात त्यांचे होणारे हाल आम्ही पाहत असतो. त्यामुळे देवाजवळ बोअर घेतला तर बाहेरील लोकांनाही आणि आमच्या लोकांनाही त्याचा उपयोग होईल. या वस्तीत पन्नास वर्षानंतर हा पहिलाच बोेअरवेल होत आहे. आतापर्यंत आमच्या लोकांच्या पायाच्या भेगा बुजल्या नसतील इतके नदीवरून पाणी आणले आहे व आता बोअरवेल झाल्यावर तर खूप जवळ पाणी आहे, असे शब्द वस्तीतील दिगंबर नावाच्या युवकाने उच्चारले आणि उपस्थित सारे गहिवरले.
COMMENTS