नगर जिल्ह्यात फक्त दोन दिवस पुरेल एवढ्याच कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहेत.
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यात फक्त दोन दिवस पुरेल एवढ्याच कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शासनाकडे लसींचा पुरवठा तातडीने करण्यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. अर्थात, राज्यात सगळीकडेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा असून, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच याची माहिती देताना केंद्र सरकारकडून लसींची मागणी केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात लसींचा नवीन साठा कधी येतो, याची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा मागील दोन दिवसांपासूनच वाढला आहे. राज्यात सगळीकडून मागणी वाढल्याने आणि त्या प्रमाणात लसींची उपलब्धता कमी असल्याने मागणीच्या काही टक्केच पुरवठा राज्याच्या आरोग्य विभागाकडून केला जातो व काही पुरवठा इर्मजन्सीसाठी राखून ठेवला गेला आहे तसेच दुसरीकडे केंद्र सरकारकडे लसींचा पुरवठा तातडीने करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर आरोग्य मंत्री टोपे यांनी बुधवारी स्पष्टपणे राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याचे जाहीर केले आहे. नगर जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. आताही केवळ दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा जिल्ह्यात आहे, असे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. नगर जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन्ही प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 21 हजार 953जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 26 हजार 442जणांनी दुसराही डोस घेतला आहे. दोन्ही मिळून जिल्ह्यातील 2 लाख 48 हजार 395जणांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 163 तर नगर शहरात मनपाची 7 आरोग्य केंद्रे व आयुर्वेद हॉस्पिटल अशा 8 ठिकाणी लसीकरण सुरू आहे.
नगरला सायंकाळी आली लस
नगर शहरात बुधवारी दुपारीच सर्व लस संपल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणचे लसीकरणही बंद करण्यात आले होते. मात्र, सायंकाळी 4 हजार लसींचा पुरवठा मनपाच्या आरोग्य विभागाला झाला. त्यामुळे अजून दोन दिवस नगर शहरात लसीकरण सुरू राहू शकते. शहरात मनपाच्या 7 व आयुर्वेद हॉस्पिटल मिळून आतापर्यंत 34 हजार जणांचे लसीकरण झाले आहे. बुधवारी दुपारीच लस संपल्याने गुरुवारी लसीकरणाचे काय करायचे, याचा प्रश्न मनपाच्या आरोग्य विभागासमोर होता. पण सायंकाळी नव्याने लस उपलब्ध झाल्याने किमान गुरुवारी व शुक्रवारी नगरमधील लसीकरण सुरू राहील, असे आरोग्य सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातही कमी उपलब्धता
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. जिल्ह्यात यासाठी 163 केंद्रे करण्यात आली आहेत. यापैकी काही केंद्रांवर गर्दी असते तर काही ठिकाणी कमी गर्दी असते. जेथे कमी गर्दी असते, तेथील लसींचा साठा नंतर दुसर्या व जेथे गर्दी असेल अशा केंद्रांकडे पाठवला जातो. त्यामुळे रोज किमान तीन ते चार हजार लसींचा साठा उपलब्ध असतो. पण मागील दोन दिवसात हा साठा कमी झाला होता. पण बुधवारी सायंकाळी 25 हजार लसी उपलब्ध झाल्याने आता जिल्ह्यातही किमान दोन दिवस तरी लसीकरणात काही अडचण येणार नाही, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
COMMENTS