अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणांसह सहा जणांवर कारवाई करण्यात आली

रोटरी क्लब अकोलेकडून मदतीचा हात
अहमदनगर मध्ये एसटी चालकाची गळफास घेऊनआत्महत्या (Video)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 272 मतदान केंद्र

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणांसह सहा जणांवर कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी एक वैद्यकिय अधिकारी व तीन परिचारिकांना अटक केली. याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेपाठोपाठ आता डॉक्टर संघटनाही आक्रमक झाली आहे. डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाचे कामकाज बंद करून निषेध व्यक्त केला गेला. चौकशी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांवर गुन्हा दाखल करणे व त्यांना अटक करणे ही कारवाई अत्यंत चुकीची व अन्यायकारक असून, त्यांच्यावर दाखल गुन्हा मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी संघटना, राज्य शासन आरोग्य कर्मचारी संघटना यांच्यामार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणाची आरोग्य विभाग व विविध तांत्रिक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. मृतांची उत्तरीय तपासणी झाली असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. आगीच्या कारणाचा शोध सुरु आहे. सदोष साहित्य वापरल्यामुळे धूर सर्वत्र पसरला असावा व त्यामुळे रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. वेगाने पसरणार्‍या धुराच्या तांत्रिक कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. अतिदक्षता विभागात आग पसरताच सर्व कर्मचारी तेथे मदतीसाठी धावून आले. धुरामुळे काही दिसत नव्हते. स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना बाहेर काढले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णांना बाहेर काढण्यामध्ये, तातडीची मदत व उपचार करण्यामध्ये दिरंगाई व हलगर्जीपणा केला नाही. जे रूग्ण मृत्यूमुखी पडले ते बहुतांश 65 ते 80 वयोगटातील असून ते गंभीर आजारी होते. आग आणखी पसरू नये म्हणून मुख्य प्राणवायू पुरवठा खंडित करावा लागला. वेगाने पसरणारा काळा धूर यामुळे हवेतील प्राणवायूची कमतरता निर्माण होणे यामुळे रुग्णांचा कमी कालावधीमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेच्या अनुषंगाने हा धूर इतक्या कमी कालावधीत कसा पसरला याच्या तांत्रिक कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे, असा दावा करून डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या ठिकाणी उपस्थित वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी रुग्णसेवेच्या कामामध्ये हलगर्जीपणा केलेला नाही. त्यामुळे डॉक्टर व परिचारिका यांना दोषी मानता येऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी यांच्या साक्षीने जिल्हा शल्यचिकित्सक यांना कोवीड योध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा रुग्णालयात काम करणार्‍या सर्व डॉक्टर, परिचारिका तसेच इतर आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यांच्या दोन वर्षापासून अथक रुग्णसेवेमुळे आणि अनेक रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे देण्यात आला आहे. त्यामुळे येथील डॉक्टर व परिचारिका त्यांच्या रुग्णसेवेच्या कामात हलगर्जीपणा करतात, असे म्हणणे चुकीचे आहे. या दुर्घटनेची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तेथे तातडीने मदत कार्य व रुग्णसेवा देणार्‍या वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर गुन्हा दाखल करणे, त्यांना अटक करणे ही कार्यवाही अत्यंत चुकीची व अन्यायकारक आहे. त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात यावे. अन्यथा सर्व राज्यभर या अन्यायकारक व चुकीच्या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS