मुंबई : विधानसभा निवडणुकीची राजकीय वातावरण तापले असून, बहुतांश उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आज मंगळवारी उमेदवारी अर्ज भ

मुंबई : विधानसभा निवडणुकीची राजकीय वातावरण तापले असून, बहुतांश उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आज मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज राज्यातील निवडणुकीचे चित्र बहुतांशी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत विधानसभेच्या 288 जागांपैकी महाविकास आघाडीकडून 259 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत, तर महायुतीकडून 235 जागांची यादी समोर आली आहे. त्यामुळे अजूनही उरलेल्या जागांवर तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असला तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा घोळ मिटलेला नाही.
भाजपने 99 जागांवर पाहिली यादी केल्यानंतर सोमवारी 25 जागांवर दुसरी यादी केली आहे. त्यामुळे भाजपने आत्तापर्यंत 124 उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेने आत्तापर्यंत 65 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहे. उर्वरित आणखी किती जागांवर भाजप लढते त्याचे चित्र आजच स्पष्ट होईल. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यंदाही प्रत्येक पक्षात आणि युती-आघाड्यांमध्ये जागा वाटपावरुन खलबते झाले. मात्र त्यानंतरही अजून काही जागांवरचे चित्र स्पष्ट नाही. महायुतीच्या 235 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, तब्बल 53 उमेदवारांची यादी घोषित होणे बाकी आहे. तर महाविकास आघाडीने 259 उमेदवारांची घोषणा केल्यामुळे त्यांच्याही 29 जागांचा निर्णय बाकी आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही, तिथल्या इच्छुकांसाठी पुढचे काही तास धाकधूक वाढवणारे असणार आहेत. सोमवारी राज्यातील प्रमुख नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात भव्य रॅली काढली आणि कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि उतर यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामती मतदारसंघातून आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. बारामतीतून महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यावेळी उपस्थित होते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून, तर विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगावमधून अर्ज भरला. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रताप चिखलीकर यांनीही आज लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.
खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी कुडाळमधून उमेदवारी अर्ज भरला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माहीमचे उमेदवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज मंगळवार शेवटचा दिवस आहे.
मविआत दोस्तीत कुस्ती?
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा गुंता अजूनही सुटलेला नाही. एकाच जागेवर काँगे्रस आणि ठाकरे गटाने देखील उमेदवार जाहीर केला असून, त्या उमेदवारांना एबी फॉर्म देखील दिला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून एकाच मतदारसंघात परस्पर उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. या उमेदवारांना संबंधित घटक पक्षांनी एबी फॉर्मदेखील दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
COMMENTS