अपरिहार्य निर्णय

Homeसंपादकीय

अपरिहार्य निर्णय

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात धडकी भरविली असताना आणि आता तिसरा म्युटेंट आणखीच संकट निर्माण करण्याची शक्यता असताना विद्यार्थ्यांच्या जीवाला प्राधान्य देऊन दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बहुमताचा अभाव
राजकारणाचे सत्ताकारण आणि सामाजिक शक्ती ! 
महागाईचा आगडोंब

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात धडकी भरविली असताना आणि आता तिसरा म्युटेंट आणखीच संकट निर्माण करण्याची शक्यता असताना विद्यार्थ्यांच्या जीवाला प्राधान्य देऊन दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअगोदर केंद्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परीक्षा मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या दोन मंडळांच्या परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने मर्यादित असते. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंत असते. ऑनलाईन परीक्षा घेण्याला मर्यादा असल्याने सरकारने परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात दहावी, बारावीच्या परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व असते. या परीक्षेतील यशा, अपयशावर विद्यार्थ्यांच्या जीवनाचा मार्ग ठरत असतो. किती गुण मिळतात, त्यावर कुठे प्रवेश घ्यायचा ते ठरत असते. दहावीचे महत्त्व आता कमी करण्याचा निर्णय नव्या शैक्षणिक धोरणात घेण्यात आला आहे. दहावीऐवजी अकरावीला महत्त्व येणार आहे. त्याचा प्रयोग म्हणून या वर्षीच्या दहावीच्या परीक्षकडे पाहिले पाहिजे. असे असले, तरी परीक्षेतील यश हे जीवनात यशस्वी होण्याचे एकमेव यश नसते. जीवनात शाळांपेक्षा पदोपदी वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावे लागत असते. त्या परीक्षात किती यश मिळते, त्यावर जीवन सुखकर ठरत असते. दहावी, बारावीच्या परीक्षेतील अपयश म्हणजे जीवनात अयशस्वी समजून अनेक विद्यार्थी इहलोकीची यात्राच संपवितात. खरेतर परीक्षेकडे मूल्यमापनाची सोय म्हणून पाहायला हवे. आनंददायी शिक्षण आणि आनंददायी परीक्षा असे स्वरुप असायला हवे होते. या परिस्थितीत कोरोनाचे भय घेऊन परीक्षांना सामोरे जाणे योग्य नव्हते. गेल्या वर्षांपासून वेगवेगळ्या परीक्षा जाहीर करणे, त्या लांबणीवर टाकणे आणि नंतर त्या रद्द करणे असे वारंवार घडते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैफल्य येणे स्वाभावीक आहे; परंतु ’सिर सलामत तो पगडी पचास’ हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. देशातील इतर सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. नीट, वैद्यकीय अभ्यासक्रमासारख्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी, म्हणून राज्य मंडळाचीदेखील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बसविण्याच्या निर्णयावर वाद-विवाद होणे स्वाभावीक आहे. स्पर्धेच्या युगात गुणवत्तेशी तडजोड करायला नको, हे म्हणणेही रास्त आहे; परंतु जीवन महत्त्वाचे, की परीक्षा यातून प्राधान्य कशाला द्यायचे, याचा विचार जेव्हा करावा लागतो, तेव्हा जीवनाला महत्त्व द्यावे लागते. केंद्रीय मंडळाच्या परीक्षा रद्द करताना जो निकष लावण्यात आला, तोच निकष आता महाराष्ट्राच्या मंडळाबाबतही लावण्यात आला आहे. केंद्रीय मंडळ आणि राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या आणि आता मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार असले, तरी ते सर्वमान्य नाही. केंद्रीय तसेच अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळांत अकरावीला प्रवेश घेण्याचा सोय असते. तिथे अन्य मंडळाचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाहीत; परंतु अन्य मंडळाच्या शाळा, महाविद्यालयात या मंडळाचे विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली, तरी खरे आव्हान आहे, ते अकरावीच्या प्रवेशाचे. पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे. ते कसे करणार, हा सरकारपुढचा मोठा प्रश्‍न असेल. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिआच्या आधारावर म्हणजेच वस्तुनिष्ठ निकष पद्धतीच्या आधारे जाहीर करण्यात येईल, असा निर्णय केंद्रीय परीक्षा मंडळाने घेतला आहे. महाराष्ट्रातही आता तसाच निर्णय होण्याची शक्यता आहे. वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारावर म्हणजे केंद्रीय बोर्ड काही वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे असे दिसते. यात इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्ट्स, असाईनमेंट्स किंवा ऑब्जेक्टिव्ह असे पर्याय असू शकतात. वर्षभरात शालेय स्तरावर घेतलेल्या अशाच परीक्षांच्या गुणांवरही निकाल जाहीर करू शकतात. महाराष्ट्रातही आता तसाच निर्णय होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात अकरावी आणि बारावी असे दोन वर्ष आहेत. या दोन वर्षांत ते आणखी मेहनत घेऊ शकतात. अभ्यास करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने हा निर्णय योग्य आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया साधारण जून अखेर ते जुलै महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे यानुसारच सीबीएसई बोर्ड दहावीचा निकाल जाहीर करेल. आता तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागणार आहे. राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होते. एसएससी बोर्डासाठी हा पर्याय मात्र आव्हानात्मक आहे असे तज्ज्ञ सांगतात. आपल्याकडे केवळ 20 गुणांची इंटरनल परीक्षा झाली आहे. त्यामुळे केवळ त्या आधारावर पूर्ण निकाल जाहीर करता येणार नाही. राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण पाहता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये, अशी भूमिका विद्यार्थी आणि पालक संघटनांची होती. आपल्याकडे स्कॉलरशीप परीक्षा होतात. त्या ओएमआर पद्धतीने घेतल्या जातात. यात मुलांना पर्याय निवडायचे आहेत. या परीक्षेसाठी आपल्याकडे तयार यंत्रणा आहे. नऊ विषयांची परीक्षा आहे. प्रत्येक विषयाचे एकूण गुण कमी केले तर एका दिवसातही ही परीक्षा घेता येणे शक्य आहे. यामुळे उत्तरपत्रिका तपासणी रखडणार नाही. निकाल वेळेत जाहीर होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी तयारी करण्यास आपल्याला पुरेसा वेळ मिळेल.

COMMENTS