अकरा महिन्याच्या वेदीला दिले 16 कोटीचे इंजेक्शन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकरा महिन्याच्या वेदीला दिले 16 कोटीचे इंजेक्शन

भोसरीतील वेदिका सौरभ शिंदे या अकरा महिन्यांच्या मुलीला ’स्पायनल मस्क्युलर ट्रॉफी टाइप-1’ दुर्मीळ आजारावर 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले.

राजकारण-भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणा
पुण्यात खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी गजाआड
भारत सासणे यांची 95 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

पुणे / प्रतिनिधीः भोसरीतील वेदिका सौरभ शिंदे या अकरा महिन्यांच्या मुलीला ’स्पायनल मस्क्युलर ट्रॉफी टाइप-1’ दुर्मीळ आजारावर 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले. समाजाच्या दातृत्व भावनेने मातृत्व गहिवरल्याची भावना शिंदे दाम्पत्याने व्यक्त केली. वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला ’एसएमए टाइप-1’ दुर्मीळ आजार झाल्याचे निदर्शनास आले. आजारावर ’झोलगेन्स्मा’ हे 16 कोटी रुपये किमतीचे इंजेक्शन गरजेचे होते. जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या ’झोलजेंस्मा’ इंजेक्शन परदेशातून आयात करणे भाग होते, तरच मुलीला वाचविणे शक्य होते; मात्र सामान्य कुटुंबातील वेदिकाचे आईवडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांना ही रक्कम जमा करणे कदापि शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी समाजाला मदतीची साद घातली. ही समस्या ’फंडरेझिंग माध्यम मिलाप’वर सांगितली. 

जगभरातील ऑनलाइन दात्यांना मदतीची विनवणी केली. ’क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून तब्बल 16 कोटी रुपये जमा करण्याचा निश्‍चय केला. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. मार्चमध्ये सुरू झालेल्या ’फंड रेझर’ अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. केवळ तीन महिन्यांत 14.3 कोटी रुपयांची मदत मिळाली. शिंदे कुटुंबीयांच्या विनंतीवरून अनेक राजकीय नेते, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जनतेला मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळेच रक्कम जमा होऊ शकली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिला हे इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ होण्यासाठी सौरभ यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी व केंद्रीय अर्थ मंत्रालयाबरोबर पत्रव्यववहार केला होता. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने आयातशुल्क व कर माफ केले. यासाठी सिने-अभिनेते नीलेश दिवेकर अणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सचिव संकेत भोंडवे यांचे योगदान मोलाचे होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे यांनीही भरीव मदत केली, असे सौरभ शिंदे यांनी सांगितले. ’संसदेच्या अधिवेशनात वेदिकाचा उल्लेख करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. तसेच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी पत्रव्यवहार करून आयात शुल्क माफीचा निर्णय मंजूर करून घेतला. निरंतर पाठपुराव्याला अखेर यश मिळाले,’ अशी पोस्ट डॉ. कोल्हे यांनी सोशल मीडियावर केल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. दानशूर व्यक्तींनी शक्य तेवढी मदत केली. सर्व जनतेने आशीर्वाद दिले. या सर्वांच्या कष्टाचे फळ मिळाले. वेदिकला इंजेक्शन भेटले. सामाजिक ऋण चिरंतन स्मरणात राहील, असे शिंदे दांपत्याने सांगितले.

COMMENTS