नवी दिल्ली/प्रतिनिधी ः शिवसेना पक्ष कुणाचा ? धनुष्यबाण चिन्ह नेमके कुणाचे ? यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असून, सोमवारी झालेल
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः शिवसेना पक्ष कुणाचा ? धनुष्यबाण चिन्ह नेमके कुणाचे ? यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असून, सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाकडून लेखी युक्तीवाद दाखल केला असून, निवडणूक आयोग लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या व्युक्तीवादात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या निलंबनांचा प्रस्ताव प्रलंबित असून, तो निर्णय आल्यानंतरच निर्णय जाहीर करावा, तर शिंदे गटाकडून आम्हीच शिवसेना असून, आम्हाला शिवसेनेतील बहुसंख्य आमदार आणि खासदारांचा पाठिंबा असल्यामुळे आम्हाच धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळावे अशी मागणी केली आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष याबाबत गेल्या काही दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता. दोन्ही गटाने आज आपलं म्हणणं लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानुसार आता ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर लेखी युक्तिवाद सादर केला आहे.
30 जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात म्हणणं मांडण्याची आयोगाने मुदत दिली. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे केलेल्या लेखी युक्तिवादात कुठल्याही पातळीवर तपासलं तरी न्यायाची बाजू आमची, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांना पक्षातील अनेक आमदारांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्षातील सर्वाधिक आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्यानं आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला. तर दुसरीकडे ठाकरे गटाने मुळ शिवसेना म्हणून चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. त्यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.
COMMENTS