Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संशोधन संस्थेच्या माध्यमातून तरुणाईच्या पंखांना बळ देण्याचे काम व्हावे : मुख्यमंत्री

बारामती / प्रतिनिधी : कल्पनांना पंख फुटण्याचे तरुणांचे वय असते. अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी या पंखांना बळ देण्याचे काम इनोव्हेशन सेंटरसारख्या संस्थां

माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खाजगी सावकाराविरोधात चौथा गुन्हा दाखल
आरआयटी डिप्लोमाला राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट किताब

बारामती / प्रतिनिधी : कल्पनांना पंख फुटण्याचे तरुणांचे वय असते. अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी या पंखांना बळ देण्याचे काम इनोव्हेशन सेंटरसारख्या संस्थांच्या माध्यमातून व्हावे, असे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले.
अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील अटल इन्क्युबेशन सेंटर योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या इन्क्युबेशन, इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे, यासाठी त्यांच्या कल्पनांना पंख फुटले पाहिजेत. या पंखांना गरुडभरारी घेण्याचे बळ आपणा सर्वांना द्यायचे आहे. बारामतीमध्ये उभ्या राहिलेल्या संस्थांच्या माध्यमातून हे काम होत आहे. नूतन इन्क्युबेशन केंद्र हे देशातील सर्वोत्तम केंद्र व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
परदेशात जाऊन तेथील चांगल्या बाबी इकडे आणल्या जाणे महत्त्वाचे असते, असे सांगून आपला महाराष्ट्र सर्व क्षेत्रात देशात अग्रेसर आहे. पण राज्याला जगातही सर्वोत्तम स्थानावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राज्याच्या प्रगतीच्या आड येणारे सर्व अडथळे दूर करू, असे ठाकरे म्हणाले.
खा. शरद पवार म्हणाले, 50 वर्षांपूर्वी कृषी विकास प्रतिष्ठान (अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट) आणि विद्या प्रतिष्ठानच्या स्थापनेतून बारामती येथे अनुक्रमे शेती क्षेत्रात मौलिक परिवर्तनाची आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची सुरूवात केली. आज शेतीवर अवलंबून असणारे घटक आणि शेती यामध्ये मोठी तफावत आहे. सुमारे 81 टक्के शेतकर्‍यांकडे 2 हेक्टरच्या आत जमीन असून त्यापैकी 60 टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे शेतीवरील भार कमी करणे तसेच शेतीपूरक व्यवसायावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
स्थापन करण्यात आलेल्या इन्क्युबेशन सेंटरचा उद्देश हा नवीन कल्पना घेऊन येणार्‍या युवकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनाला साथ देऊन नवीन उद्योजक निर्माण व्हावेत, असा आहे. महाराष्ट्रातील अनेक संशोधन संस्था, शिक्षण संस्थांना भेट देऊन तेथील चांगल्या बाबी या इन्क्युबेशन सेंटरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून देश आणि जगातल्या उत्तम संस्थांमधील ज्ञान स्थानिक विद्यार्थी आणि अध्यापकांना मिळेल, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शालेय विद्यार्थी आणि युवकांमध्ये ज्ञान, विज्ञानाची आवड निर्माण्या करण्यासाठी आणि त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. शेतीमध्ये सुधारणा होऊन गरीबांच्या घरी क्रांती व्हावी यासाठी ग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने सुरुवातीपासून काम केले. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीबातील गरीब घरातील मुलांना शिक्षण घेता येत आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. खा. श्रीमती सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे सुरु करण्यात आल्या. शरद पवार इन्स्पायर फेलोशीप कार्यक्रमाची माहिती दिली. ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी तसेच अतुल किर्लोस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या स्थापनेपासूनच्या कामाचा आढावा घेणारी चित्रफीत तसेच इन्क्युबेशन सेंटरवरील माहितीची चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी आमदार संजय शिंदे, रोहित पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक विजय शिर्के, टोरंट फार्माचे चेअरमन समीर मेहता, फिनोलेक्स केबल्सचे व्यवस्थापकीय संचालक दीपक छाब्रिया, सरदोराबजी टाटा ट्रस्टचे माजी व्यवस्थापकीय संचालक व्यंकट रमणन, महिको सीडचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बारवाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवार, बारामतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.

COMMENTS