Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला सक्षमीकरणाच्या योजनांतून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी : पालकमंत्री दादाजी भुसे

गोदा महोत्सवात महिला बचत गटांना 80 उमेद मार्टचे वितरण

नाशिक -  राज्य शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना राबवित असून या योजनांचा महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. तसेच गोदा महोत्सवा

Beed : चकलंबा ठाण्याच्या हद्दीतील बॅन्ड, डिजे चालकांना नोटीसा
आता घरी बसून फिरता येणार मतदान केंद्रामध्ये
सातारा ते पुणे जुना कात्रज घाटात एकेरी वाहतूक

नाशिक –  राज्य शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना राबवित असून या योजनांचा महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. तसेच गोदा महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी वितरीत करण्यात आलेल्या 80 उमेद मार्टच्या सहाय्याने महिला बचत गटांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

डोंगरे वसतिगृह मैदानावर गोदा महोत्सवाच्या माध्यमातून उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी महिला बचत गटांच्या विभागीय मिनी व जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या गोदा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांच्यासह नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागातील महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणी नुसार महिलांना सक्षम करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास होवून त्या स्वावलंबी होण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात ही बचत गटांच्या माध्यमातून महिला स्वत: सोबतच इतर महिलांची देखील उन्नती करून कुटुंबाला सक्षमपणे आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या जागा महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच उमेद मार्टच्या माध्यमातून देण्यात येणारे स्टॉल हे प्रत्येक बचत गटाला 15 दिवसांसाठी देण्यात येणार असल्याने या उमेद मार्टमधून देखील बचत गटांना त्यांचे उत्पादन विक्री करण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे. यासाठी मिळणारा प्रतिसाद लक्षात घेवून या उमेद मार्टची संख्या देखील वाढविण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

महिलांच्या सक्षमीकरणासोबतच मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे याकरीता राज्य शासनाने सुरू केलेली लेक लाडकी या योजनेचा देखील प्रसार करून या योजनेचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे शेती अगर घराच्या 7/12 उताऱ्यावर घरातील महिलेचे नाव लावल्यास  कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ तत्काळ मिळण्यासाठी मदत होत असल्याने 7/12 उताऱ्यावर महिलांचे नाव म्हणजेच घरच्या लक्ष्मीचे नाव लावावे. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन त्या महिला व्यवसायिक क्षमतेने बचत गटाचे गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार उत्पादन सर्वांपर्यंत पोहचवतील. तसेच आपला उदरनिर्वाह भागवून जिल्ह्यातील प्रत्येक महिला बचत गटाची सदस्या लखपती होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत बचत गटांच्या महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी सर्वांनी या गोदा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा महत्वाचा भाग आहे. अशा वारकरी संप्रदायासाठी जिल्हा परिषद सेस मधून 144 गावांना प्रत्येकी 50 हजार प्रमाणे भजनी मंडळ साहित्य पुरविण्यासाठी 72 लाख निधीचे अर्थ सहाय्य देण्यात आले आहे. गावातील वारकरी संप्रदायाने आपल्या भजन-किर्तनातून व्यसनमुक्ती सोबतच समाजप्रबोधनाचा संदेश द्यावा. तसेच सर्व बचत गटांना देण्यात येणारा फिरता निधी 15 हजारावरुन 30 हजार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे या समूहांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींच्या  (कॅडर) 3 हजार मानधनात वाढ करून 6 हजार रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात पार्थिव अंत्यसंस्काराला नेण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या 72 गटासाठी प्रत्येकी रुपये 2 लाख प्रमाणे 1 कोटी 44 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकी करणास प्रोत्साहन म्हणुन जिल्हा परिषद सेस निधीतून 109 शेतकऱ्यांना प्रत्येकी रुपये 1.25 लाख प्रमाणे अर्थ सहाय्य देण्यात असून 107 शेतकऱ्यांना 28 हजार प्रमाणे रोटो व्हेटरसाठी व 187 शेतकऱ्यांना कडबा कुट्टीसाठी 16 हजार रुपये प्रत्येकी अर्थ सहाय्य देण्यात असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून आयोजित गोदा महोत्सवात नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागातील साधारण 80 महिला बचत गट सहभागी झाले असून शासनाने सुरू केलेल्या विभाग व जिल्हास्तरीय महोत्सवांमधून बचत गटाच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळत आहे. तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून वैकुंठ रथ, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर असे साहित्य वितरीत केले असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी केले.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन निधीतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी देण्यात आलेल्या दोन उमेद मार्टचे प्रातिनिधीक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून चारचाकी वाहने, ट्रक्टर, वैकुंठ रथ यांचे संबंधीत गावांना वितरण करून गोदा उद्योग दिंडीला देखील पालकमंत्री यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.

या जिल्हा उद्योजिकांचा झाला सन्मान – श्रीमती सविता अमोल व्यवहारे, बी.सी. सखी, बॅक ऑफ इंडीया, भारम, ता. येवला मासिक उत्पन्न 30 ते 35 हजार, 2)  श्रीमती कल्पना गोविंद म्हस्के, बी.सी. सखी, बॅक ऑफ बडोदा, मुसळगांव, ता. सिन्नर मासिक उत्पन्न 25 ते 33 हजार, 3) श्रीमती ज्योती निकम व संगीता निकम (प्रेरणा उत्पादक समूह गुगुळगांव, ता. मालेगांव) उत्पादन गोट मिल्क सोप. 4) श्रीमती रेखा महेंद्र जाधव व विद्या संदीप भुसारे (जीवन ज्योती प्रभागसंघ, भाग्यलक्ष्मी समूह, पेठ) उत्पादन-नागली कुकीज व प्रिमिक्स. 5) श्रीमती शितल ढोकरे (कृषी कन्या समूह, खेडगांव ता. दिंडोरी) उत्पादन- 9 प्रकारचे मसाले. 6) श्रीमती शितल सोपान करंजकर (जीवन ज्योती  प्रभागसंघ गोवर्धन, माऊली समूह नाशिक) उत्पादन- तत्वा ब्लॉक प्रिंट.

प्रातिनिधीक स्वरुपात झाले धनादेश वितरण – बँक ऑफ महाराष्ट्र : 1) जय अंबिका समूह-पिंपळे (सिन्नर) – 3 लाख, श्रीमती मुमताज शेख. 2) राजमाता समूह- ठाणगांव (सिन्नर)- 3 लाख, श्रीमती विजया मंडोले. 3) वतन समूह- मातोरी (नाशिक)- 3 लाख, श्रीमती रेखा नारायण चारोस्कर. 4) दर्याई माता समूह-मातोरी (नाशिक)- 3 लाख, श्रीमती यशोधा जगन पिंगळे. 5) जिजामाता समूह-वनसगांव (निफाड) – 3 लाख, श्रीमती  संगीता पेंढारकर. 6) चेतना समूह-वनसगांव (निफाड) – 3 लाख, श्रीमती वैशाली उन्मेश डुंबरे. 7) मदिना समूह-उगाव (निफाड) – 4 लाख, श्रीमती शगुप्ता राजू तांबोळी. 8) उमेद समूह-उगाव (निफाड) – 4 लाख, श्रीमती मनिषा सुनिल बिरार. 9) सिध्दी विनायक समूह-वाहेगांव साळ (चांदवड) – 5 लाख, 10) छत्रपती शिवाजी महाराज समूह- वाहेगांव साळ (चांडवड) – 4 लाख 11) ओम साई समूह-वाकी खुर्द, (चांदवड) – 4 लाख

COMMENTS