आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष्यमुंबईः मुंबई महापालिकेच्या आगामी महापौरपदासाठी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. महापौरपदाच

आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष्य
मुंबईः मुंबई महापालिकेच्या आगामी महापौरपदासाठी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत अनुकूल प्रवर्ग निघाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच महापौर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतेमागे ठाकरे गटाकडे असलेले दोन निर्णायक घटक महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या 22 जानेवारी रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर कोणत्या प्रवर्गातील व्यक्ती मुंबईच्या महापौरपदी विराजमान होणार हे स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शक्यतांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच होईल, असे सूचक विधान केल्याने या चर्चांना अधिकच धार मिळाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक 89 जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे. ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 71 जागा मिळाल्या असून, सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना 29 जागांवर थांबली आहे. निवडणुकीनंतर संभाव्य फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र ठेवल्याचीही चर्चा आहे. महापौरपदाचे आरक्षण जर अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी जाहीर झाले, तर ठाकरे गटाचा उमेदवार महापौर होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कारण, निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या आरक्षणात प्रभाग क्रमांक 53 आणि 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. या दोन्ही प्रभागांत ठाकरे गटाचेच उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र वळवी यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला, तर प्रभाग क्रमांक 121 मध्ये प्रियदर्शनी ठाकरे यांनी विजय मिळवला. इतर कोणत्याही पक्षाकडे सध्या अनुसूचित जमातीतील विजयी नगरसेवक नसल्याने, आरक्षण सोडतीत हा प्रवर्ग निघाल्यास ठाकरे गटाला स्पष्ट आघाडी मिळू शकते.
अंतिम चित्र आरक्षण सोडतीनंतर होणार स्पष्ट
उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत. काहींच्या मते, मुंबई महापालिकेत नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण होऊ शकते, तर काही जण भाजप आणि ठाकरे गटातील संभाव्य समन्वयावरही चर्चा करत आहेत. मात्र, अंतिम चित्र आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होणार असून, तोपर्यंत मुंबईच्या महापौरपदाबाबतची उत्सुकता कायम राहणार आहे.

COMMENTS