परभणी :- नागरीस्तरावर काम असताना लोकाभिमुख निर्णय घेण्याची संधी मिळत असते. त्याच संधीला सुवर्णसंधी बनवुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. नि
परभणी :- नागरीस्तरावर काम असताना लोकाभिमुख निर्णय घेण्याची संधी मिळत असते. त्याच संधीला सुवर्णसंधी बनवुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. निधी अभावी लोकविकासाची कामे अडणार नाहीत याची दक्षता घेत असतांनाच चांगले व गुणवत्तापुर्ण काम करण्यासाठी पुर्णा नगर परिषदेला निधीची कमतरता भासू देणार नाही. शहरातील विविध विकास कामांसाठीचे प्रस्ताव सादर करताच प्राधान्याने नगर परिषदेला भरघोस निधी उपलब्ध करुन देवू, अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पुर्णा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, डॉ. रत्नाकर गुट्टे, बालाजी कल्याणकर, विपलव बाजोरीया, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे, उपाध्यक्ष विशाल कदम, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.
नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातील विखुरलेल्या समाजाला सोबत घेवून कुठलाही जात, धर्म, वंश, लिंगाला थारा न देता स्वराज्य निर्माण केले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा महान मंत्र दिला. आपल्या देशाला त्यांनी जगातील सर्वात मोठी राज्यघटना देत असतांनाच देशातील सर्व घटकांना समान संधी निर्माण व्हावी यासाठी मुलभूत हक्क प्रदान केले. जगभरातल्या सर्वांनी भारतीय राज्यघटनेचे कौतूक केलेले आहे. डॉ.आंबेडकरांनी सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार अंगिकारावेत. जगभरात कोविडच्या संसर्गाच्या पाचवी व सहावी लाट चालू असताना कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगले काम झाले असून याची प्रशंसा केंद्रस्तरावर झाली आहे. कोविडचे अद्यापही संकट टळले नाही, आणखी काही दिवस संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आपल्याला कोविडच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे सांगत असतांनाच पुर्णा नगर परिषदेने संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नियोजन करुन सर्वांना नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुर्णा येथील रेल्वेच्या पुलांच्या कामाला राज्य शासनाकडून लागणारा आवश्यक तो निधी देवून युध्द पातळीवर रेल्वे पुलाचे काम सुरु करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे लोकार्पण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण तसेच शहरातील छत्रपती राजे संभाजी व्यापारी संकुलाचे लोकार्पणही राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मान्यवर, नगरसेवकांसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
लोकहिताची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावीत – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहराचा आलेख दरवर्षी उंचावत असून जनतेच्या दृष्टीकोनातून पाहताना पुर्णा शहरात लोकहिताची कामे होत असतांना कामे गुणवत्तापुर्ण व वेळेत पुर्ण व्हावी, अशी अपेक्षाही राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
पुर्णा शहरात नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा लोकापर्ण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, डॉ. रत्नाकर गुट्टे, बालाजी कल्याणकर, विपलव बाजोरीया, नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे, उपाध्यक्ष विशाल कदम, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पुर्णा नगरपरिषदेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना, उद्यान, रस्ते आदी कामांसाठी निधीची आवश्यकता असल्याने नगर परिषदेने तातडीने प्रस्ताव पाठवावेत त्याला मंजूरी देण्यात येईल. नुतन इमारतीतील वाचनालयासाठी लाखों रुपयांचा निधी दिला जाईल तसेच उर्वरित कामांच्या निधीला मंजूरी देण्यात येईल. यावेळी त्यांनी नगर परिषदेच्या नुतन इमारतीची पाहणी करुन झालेले काम दर्जेदार असल्याबाबत कौतूकही त्यांनी केले. या कार्यक्रमास नगरसेवकांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
COMMENTS