भ्रष्टाचाराचे मूळ शोधण्यात गेलो तर, ते आजमितीस तरी राज्यव्यवस्थेत सापडले. कारण भ्रष्टाचाराचे कुरण राज्यव्यवस्था ठरतांना दिसून येत आहे. राजकीय नेत्यां
भ्रष्टाचाराचे मूळ शोधण्यात गेलो तर, ते आजमितीस तरी राज्यव्यवस्थेत सापडले. कारण भ्रष्टाचाराचे कुरण राज्यव्यवस्था ठरतांना दिसून येत आहे. राजकीय नेत्यांचा वरदहस्तांमुळेच प्रशासनात देखील भ्रष्टाचार वाढू लागला आहे. राज्यकर्ते आणि भांडवलदार यांची परस्परात सांगड घातल्यामुळे भ्रष्टाचाराची गंगोत्री म्हणून राज्यव्यवस्थेकडे बघावे लागेल. पंजाबमध्ये नवीन सरकार येऊन काही दिवस लोटले असतांनाच, या भ्रष्टाचाराचा वास मुख्यमंत्री भगवंत मान यांना आला, आणि त्यांनी तेथील आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी केली. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर येऊन काही दिवस ही झाले नाहीत, तोच आपच्या मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची मंत्रीपदावरून काही तासांतच हकालपट्टी करण्यात आली. यावरच न थांबता पंजाबच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सिंगला यांना अटक केली. या दोन्ही बाबी एकाच दिवशी घडल्या हे विशेष. भ्रष्टाचाराच्या विरोधात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दाखवलेली ही तत्परता नक्कीच स्वागतार्ह आहे. कारण देशातील विविध राज्यात आणि केंद्रातील उदाहरण बघितले असता, मंत्र्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी देखील त्या मंत्र्यांची गच्छंती होत नाही. अनेक आरोप होऊनही त्यांना आपल्या मंत्रिपदावर कायम ठेवले जाते. त्यामुळे एकप्रकारे पक्षच अशा भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात स्थान देतो, असेच अधोरेखित होते. अनेक वेळेस विरोधकांची आम्हाला बदनाम करण्याची खेळी म्हणून, सत्ताधारी आपल्या पक्षातील मंत्र्यांना पाठीशी घालतात. खरे तर पंजाबमध्ये आपचे सरकार येऊन काही दिवसांचा अवधी उलटला आहे. त्यामुळे भगवंत मान आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री विजय सिंगला तंबी देऊन दुर्लक्ष करू शकले असते. मात्र पारदर्शक सरकार आणि भ्रष्टाचारमुक्ततेचा विडा उचललेल्या आपने काही क्षणातच आपल्याच मंत्रिमंडळातील एका नेत्याला बाहेरचा रस्ता दाखवला. नुसता बाहेरचा रस्ताच दाखवला नाही, तर त्याला अटक करण्याचे धाडस देखील दाखवले. यातून पंजाबच्या जनतेत आणि प्रशासनात एक चांगला संदेश गेला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आरोग्यमंत्री असलेला व्यक्तीला जर मुख्यमंत्री तुरुंगात टाकू शकतात, तर आपली खैर नाही, असा संदेश गेल्यामुळे पंजाबमधील भ्रष्टाचाराला आळा घालणे मान यांना सहज सोपे जाणार आहे.
पंजाब प्रांतची सीमा ही पाकिस्तानला लागून असल्यामुळे तेथे सातत्याने होणार्या दहशतवादी कारवाया, त्याचबरोबर सीमेपलीकडून येणारे ड्रग्ज, गांजा, अफू या पदार्थांचे सेवन तिथे मोठया प्रमाणावर होत असल्यामुळे तेथील तरुण अंमली पदार्थांच्या नशेत असल्याचे चित्र अनेक वेळेस समोर आले आहे. या सर्व बाबींना दूर करुन पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तमप्रकारे राखणे भगवंत मान यांच्या हाती आहे. काँगे्रसचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये कायदा व सुव्यवस्था ताळयावर आणत, मोठया प्रमाणावर रोजगारनिर्मिती केली होती. मात्र त्यांना पंजाबमध्ये भ्रष्टाचाराला आवर घालणे जमले नव्हते. मात्र भगवंत मान यांनी आपली जनतेप्रती असलेली निष्ठा आणि पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे दिलेले अभिवचनाला जागत त्यांनी त्या दिशेने आपले कामकाज सुरू ठेवले आहे. पंजाबमध्ये विस्तार करण्यासाठी भाजप साम, दंड, अशा सर्वच बाबींनी उतरला असतांना देखील त्यांना यश मिळालेले नाही. तर काँगे्रस सत्तेत असूनही त्यांना सत्ता टिकवणे शक्य झाले नाही. याउलट आपने पंजाबला एक स्वप्न दिले. त्या जोरावर त्यांनी एकतर्फी विजय मिळवत सत्ता स्थापन केली. पंजाबमध्ये बेरोजगारी, शेतकर्यांचे प्रश्न, सीमाप्रश्न, तरुणांना विधायक कामाकडे वळवणे असे अनेक आव्हाने आहेत. ती आव्हाने पेलतांना सध्यातरी भगवंत मान समर्थ दिसत आहेत. आणि त्यांची प्रतिमा ही लोकनेता होण्याकडे सुरू असल्याचे एकंदरित दिसून येत आहे.
COMMENTS