मुंबई /महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यात
मुंबई /
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती.
त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे विधान केले आहे. ‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’, असे केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
गुंडशाहीवर कारवाई केली जाईल
मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, मराठी भाषेचा अभिमान असणे चुकीचे नाही, पण भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही. भाषेवरुन वाद घालणाऱ्या, मारहाण करणाऱ्या आणि गुंडशाहीवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
“भाषेवरून कोणी मारहाण करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. ज्या प्रकारची घटना घडली आहे, त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि कारावाई केली आहे. यापुढेही अशा प्रकारे भाषेवरून कोणी वाद केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
भारतातील कोणत्याही भाषेवर अशा प्रकारे अन्याय केला जाऊ शकत नाही, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. हे लोक इंग्रजीला जवळ करतात आणि हिंदीवरून वाद करतात. मग हा कोणता विचार आहे? त्यामुळे अशा प्रकारे जे लोक कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


COMMENTS