कोल्हापूर / प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट
कोल्हापूर / प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे बोलताना स्पष्ट केले. कोल्हापूर सर्किट बेंचबाबत आपल्याला परिपूर्ण माहिती आहे, सर्किट बेंच स्थापनेसाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दुपारी विशेष विमानाने कोल्हापूर दाखल झाले. यावेळी कोल्हापूर खंडपीठ कृती समिती व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त शिष्ट मंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची विमानतळावर भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरात खंडपीठ व्हावे, यासाठी प्रदीर्घ काळ लढा सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकार व वकिलांची खंडपीठासाठी आग्रही मागणी आहे. याची आपल्याला माहिती आहे. या संदर्भात आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त शिष्टमंडळामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. घाडगे, ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. प्रशांत चिटणीस उपस्थित होते.
COMMENTS