नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणामध्ये धक्के बसतांना दिसून येत आहे. कारण मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरूवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्
नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणामध्ये धक्के बसतांना दिसून येत आहे. कारण मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरूवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच नितीशकुमार राज्यसभेवर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नितीशकुमार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला, यावेळी त्यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह आणि शिवेश कुमार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित यहर यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीश कुमार यांनी आपल्या निवेदनात आपल्या दीर्घ राजकीय प्रवासाचा उल्लेख करत एक प्रकारची राजकीय भावना व्यक्त केली. संसदीय कारकीर्द सुरू झाल्यापासून विधानमंडळ आणि संसद या दोन्ही पातळ्यांवर काम करण्याची इच्छा होती, असे त्यांनी नमूद केले. राज्यसभेत जाण्याची संधी मिळाल्यास बिहारच्या नव्या सरकारला आपले सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नितीश कुमार यांच्या या निर्णयाने बिहारच्या सत्तासमीकरणांबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीमुळे राज्यातील नेतृत्वाच्या पुढील वाटचालीबद्दल चर्चा रंगू लागली आहे. राजकीय वर्तुळात या पावलाकडे संभाव्य राजकीय बदलाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
नितीश कुमार यांच्या उमेदवारीची बातमी समोर येताच त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली. अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जमले. काहींनी भावनिक प्रतिक्रिया देत नितीश कुमार यांनी बिहार सोडू नये, अशी मागणी केली. काही कार्यकर्ते अश्रूंनी व्याकूळ झाल्याचेही दृश्य पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निर्माण झालेल्या या वातावरणामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. तेथे आलेल्या काही नेत्यांना कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. काही मंत्र्यांना आणि आमदारांना कार्यकर्त्यांनी पुढे जाऊ दिले नाही. घोषणाबाजीही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले. राज्याचे पोलीस महासंचालक विनय कुमार तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान, जनता दलाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते ललन सिंह यांनी सांगितले की, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो पक्षातील सर्वांनी मान्य करणे आवश्यक आहे. नितीश कुमार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीमुळे बिहारच्या राजकीय भवितव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भाजपने बिहारमध्ये महाराष्ट्र मॉडेल लागू केले : तेजस्वी यादव
नितीशकुमारांच्या या निर्णयावर विरोधी पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सत्ताधारी आघाडीवर गंभीर आरोप केले. बिहारमध्ये महाराष्ट्रातील सत्तांतराच्या धर्तीवर राजकारण घडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षांवर दबाव टाकून त्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, असा दावा त्यांनी केला.

COMMENTS