Homeताज्या बातम्यादेश

एकदिवसीय क्रिकेटचा नवा बादशहा कोण होणार ?

क्रिकेट समिक्षक

क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आकडेवारी आणि योगायोगांचा अतिशय मनोरंजक व उत्साहवर्धक खेळ आहे. खेळाडू तेच, मैदानही सारखेच, नियमही तेच परंतु प्रत्ये

भारताच्या हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटणनगरी सज्ज
पै. गणेश जगताप याने माऊली जमदाडे याला गदालोट डावावर केले चितपट

क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आकडेवारी आणि योगायोगांचा अतिशय मनोरंजक व उत्साहवर्धक खेळ आहे. खेळाडू तेच, मैदानही सारखेच, नियमही तेच परंतु प्रत्येक सामन्यातील आकडेवारी वेगवेगळी असते. त्यामुळेच हा खेळ लहान -थोर, अबाल- वृध्द, स्त्री -पुरूष असा कुठलाही भेदभाव न करता संपूर्ण जगभर लोकप्रिय ठरला असून आजच्या युगात विज्ञानाच्या प्रगतीने आपण घर बसल्या जगातील कुठल्याही देशात चाललेल्या क्रिकेट सामन्याचा आस्वाद घेऊ शकतो.

              याच श्रृंखलेचा भाग असलेली आयसीसीची सर्वात मोठी व मानाची विश्वचषक स्पर्धा मागील दिड महिन्यांपासून भारतात सुरू असून येत्या रविवारी १९ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय क्रिकेटचा नवा बादशहा ठरविण्यासाठी जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजेतेपदाचा प्रबळ दावेदार टिम इंडिया व आव्हानवीर ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. हे दोन्ही संघ एकमेकांशी क्रिकेटच्या तीनही प्रारूपातील सामने सातत्याने खेळत असतात. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांची गुणवत्ता व कौशल्य चांगल्या प्रकारे जाणून आहेत. शिवाय आयपीएलच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाचे बरेचसे खेळाडू विविध फ्रँचाईसीजच्या माध्यमातून एकमेकांचे घनिष्ठ मित्रही बनले आहेत. ते सर्व जण एकमेकांचे स्वभावही चांगल्या प्रकारे जाणतात तसेच कच्चे पक्के दुवेही ! त्याचबरोबर भारताची राष्ट्रभाषा हिंदीही बऱ्याचशा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना समजते व बोलताही येते. त्यामुळे मैदानात खेळताना भारतीय खेळाडूंच्या चाली ते सहज ओळखतात तसेच भारतीय खेळाडूनांही ऑस्ट्रेलियन खेळांडूची रणनिती समजण्यात अडचण येत नाही. पक्की व्यावसायीकता नसानसात भिनलेली असल्याने दोन्ही संघातील खेळाडू देशभक्ती व राष्ट्रनिष्ठा यांची कोणतीही गल्लत होऊ न देता आंतरराष्ट्रीय सामन्यात कट्टर प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे वागतात व खेळतातही.

            यापूर्वी झालेल्या एकदिवसीय सामन्यांचा सर्वांगीन विचार केला तर ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा काकणभर सरस आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच वेळा वनडेचा विश्वकरंडक जिंकला आहे. तर भारताने दोनदा विश्वषचक पटकविला आहे. ऑस्ट्रेलियाची ही आठवी तर भारताची चौथी अंतिम फेरी असणार आहे.  या दोन संघात यापूर्वी सन २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना झाला होता त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय मिळवून स्वतःचे तिसरे जेतेपद मिळविले होते. त्याच स्पर्धेत अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १० सामने जिंकले होते तर भारताने आठ. ऑस्ट्रेलियाची त्या कालखंडात क्रिकेट जगतात जबरदस्त दहशत होती. त्यांच्या सोबत खेळणे म्हणजे पराभव निश्चित समजूनच संबधित संघ खेळायचे.

               पण दिवस बदलायला वेळ लागत नाही. भारतात आयपीएल सुरू झाले आणि भारतीय क्रिकेटची आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतावर छाप पडायला सुरुवात झाली. अमाप पैसा व जगभर होणारी प्रसिद्धी बघून जगभरातील नामवंत क्रिकेटपटू इकडे आकर्षित झाले. मग टिम इंडियाची दहशत क्रिकेट जगतात बसायला लागली. एखाद दुसरा अपवाद वगळता आयसीसीच्या स्पर्धात भारत सातत्याने नॉकआऊट फेरीत पोहोचत आला आहे. विद्यमान स्पर्धेत प्रत्येक भारतीय खेळाडू जीवाची बाजी लावून खेळ करत असल्याने संघाची कामगिरीही इतर संघांच्या तुलनेत चढत्या भाजणीनेच होत आहे. समोर येईल त्या संघाचा फडशा पाडत भारताने अंतिम सामन्यापूर्वी खेळलेले सर्व दहा सामने एकतर्फी जिंकले असून कोणताही संघ भारताला हलक्यात घ्यायचे तर सोडाच भारता सोबत सामना होऊ नये म्हणून देवाला साकडे घालत आहेत. सन २००३ च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची जशी कामगिरी होती तशीच भारताची होत आहे तर ऑस्ट्रेलियाची भारतासारखी. जर भारताने यंदाचा करंडक जिंकला तर ते भारताचे तिसरे जेतेपद असून या दोन संघांबाबतचा हा अजब योगायोग असेल.

             भारताची सांघिक कामगिरी हिच टिम इंडियाच्या या स्पर्धेतील यशाचे गमक आहे. सर्व फलंदाज पुर्ण जोशात असून गोलंदाजही आपला दम दाखवत असल्याने प्रतिस्पर्ध्यांना भारतासमोर उभे राहाताना हजार वेळा विचार करावा लागतो. खेळपट्टी कुठलीही असो, नाणेफेकीचा निकाल काहीही असो, प्रथम फलंदाजी असो अथवा गोलंदाजी. भारतीय संघ पूर्ण क्षमतेने खेळत असल्याने परिणामाची पर्वा करत नाहीत व निकाल त्यांच्या अपेक्षेनुरूप लागत गेले. त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. याचाच परिपाक म्हणजे आयसीसीच्या नॉकआऊट सामन्यात मागील दहा वर्ष सातत्याने कच खाणाऱ्या टिम इंडियाने यावेळी कायम त्रासदायक ठरलेल्या न्युझिलंडला उपांत्य फेरीत एकतर्फी लोळवून आपल्या मागील सगळ्या जखमांवर मलमपट्टी केली. भारतीय संघाचं या स्पर्धेत लक्षात आलेलं एक वैशिष्ट असं की, प्रथम फलंदाजी करताना फलंदाज एवढी मोठी धावसंख्या उभारतात की, नंतर गोलंदाजांना त्या धावांचा बचाव करताना कुठलीही अडचण येऊ नये. जर प्रथम गोलंदाजी आली तर भारताचे गोलंदाज प्रतिस्पर्ध्याला स्वस्तात गुंडाळून त्या धावांचा पाठलाग करताना आपल्या फलंदाजांना कोणतीही अडचण येणार नाही याची दखल घेतात.

               आता अंतिम सामन्यात खेळताना पूर्व इतिहास जरी ऑस्ट्रेलियाचा वरचढ असला तर ऑस्ट्रेलियन खेळाडू दडपणाखाली आहेत हे मात्र नक्की. तरीही कांगारू आपली लढवय्या वृत्ती निर्णायक क्षणी अंमलात आणतात हि बाब ध्यानात घेऊन टिम इंडियाने व्यूव्हरचना आखली असेलच. शिवाय एक लाख पस्तीस हजार प्रेक्षकांच्या निल अवताराने स्टेडियम पूर्णतः भारतमय होऊ जाईल तेंव्हा अकरा ऑस्ट्रेलियन खेळाडू नक्कीच बावरलेले दिसतील. त्याच वेळेस टिम इंडियाने योग्य घाव घातल्यास प्रबळ भासणारा प्रतिस्पर्धी गारद होऊ शकतो. त्याचबरोबर सन २००३ मध्ये झालेल्या पराभवाचा वचपाही निघेल आणि विश्वजेतेपदाचे स्वप्नही साकार होईल.

                भारताने मैदानात खेळताना खेळाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करून विश्वकरंडकावर एक हात ठेवला आहे तर अंतिम सामना जिंकून दोन्ही हाताने तो उचलायचा एवढेच काम बाकी ठेवले आहे. मात्र भारताचे हे यश पाकिस्तानातील काही विघ्नसंतोषी लोकांना बघवत नाही. टिम इंडियाचं लक्ष विचलीत करण्यासाठी संघावर, काही खेळाडूंवर वैयक्तिक, तर बीसीसीआयवर आरोप करण्यात येत आहेत. तसे बघाल तर हे सगळे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना त्यांच्या देशातच कवडीचीही किमंत नाही आणि असे भंकस आरोप करण्यामुळे त्यांच्या देशातही त्यांचीच नाचक्की होत आहे.  अशा दृष्टांच्या वाईट नजरेचा त्रास टिम इंडियाला होऊ नये व तमाम भारतीयांचे स्वप्न साकार करण्याचे बळ भारतीय खेळाडूंना देव नक्कीच देईल. अशा अपेक्षेसह टिम इंडियास अनंत कोटी शुभेच्छा देऊया.

लेखक – डॉ.दत्ता विघावे क्रिकेट समिक्षक. इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

COMMENTS