हमारे शहर-ए-अदब में चली हवा क्या है ये कैसा दौर है यारब हमें हुआ क्या है; उसी ने आग लगाई है सारी बस्ती में वही ये पूछ रहा है कि माजरा क्

हमारे शहर-ए-अदब में चली हवा क्या है
ये कैसा दौर है यारब हमें हुआ क्या है;
उसी ने आग लगाई है सारी बस्ती में
वही ये पूछ रहा है कि माजरा क्या है
कवी मन सुर्यापलिकडचे पकडू शकते तसे माणसाच्या डोक्यातील षडयंत्रही शब्दात पकडू शकते! नागपूर हे महानगर खरेतर अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक महानतेच्या स्मृती-स्मारके असणारे महानगर. या महानगराला परवा नजर लागली. शांततेत नांदणारे हे महानगर एकाएकी हलकल्लोळ आणि जाळपोळीच्या स्वाधीन झाले. सकृतदर्शनी याची कारणमीमांसा करताना अनेक गोष्टी नजरेसमोर तराळून जात असल्या तरी, एखादा राजकीय पक्ष सत्ताधारी झाला की, मग त्याला दीर्घकाळ सत्तेवर राहण्याची स्वप्ने सतावतात. केवळ तेवढ्यावरच निभावलं तर, सत्ता संघर्ष त्यात तो कसला? मग, सुरू होते सत्तेच्या सर्वोच्च पदाच्या दिशेने स्वप्नांचा प्रवास! याच प्रवासात उभा राहतो तो म्हणजे पक्षाचा अंतर्गत सत्ता संघर्ष! याचाच परिणाम नागपूर दंगा असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
वास्तविक, ऐरणीवर नसतानाही एका आमदाराने विधीमंडळ सभागृहात औरंगजेबाची स्तुती केली आणि माहौल उभा करायला आयती संधी मिळाली. वास्तविक, अबु आजमी या समाजवादी पक्षाच्या आमदाराला त्यांच्या वक्तव्याची किंमत अधिवेशन संपेपर्यंत निलंबनातून मिळाली होती. तरीही, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांनी औरंगजेबाच्या कबरी संदर्भात घोषणाबाजी करून आंदोलन करण्याची गरज नव्हतीच. या बाबीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील समर्थन नव्हते; हे त्यांनी कालच पत्रकार घेऊन ” सध्या औरंगजेब संयुक्तिक विषय नाही,” असं थेट म्हटले. याचा अर्थ सरळ आहे की, संघाचा या अशांततेशी कोणताही संबंध नाही. नागपूर हे शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रहिवास आणि मतदार संघाचे शहर आहे. त्यामुळे, या शहरात अशांतता पेटावी असं ते करतील असंही वाटतं नाही! परंतु, कधी नव्हे ते नागपूर आगीत होरपळले हे वास्तव मात्र, अमान्य करता येणार नाही.
मुस्लिम समाजाचा सध्या रमजान हा रोजाचा महिना सुरू आहे. या महिन्याला ते आपल्या धार्मिक मान्यतेनुसार पवित्र मानतात. पवित्र मानल्या जाणाऱ्या महिन्यात ते दंगलीचे षडयंत्र करतील यावर विश्वास बसत नाही.
मुळातच, निलेश राणे यांच्या सारख्या मंत्री पदावर असताना धार्मिक चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या घटकांवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे कार्य करावं. त्यांच्या सततच्या चिथावणीखोर वक्तव्याने महाराष्ट्रातील हिंदू समाजही अस्वस्थ झाला आहे. कारण, हिंदू समाज हा कोणाच्या द्वेष करणारा समाज नाही. येथे सर्व माणसे ईश्वराचे लेकरे मानली जातात. त्यामुळे, माणमाणसात हिंदू समाज भेद करित नाही. परंतु, भेद विरहित समाजासाठी बहुजन समाज असणाऱ्या हिंदूची एक मागणी सातत्याने राहिली आहे, ती म्हणजे जातीनिहाय जनगणना. जातीनिहाय जनगणनेतून हिंदू समाजात कोणत्या समुदायाला किती अन्याय झेलावा लागतो, हे स्पष्ट होईल. बहुजनांच्या या मागणीला दाबून टाकण्यासाठी किंबहुना, जनगणना होऊच नये, यासाठी जे डावपेच केले जातात, त्यातच नागपूर दंगलीचे रहस्य कदाचित असावे. दंगलीत कोणत्याही धर्माचा वरचा जात समुदाय कधीही होरपळत नाही, हे वास्तव आहे. बहुजन समाजाचे तरूण यात मात्र नेहमी रगडले जातात.
संघ आणि भाजप यांच्या नेतृत्व निवडीवरून संघर्ष निर्माण झाला आहे, तो बाहेरून दिसत नसला तरी आतून घुमसत आहे. या संघर्षाचा परिणाम काही कृती-व्यवहारांच्या दृष्य पटलावर येतीलच. दंगली या नेहमीच प्लॅन केल्या जातात. त्यात उस्फुर्तता अशी नसतेच. नागपूर दंगल देखील उस्फुर्त म्हणता येणार नाही; तर, थंड डोक्याने झालेल्या या सर्व प्रकाराला जबाबदार नेमकं कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. मुळात, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी औरंगजेब कबरीचे आंदोलन करणे हे चूक होते; तसे सुरूवातीला कुराणाचे आयात असणारा कापड जाळल्याची आणि त्यानंतर थेट कुराण प्रत जाळल्याची अफवा पसरवली गेली. अफवा पसरल्यावर काही मुस्लिम नेते पोलिस प्रशासनाला भेटले. मात्र, पोलिस प्रशासनाने केलेले दुर्लक्ष आणि त्यानंतर निर्माण झालेली स्थिती प्रशासनावर नेमकी कोणाची पकड आहे, यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
COMMENTS