Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकत्रीकरणाच्या चर्चा इतिहास जमा म्हणणारे कुठे गेले?

महाराष्ट्रात सात जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका लागल्या असताना, राज्यसभेवर निवडून जाण्याची कोणतीही स्थिती नसतानाही, शरद पवार यांना राज्यसभेवर पा

भारतातील इंधन गॅस टंचाई : वास्तव की कृत्रिम संकट ?
संजीवनीच्या सीएनजी प्रकल्पामुळे आत्मनिर्भरतेकडे पाऊल : कोल्हे
कर्जतमध्ये गॅसचा सुरळीत पुरवठा
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1-1-1-1.png

महाराष्ट्रात सात जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका लागल्या असताना, राज्यसभेवर निवडून जाण्याची कोणतीही स्थिती नसतानाही, शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याकरता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची मदत घेताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी हे जाहीरपणे विधान केले होते की, आता विलीनीकरणाच्या किंवा एकत्रीकरणाच्या चर्चा थांबलेल्या आहेत. तो भाग इतिहास जमा झालेला आहे; परंतु, या स्थितीला काही दिवस जातात न जातात तोच थेट भूमिकाच बदलल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका आयोगाने जाहीर केल्या आहेत. यातील बारामती या मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र त्यांच्या विरोधात आपण उमेदवार उभा करणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जाहीर करून, काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेला पूर्णपणे १८० च्या कोनामध्ये बदलून टाकलेले आहे. आठ वेळा आमदार आणि सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीमध्ये पोटनिवडणूक आवश्यक झाली आहे. निवडणूक आयोगाने २४ एप्रिल रोजी बारामती (पुणे) आणि राहुरी (अहिल्यानगर) येथील पोटनिवडणुकांची घोषणा केली आणि मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी बारामतीमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या चुलत बहिणी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले. तथापि, नंतरच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी झाल्या. सुनेत्रा पवार यांना ७,३२,३१२ मते मिळाली तर सुप्रिया सुळे यांना ५,७३,९७९ मते मिळाली होती. तथापि, राष्ट्रवादीने नंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवले. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, अजित पवार यांनी बारामतीची जागा त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) चे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर १,००,८९९ मतांनी जिंकली. त्यांना १,८१,१३२ मते मिळाली तर युगेंद्र यांना ८०,२३३ मते मिळाली.राष्ट्रवादी (शपा) बारामती पोटनिवडणूक लढवणार नाही. सुनेत्रा वहिनी यांच्या विरोधात आमचा उमेदवार उभा करणार नाही. राहुरी जागेचा विचार केल्यास, महाविकास आघाडीचे भागीदार या जागेवर चर्चा करतील आणि पुढील काही दिवसांत निर्णय घेतला जाईल,” अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी जाहीर करून सध्याच्या राजकारणातील गोंधळात आणखी वाढ केली आहे. सुनेत्रा पवार सध्या आमदार किंवा एमएलसी नाहीत आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना राज्य विधिमंडळात जागा मिळवणे आवश्यक आहे. 

दरम्यान, लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणे चुकीचं आहे. दादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का? दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे शपथविधी करतात. आजोबा, नातू अधिवेशनाला निघून जातात. मग दुःख फक्त आम्ही करायचे का? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारला. आमच्या ओबीसी समाजाचे आरक्षण एका बाजूला संपवून टाकण्यात आलं आहे. आमचे सर्व प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. अशावेळी अन्यायाला वाचा फोडायला निवडणुकीसारखा दुसरा कोणता पर्याय आहे का? असा सवाल हाके यांनी केला. सुप्रिया सुळे जर प्रोफेशनल राजकारण करत असतील तर आम्हीही तसे करू असंही हाके म्हणाले. बारामतीत जाऊन निवडणुकीसंदर्भात सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. कार्यकर्त्यांसोबत व्यापक बैठक घेऊन निवडणूक लढवायची का आणि कोणी लढवायची याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं. अर्थात, निवडणूका या प्रतिनिधित्वाचा भाग आहेत; अनुकंपाचा नाही, अशी भूमिका घेत प्रा. लक्ष्मण हाके हे निवडणूक रिंगणात उतरतील याची दाट शक्यता मात्र आहे.

COMMENTS