अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरांतील ओढे-नाल्यांचा प्रश्न प्रलंबित असून, हा सभा महापालिकेच्या अर्थसंकल्पयीय सभेत देखील चांगलाच गाजला होता. त्याव
अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरांतील ओढे-नाल्यांचा प्रश्न प्रलंबित असून, हा सभा महापालिकेच्या अर्थसंकल्पयीय सभेत देखील चांगलाच गाजला होता. त्यावेळी ओढे-नाल्यांतील अतिक्रमणावरून नगरसेवकांनी नगररचना विभागाला चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी नगररचनाकार राम चारठाणकर यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवडयाचे चार दिवस संपून देखील अतिक्रमण काढण्यासाठी कोणतीही तयारी नसल्यामुळे आता हा पहिला आठवडा कधी येणार असा सवाल उपस्थित होत आहे.
अहमदनगर शहरातील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या 8 महिन्यांपासून चांगलाच गाजतांना दिसून येत आहे. मात्र महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, नगररचनाकार राम चारठाणकर यांची उदासीन भूमिकेमुळे अद्याप ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण उठू शकलेले नाही. शहरातील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर आहे. सध्या तापमानवाढीचा मोठा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे. तापमान वाढीबरोबरच पाऊस देखील जास्त प्रमाणात कोसळण्याची शक्यता आहे. आणि जर पाऊस मोठया प्रमाणावर झाल्यास शहराची पुरती वाताहात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शहरातील मूळ नैसर्गिक प्रवाहावर अतिक्रमण झाल्यामुळे शहरातील पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही सोयी-सुविधा नाही. त्यामुळे भविष्यात गंभीर धोका निर्माण होवू शकतो. यासंदर्भातील इशारे सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञांनी दिले असतांना देखील, त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणामुळे भविष्यात गंभीर संकटे निर्माण होवू शकतात. महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओढ्या-नाल्यांवरील प्रश्न चांगलाच गाजला होता. शहरातील ओढे-नाल्यांतील अतिक्रमणावरून नगरसेवकांनी नगररचना विभागाला चांगलेच धारेवर धरत जाब विचारला होता. यावर नगररचनाकार राम चारठाणकर म्हणाले, एप्रिलच्या पाहिल्या आठवड्यात पोलिस संरक्षण मिळाले की, अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वस्त केले होते. मात्र एप्रिल महिन्याच्या पहिला आठवडा संपायला काही दिवस उरले असतांना देखील अतिक्रमण काढण्याची मोहीम अजूनही सुरू होण्याची चिन्हे नाहीत.
आयुक्तांनी दिलेले खुलासे नगररचना विभागांनी नाकारले – अहमदनगर शहरातील ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत. कारण ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी दिलेले खुलासे नगररचना विभागांनी नाकारल्याचे दिसून येत आहे. नगररचना विभागाकडून सातत्याने दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत आहे. लेआऊटच्या नकाशांमध्ये नाले बुजवल्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होवू शकते, ज्यामुळे वित्तहानीसोबत जीवितहानी देखील होवू शकते. त्यामुळे शहरातील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि नगररचना विभागाने प्राधान्याने हाती घेण्याची गरज आहे.
COMMENTS