Homeताज्या बातम्यासंपादकीय

ठाकरे गटाचे भवितव्य काय ?

महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी शिवसेना नावाच्या वादळाचा जन्म झाला. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचा पक्ष जेव्हा जन्माला घातला, त

चीनमधील निर्बंध आणि कोरोना उद्रेक
राष्ट्रवादी नेमकी कुणाची ?
तपासयंत्रणांचे छापे

महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी शिवसेना नावाच्या वादळाचा जन्म झाला. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचा पक्ष जेव्हा जन्माला घातला, तेव्हा त्यांचे वर्चस्व, भीती इतकी होती की, त्यांच्यापुढे बंडाची भाषा करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. मात्र बाळासाहेबांच्या उतारवयात अनेकांनी बंड केले. आणि ते इतर पक्षात स्थिरावले. मात्र तरी देखील बाळासाहेबांनी ताठ मानेने राजकारण केले. दिल्लीश्‍वर देखील त्यावेळी मातोश्रीवर यायचे. तो मान, सन्मान, कर्तृत्व बाळासाहेबांनी निर्माण केले होते. तो दबदबा बाळासाहेबांसोबतच संपल्यागत जमा झाला. आज शिवसेना ठाकरे कुटुंबांच्या हातून निसटली असून, ती शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. प्रश्‍न इतक्यावरच संपतो असे नाही. तर यापुढे खरे प्रश्‍न निर्माण होतात. आणि त्यातून उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील, किंवा राजकारणातून कायमचे संपतील, हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर उभे आहेत. आणि त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी राजकारण ठाकरे कुटुंबियांसाठी सोपे नाही. पक्षातील 40 आमदार आणि 13 खासदार बाहेर पडलेले आहेत.

उरलेले आमदार देखील कधी बाहेर पडतील सांगता येत नाही. त्यातच आगामी काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशावेळी कोर्ट-कचेर्‍या करत आपली बाजू मांडायची, की, स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन वाढवायचे, असे अनेक प्रश्‍न ठाकरे यांच्यासमोर उभे आहेत.  महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरचा सर्वात मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात घडला आहे. कधी नव्हे ते 40 आमदार आणि 13 खासदार पक्षाबाहेर पडले. केवळ पक्षाबाहेर पडले नाही, तर भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पद देखील मिळवले. आणि त्यानंतर आम्हीच बहुसंख्य असल्यामुळे त्यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील तो दावा योग्य मानत शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केले. मात्र तरी देखील ठाकरे गटाचे प्रश्‍न संपलेले नाहीत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीनंतर हातातून मशाल चिन्ह देखील जाण्याची शक्यता असतांनाच, दुसरीकडे ठाकरे गटाला मिळालेला वंचित बहुजन आघाडी देखील मित्र देखील त्यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. कारण वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी आपली युती ही ठाकरे गटाशी झाली असून, महाविकास आघाडीसोबत नाही. त्यामुळे ठाकरे गटाने काँगे्रस आणि राष्ट्रवादीची साथ सोडावी अन्यथा आम्ही त्यांची साथ सोडू असे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या हालचालींने वेग घेतला आहे. कारण मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरला असल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशावेळी ठाकरे गटाची चहुबाजूंनी होणारी कोंडी ठाकरे गटाचे खच्चीकरण करतांना दिसून येत आहे. एकतर ठाकरे गटाने शरण यावे, किंवा त्यांचे नामोनिशाण राहू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हातातून गेल्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोग असो की, भाजपचे नेते, यांच्यावर एकही जहरी टीका करण्याची संधी ते सोडत नाही. त्यांच्या टीकेतून संताप व्यक्त होतांना दिसून येत आहे. मात्र राजकीय लढाई आक्रमक होऊन कधीच लढायची नसते. तर डोकं शांत ठेऊन आगामी रणनीती आखायची असते. आणि त्या शत्रूला नामोहरम करायचे असते. मात्र याला गाडल्याशिवाय राहणार नाही, चोर, असा संताप उद्धव ठाकरेंनी सोडून देणेच त्यांच्या हिताचे ठरणारे आहे. आणि आगामी लढा लढण्यासाठी शांत आणि थंड डोक्याने पुढील रणनीती आखावी लागणार आहे. निसर्गाच्या नियमांप्रमाणे बदल हा मानवाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे व्यक्ती असो वा, संघटना ती जन्मभर जशी जिंकू शकत नाही, तसाच तिचा पराभव देखील होणारच असतो. त्यामुळे आजची परिस्थिती ठाकरे गटाची नेहमीच राहणार नाही. त्यात उद्या बदल असेल, दिलासा असेल. त्यामुळे उद्याची संधी सोडायची नसेल, तर आज शांत राहणे आवश्यक आहे. अन्यथा उरला-सुरल्या पक्षाचा शेवट होण्यास वेळ लागणार नाही.

COMMENTS