कोलकाता ः पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चानंतर भाजपने ब
कोलकाता ः पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चानंतर भाजपने बुधवारी 12 तासांच्या बंगाल बंदची हाक दिली आहे. बुधवारी भाजपसह विविध संघटनांनी पुकारलेल्या बंददरम्यान अनेकठिकाणी भाजप समर्थक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बंगालमधील उत्तर दिनाजपूरमध्ये भाजपाच्या बंगाल बंददरम्यान जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचवेळी मुर्शिदाबादमध्ये भाजपा समर्थकांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
भाटपारा येथे बंगाल बंददरम्यान भाजपच्या नेत्यावर गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. भाटपारा येथील भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्या कारवर सहा राऊंड गोळीबार करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे. या गोळीबारात कारमधून प्रवास करणारा भाजप समर्थक जखमी झाला. भाजप समर्थकाचे नाव रवी सिंह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देतांना भाजप नेते प्रियंगू पांडे म्हणाले की, तृणमूल काँगे्रसच्या सुमारे 50-60 लोकांनी रस्ता रोखला आणि वाहन थांबवले आणि जमावाकडून 6-7 राउंड फायर केले गेले आणि 7-8 बॉम्ब फेकले गेले. चालकासह दोघांना गोळ्या लागल्या. एक गंभीर आहे. नादिया आणि मंगलबारी चौरंगी येथेही भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दुकाने बंद करण्यासाठी आलेल्या भाजप समर्थकांवर टीएमसी समर्थकांनी लाठीहल्ला केला. बाणगाव आणि बारासत दक्षिणेत गाड्या थांबवण्यात आल्या. कूचबिहारमध्ये सरकारी बस चालक हेल्मेट घालून गाडी चालवताना दिसले. दरम्यान, बंगाल बंदमुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त आहे. राजधानी कोलकातामध्ये सकाळपासूनच रस्त्यांवर गर्दी कमी आहे. रस्त्यांवर फार कमी बसेस, रिक्षा, टॅक्सी दिसतात. खासगी वाहनांची संख्याही कमी आहे. मात्र, बाजारपेठा आणि दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू आहेत पण बहुतांश खासगी कार्यालयांमध्ये कर्मचार्यांची उपस्थिती खूपच कमी आहे, कारण त्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.
आरोपींना फक्त फाशीची शिक्षा ः ममता बॅनर्जी – भाजपच्या बंगाल बंद दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल छात्र परिषदेच्या 27 व्या स्थापना दिनानिमित्त भाषण केले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या घटनेवर ममता म्हणाल्या, ’पुढच्या आठवड्यात आम्ही विधानसभेचे अधिवेशन बोलवू आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी 10 दिवसांत विधेयक मंजूर करू. आम्ही हे विधेयक राज्यपालांकडे पाठवू. त्यांनी विधेयक मंजूर न केल्यास आम्ही राजभवनाबाहेर आंदोलन करू. या वेळी राज्यपाल जबाबदारीतून सुटू शकत नाहीत.
भाजपकडून बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न – भाजपच्या बंगाल बंद दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्हाला प्रशिक्षणार्थी डॉक्टरासाठी न्याय हवा आहे, पण भाजपने आज बंद पुकारला आहे. त्यांना न्याय नको आहे, ते फक्त बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
COMMENTS