अहमदनगर : नगर शहरातील बाजारपेठांमधील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी अहमदनगर व्यापारी महासंघाने मार्च महिन्यात उपोषण व आंदोलन केले
अहमदनगर : नगर शहरातील बाजारपेठांमधील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी अहमदनगर व्यापारी महासंघाने मार्च महिन्यात उपोषण व आंदोलन केले होते. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी लेखी आश्वासन देऊनही अतिक्रमणाचा प्रश्न सुटलेला नसल्याने व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची राहुरी येथे संपर्क कार्यालयात भेट घेवून नेवेदन दिले. यावेळी मंत्री तनपुरे यांनी व्यापारी शिष्ठमंडळाच्या सर्व मागण्या व परिस्थिती समजून घेतली. तातडीने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना संपर्क करून अतिक्रमण करणाऱ्यांवर काय कारवाई केली याबाबत चौकशी करून चर्चा केली. लवकरच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांची एकत्रित बैठक नगरमध्ये घेवून बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांना सहकार्य करू असे आश्वासन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिले.
व्यापारी शिष्ठमंडळाचे नेतृत्व भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले. यावेळी जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, अहमदनगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, बजरंग दलचे कुणाल भंडारी, ओमप्रकाश बायड, सागर पेठकर, अभिमन्यू जाधव, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी किथानी, प्रतीक बोगावत, सौरभ भांडेकर, ऋषी येवलेकर, संतोष ठाकूर, विजय आहेर, कुणाल नारंग, अमित नवलनी आदी व्यापारी उपस्थित होते. मंत्री तनपुरे यांच्याशी चर्चा करताना वसंत लोढा म्हणाले, नगरची बाजारपेठ ही शहराची शान आहे. या बाजारपेठेमुळे नगरचे नाव जगात पोहोचले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमांच्या विळख्यात ही बाजारपेठ सापडली आहे. त्यामुळे सर्व व्यापारीवर्ग आंदोलन करीत असून मनापा प्रशासन कोणतेही सहकार्य करीत नाहीये. उलट अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. या प्रश्नात तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी त्यांनी केली. सुहास मुळे म्हणाले, जागरूक नागरिक मंचाने व्यापारीवर्गाने सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा दिला आहे. बाजारपेठेतील व्यापारी प्रामाणिकपणे सर्वप्रकारचे कर भरूनही त्यांना सुविधा मिळत नाहीये. प्रत्येक दुकानासमोर होत असलेल्या अतिक्रमणांचा त्रास व्यापारीवर्गा बरोबरच सर्व नागरिक व महिलांना होत आहे. ईश्वर बोरा म्हणाले, कापडबाजार, मोचीगल्ली, शहाजीरोड या महत्वाच्या बाजारपेठेत होत असलेल्या अतिक्रमणा विरोधात सर्व व्यापारी आक्रमक होत एकजुटीने आंदोलन करीत आहेत. मनपा आयुक्तांनी लेखी आश्वासन देवूनही आपली भूमिका बदलली आहे. नो हॉकर्स झोन असूनही या बाजारपेठेमध्ये पुन्हा मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमण मुक्त बाजारपेठ होण्यासाठी व्यापारी वर्गाला सहकार्य करावे अशी मागणी केली.
COMMENTS