Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरसेवक वाचवण्यासाठीच शिंदेंना साथ ः राजू पाटील

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तास्थापन संदर्भातील घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीनंतर, आता मनसेच

राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
शिंदे गटाच्या दसरा मेळावा खर्चाची होणार चौकशी
शिवसेना कुणाची होणार लवकरच फैसला निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तास्थापन संदर्भातील घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीनंतर, आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे-शिंदेसेना युतीवर अप्रत्यक्ष टीका करत राज ठाकरेंनी अशा राजकारणामुळे शिसारी येते अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर राजू पाटील यांनी युतीमागील वास्तव मांडत, हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून पूर्णतः पक्षहितासाठी घेतल्याचा दावा केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने संयुक्तपणे निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत अनपेक्षित वळण आले. भाजपला बाजूला ठेवत शिंदे गटाने मनसेसोबत हातमिळवणी केली. मनसेचे पाच नगरसेवक आणि शिंदे गटाचे संख्याबळ याच्या जोरावर महापौरपदावर दावा करण्यात आला. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. या पार्श्‍वभूमीवर 23 जानेवारी रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर कठोर शब्दांत टीका केली. आज माणसांचा लिलाव सुरू असल्याची भावना व्यक्त करत, हिंदुत्त्वाचाही बाजार मांडला जात असल्याची खंत त्यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसे-शिंदेसेना युतीबाबत पक्षात अस्वस्थता असल्याचे संकेत मिळाले. मात्र या टीकेनंतर राजू पाटील यांनी आपली बाजू मांडताना वेगळाच दृष्टिकोन समोर आणला. भाजपकडून मनसेच्या नगरसेवकांवर संपर्क साधण्याचे आणि त्यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. दबाव, आमिष किंवा राजकीय अस्थैर्याच्या माध्यमातून नगरसेवक फोडले जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच आपण तातडीने निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या पक्षाचे नगरसेवक सुरक्षित राहावेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, हीच माझी भूमिका होती, असे त्यांनी ठामपणे सांगितले. एकूणच, कल्याण-डोंबिवलीतील मनसे-शिंदेसेना युती ही राजकीय गरज आणि सावधगिरीतून झाल्याचे राजू पाटील यांचे म्हणणे आहे. मात्र राज ठाकरेंच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे या युतीभोवतीचे राजकारण अधिक तापले असून, आगामी काळात मनसेची नेमकी भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चौकट———
राज ठाकरेंना आधीच दिली होती माहिती
आपण घेतलेला निर्णय हा पूर्णतः पक्षहिताचा असून याबाबत राज ठाकरे यांना आधीच माहिती दिली होती, असा दावाही राजू पाटील यांनी केला. मी जे केलं ते माझ्या साहेबांना सांगितलं होतं. माझा हेतू स्वच्छ होता. इतरांच्या टीकेने माझ्या भूमिकेत बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

COMMENTS