नाशिक प्रतिनिधी - चांदवड तालुक्यातील काळखोडे ते वाहेगांवसाळ या दरम्यान जलजीवन मिशनअंतर्गत चालू असलेल्या पाईपलाईनचे काम हे निकृष्ट दर्जाचे हो
नाशिक प्रतिनिधी – चांदवड तालुक्यातील काळखोडे ते वाहेगांवसाळ या दरम्यान जलजीवन मिशनअंतर्गत चालू असलेल्या पाईपलाईनचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वाहेगावसाळ ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी करत हे काम बंद पाडले. कामाबाबत असंख्य तक्रारी आल्याने जिल्हा परिषद ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला पाईपलाईन काढण्यास सांगितले आहे.
नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी “हर घर जल’ ही जलजीवन मिशन योजना मे 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून ही कामे पूर्ण केली जात आहेत.
योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी सुशिक्षित बेरोजगार, ठेकेदार यांना अनुभव नसतानाही कामे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ही योजना दीर्घकालीन तसेच मोठ्या निधीची असल्याने या सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना कोणताही अनुभव नसल्याने योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
चांदवड तालुक्यातील काळखोडे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वाहेगावसाळ वरुन पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने एक मीटर खोदकाम करणे आवश्यक असताना लवकर काम करण्यासाठी एक ते दीड फुटच पाईपलाईन खोदली, तीही रस्त्याच्या अगदी जवळून साईडपट्टीत खोदली. काही ठिकाणी डांबरी रस्ता जेसीबीने उखडून टाकला. पाईपलाईन रस्ता सोडून दोन ते तीन मीटर बाहेर करणे आवश्यक असते. मात्र ठेकेदाराने रस्त्याच्या लगतच खोदकाम केल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला.
त्यामुळे परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त करत हे काम बंद पाडले. या कामाच्या बाबतीत तक्रारी वाढल्याने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अभियंता महाजन यांनी पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामासाठी नव्वद लाख अंदाज पत्रकीय रक्कम मंजूर आहे.
संबंधित ठेकेदाराने वाहेगांवसाळ ते काळखोडे रस्त्याचे संपूर्ण नुकसान केले. साईडपट्टीतच पाईपलाईन खोदून रस्त्यावर माती टाकली. रस्ता उखडून ठेवला. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रस्ता पूर्ववत करावा. उपसरपंच व नागरिक, वाहेगांवसाळ यांनी अधिक माहिती दिली
COMMENTS