सोलापूर : खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर 3 मार्च रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे नित्योपचार आणि दर्शन व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात

सोलापूर : खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर 3 मार्च रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे नित्योपचार आणि दर्शन व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. शास्त्रोक्त नियमांनुसार ग्रहणकाळात काही धार्मिक विधींमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. त्यानुसार सायंकाळी 6.34 ते 6.48 या कालावधीत श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेसह सर्व देवतांचे दर्शन बंद ठेवण्यात येईल.
पंचांगानुसार ग्रहणाचा स्पर्श सायंकाळी 6.34 वाजता होणार असून मोक्ष 6.48 वाजता आहे. पंढरपूर येथे सूर्यास्तही त्याच सुमारास होत असल्याने या कालावधीत ग्रहणनियमांचे पालन केले जाणार आहे. ग्रहणाच्या दिवशी पहाटे 4.00 ते 5.55 या वेळेत काकड आरती व नित्यपूजा नेहमीप्रमाणे पार पडतील. सकाळी 10.45 ते 11.00 या वेळेत महानैवेद्याचा कार्यक्रम होईल; मात्र पारंपरिक नैवेद्याऐवजी सुकामेवा अर्पण केला जाईल. दुपारी 4.30 ते 5.00 या वेळेत होणार्या नैवेद्यातही लाडूऐवजी सुकामेव्याचा समावेश असेल. ग्रहण स्पर्शानंतर श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी माता तसेच मंदिरातील आणि परिसरातील सर्व परिवार देवतांना चंद्रभागा नदी येथील पाण्याने स्नान घालण्यात येईल. ग्रहण मोक्षानंतर पुन्हा स्नान व शुद्धीकरण विधी पूर्ण केले जातील. त्यानंतर रात्री 9.30 वाजता धुपारती आणि मध्यरात्रीनंतर शेजारती नेहमीच्या वेळापत्रकानुसार होणार आहे. ग्रहणकाळातील या बदलांची भाविकांनी नोंद घ्यावी आणि दर्शनासाठी नियोजन करताना सुधारित वेळापत्रक लक्षात ठेवावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

COMMENTS