नांदेड : गावांचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत स्वच्छता ही केवळ शासकीय योजनांमधून साध्य होत नाही, तर ती लोकसहभागातूनच प्रभावीपणे राबविता येते. त्याम

नांदेड : गावांचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत स्वच्छता ही केवळ शासकीय योजनांमधून साध्य होत नाही, तर ती लोकसहभागातूनच प्रभावीपणे राबविता येते. त्यामुळे स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी संबंधित कर्मचार्यांनी पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.
नांदेड येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत स्वच्छता कर्मचार्यांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मेघना कावली यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डॉ. प्रवीणकुमार घुले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता शिंदे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार आदी उपस्थित होते. मेघना कावली पुढे म्हणाल्या की, स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी उजळणी प्रशिक्षण अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रशिक्षणातून कर्मचारी अधिक प्रेरित होऊन कार्यक्षमता वाढवतील आणि गावपातळीवर ठोस परिणाम दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांनी सांगितले की, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 हा अंतिम टप्प्यात असून या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड व क्षमता बांधणी तज्ञ चैतन्य तांदूळकर यांनी स्वच्छता उपक्रमांची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी स्वच्छता कर्मचार्यांच्या लसीकरण व आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी जनावरांच्या मलमूत्र व वैरण व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई यांनी जलप्रदूषण व स्वच्छता कर्मचार्यांची भूमिका यावर सादरीकरण केले. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील ग्रामपंचायत अधिकारी एकनाथ कदम यांनी गावातील स्वच्छता उपक्रमांचा अनुभव कथन करून उपस्थितांना प्रेरित केले. या कार्यशाळेस तालुका स्तरावरील कनिष्ठ अभियंते, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील अधिकारी, तज्ञ व सल्लागार तसेच तालुका व समूह समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुशील मानवतकर यांनी केले.

COMMENTS