आज दसरा. सिंधू संस्कृतीत शेतीशी निगडित असलेल्या समाजाचा शेतीच्या हंगामाविषयी आनंद उत्सव साजरा करणाऱ्या या महोत्सवाला, देशातील सर्व जातीधर्माच्या
आज दसरा. सिंधू संस्कृतीत शेतीशी निगडित असलेल्या समाजाचा शेतीच्या हंगामाविषयी आनंद उत्सव साजरा करणाऱ्या या महोत्सवाला, देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी आपला एक सांस्कृतिक महोत्सव वेगवेगळ्या कारणांनी मानलेला आहे! देशामध्ये सर्वाधिक आख्यायिका देखील याच महोत्सवाविषयी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दसरा हा महोत्सव भारतीय समाजाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, ही बाब निश्चितपणे यातून अधोरेखित होते. खरेतर सिंधू संस्कृतीमध्ये शेती करणाऱ्या समाजाचा हा उत्सव, नऊ दिवस चालायचा. याचे कारण, स्त्री जशी नऊ महिन्यानंतर प्रसूत होऊन, एक नवनिर्माण होते; त्याप्रमाणेच स्त्रीने आपल्या कल्पकतेने शेतीमध्ये बीज पेरल्यास त्याचे पुनर्निमान होते, ही संकल्पना केली आणि त्यावर अंमलबजावणी केली. त्यामुळे नऊ दिवस प्रती शेतीचा किंवा तांत्रिक शेतीचा हा महोत्सव आज देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. ही बाब आम्ही यापूर्वीही लिहिली आहे. परंतु, आज या महोत्सवाचे महत्त्व एवढे मोठे आहे की, देशातल्या प्रत्येक समाजाचा घटक दसरा किंवा विजयादशमी या उत्सवाशी आपल्याला सांस्कृतिक दृष्ट्या जोडून घेणे अधिक महत्त्वपूर्ण मानतो. त्यामुळेच, जर आपण पाहिलं तर, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा उत्सव म्हणून शेतीचा हा उत्सव आहे. गुजरात मध्ये गरबा उत्सव म्हणून हा उत्सव साजरा होतो. त्याप्रमाणेच महाराष्ट्रात देखील हा उत्सव वेगवेगळ्या संस्कृती आपला वेगवेगळा दावा करून साजरा करतात. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये दसरा मेळावा, ही बाब आपण शिवसेनेच्या स्थापनेपासून पाहतो. या मेळाव्याचं महत्त्व इतका आहे की, आज शिवसेनेमध्ये जे गट पडले आहेत किंवा शिवसेनेमधून फुटून जे इतर पक्ष निर्माण झाले आहेत, त्या सगळ्या पक्षांकडून याच दिवशी मेळावे घेतले जातात. अर्थात, दसरा मेळावा म्हणून शिवसेनेचा शिवाजी पार्कवर होणारा मेळावा, हा नेहमीच ऐतिहासिक राहिला आहे. शिवसेनेतील फुटीच्या दृष्टीने तो याही वेळी महत्त्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर नगरीमध्ये एकमेकांच्या विरोधातल्या दोन सांस्कृतिक समाजामध्ये हा महोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा या महोत्सवाच्या निमित्ताने शस्त्र पूजा करतो आणि संचलनही करतात. त्यांच्या या शस्त्रपूजा समारोहावर यापूर्वी अनेक आक्षेप घेतले गेले आहेत. ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात अनेक वेळा आपली जाहीर मते व्यक्त केली आहेत. देशांमध्ये संविधानानंतर शस्त्र पूजा कशी केली जाऊ शकते? ज्या शस्त्रांवर रीतसर कायद्याने बंदी असते, ते कसे पूजले जाऊ शकतात, हा प्रश्न त्यांनी आपल्या वक्तव्यातून वारंवार पुढे आणला आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी म्हणून हा महोत्सव आपल्या ऐतिहासिक विजयाचे प्रतीक म्हणून सम्राट अशोकांनी हा महोत्सव साजरा केला आणि तीच परंपरा नागपूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा सुरू केली. आज त्याच नगरीत सम्राट अशोक यांचा पुतळाही बसवण्यात आला. याच महोत्सवाच्या संदर्भात महात्मा फुले यांनी बळीराजा ही संकल्पना ऐतिहासिकदृष्ट्या मांडून त्यांनी शेती आणि समाज हे भारतीय समाजाचे अनन्यसाधारण नाते कसे आहे, हे या देशात बिंबवले. त्यामुळे आपल्या विजयाचा, शेतीच्या हंगामाचा आणि एकंदरीतच सर्व समाज या उत्सवाला आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याचा, जो वेगवेगळ्या कार्यक्रम करते, तो खरेतर या देशातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे, असे आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल! विजयादशमी किंवा दसरा हा महोत्सव समग्र भारतीयांच्या वैविध्यचे प्रतिनिधित्व करणारा आणि सर्वच या महोत्सवाशी आपले सांस्कृतिक नाते जोडून घेणार असल्यामुळे, भारतातील हा सर्वोच्च किंवा सर्वाधिक मोठा ऐतिहासिक उत्सव आहे, याविषयी कोणाच्या मनात तीळमात्र शंका असता कामा नये.
COMMENTS