पाटण / प्रतिनिधी : कोविड लसीकरणाबाबत भिती व वैद्यकीय सेवेबद्दल गैरसमज असलेल्या कातकरी समाजातील लोकांचे लसीकरण करणे आव्हानात्मक असताना पाटणमधील सा
पाटण / प्रतिनिधी : कोविड लसीकरणाबाबत भिती व वैद्यकीय सेवेबद्दल गैरसमज असलेल्या कातकरी समाजातील लोकांचे लसीकरण करणे आव्हानात्मक असताना पाटणमधील सामाजिक बांधिलकी जोपासणारे पत्रकार विक्रांत कांबळे, नितीन खैरमोडे व आशा सेविका सुनंदा गायकवाड यांनी कातकरी बांधवामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करून त्यांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले, ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केले.
पाटण येथील कातकरी वस्तीमध्ये कोविड लसीकरणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रमेश पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रमोद खराडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगरसेविका संगीता जाधव, पत्रकार निलेश साळुंखे, तलाठी जयेश शिरोडे, अमित जाधव,आशासेविका सुनंदा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका अद्याप टळला नाही. राज्यातील मंदीरे व शाळा सुरू झाल्यानंतर व दसरा दिवाळीच्या सणाला खरेदी गाठीभेटी व लोकांचे स्थलांतर आदी कारणाने शासन पातळीवर अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी मिशन कवच कुंडल योजना सुरू केली आहे. शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. याचा भाग म्हणून पाटणमधील कातकरी समाजाचे लसिकरण होणे गरजेचे होते. वैद्यकीय सेवा व उपचार पासुन अलिप्त असलेल्या भटक्या लोकांचे लसीकरण करणे जिकरीचं होते. यासाठी आरोग्य कर्मचारी गेली अनेक महिने लसीकरणासाठी प्रयत्न करत होते. शेवटी पाटण येथील पत्रकार विक्रांत कांबळे व नितीन खैरमोडे व आशा सेविका गायकवाड यांनी प्रत्यक्षपणे कातकरी वस्तीत जावून लसीकरणाबाबत प्रबोधन करत महत्व पटवुन दिले. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांच्या सहकार्याने कोविड लसीकरण करण्यात आले. त्याला कातकरी समाजातील लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. याप्रसंगी आरोग्य विभाग, नगरपंचायत, महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS