Homeताज्या बातम्यादेश

अमेरिकेची सर्व देशांना रशियन तेल खरेदीची परवानगी

नवी दिल्ली : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर झाला असून कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढून शंभर डॉलरच्या पुढे

शेतकरी, बेरोजगारी अन् बीडच्या विकासावर खा.सोनवणेंनी संसदेत उठविला आवाज; लोकसभा अध्यक्षाविरूध्द आलेल्या अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थही केले मुद्देसूद भाषण
गॅसटंचाईचे संकट आणि सरकारची कसोटी
महाराष्ट्राची आर्थिक अधिक सक्षम : मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर झाला असून कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढून शंभर डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर तेलाचा पुरवठा वाढवून दरांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने अमेरिकेने इतर देशांना समुद्रात अडकून पडलेले रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली आहे.
अमेरिकेच्या अर्थ खात्याने यासंदर्भात विशेष परवाना जारी केला आहे. त्यानुसार 12 मार्चच्या मध्यरात्रीपूर्वी जहाजांवर चढवलेले रशियन कच्चे तेल आणि त्यापासून तयार होणारी पेट्रोलियम उत्पादने खरेदी-विक्री करण्यास तात्पुरती मुभा देण्यात आली आहे. ही सवलत 11 एप्रिलपर्यंत लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऊर्जा बाजारात निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे दर अनियंत्रित होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकन प्रशासनाने स्पष्ट केले. या परवानगीचा उद्देश केवळ मार्गात असलेल्या तेलाचा व्यवहार सुलभ करणे इतकाच असून त्यातून रशियाला मोठा आर्थिक लाभ होणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. कारण रशियाच्या महसुलाचा मोठा भाग तेल उत्पादनावर आकारल्या जाणार्‍या करातून मिळतो. भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या प्रश्‍नावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत कोणत्याही देशाच्या परवानगीवर अवलंबून नसून राष्ट्रीय हित लक्षात घेऊनच ऊर्जा खरेदीचे निर्णय घेतो, असे अधिकार्‍यांनी नमूद केले आहे. सध्या रशियातून कच्चे तेल घेऊन निघालेली अनेक टँकर जहाजे आशियाई देशांच्या समुद्रसीमेच्या आसपास प्रतीक्षेत असल्याचेही समोर आले आहे.

COMMENTS