केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने चार फेब्रुवारी रोजी जाहीर केलेली नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षा 2026 ची अधिसूचना केवळ परीक्

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने चार फेब्रुवारी रोजी जाहीर केलेली नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षा 2026 ची अधिसूचना केवळ परीक्षेची तारीख व अर्ज प्रक्रियेपुरती मर्यादित नाही, तर ती देशातील प्रशासकीय यंत्रणेच्या भविष्यासंदर्भात महत्त्वाचे संकेत देणारी ठरते. विशेषतः सेवेत असताना पुन्हा पुन्हा नागरी सेवा परीक्षा देण्यास घातलेली मर्यादा हा या अधिसूचनेतील सर्वांत चर्चेचा आणि वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. या बदलामुळे प्रशासनात गुणवत्ता वाढेल की तरुण उमेदवारांच्या संधी संकुचित होतील, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा किंवा भारतीय वन सेवा यामध्ये निवड झाल्यानंतरही अनेक अधिकारी पुन्हा नागरी सेवा परीक्षा देत असत. यामागे उच्च सेवेत जाण्याची महत्त्वाकांक्षा, सेवावाटपातील बदल किंवा स्वतःच्या क्षमतेला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची इच्छा असे विविध हेतू असत. मात्र या प्रक्रियेमुळे परीक्षेतील स्पर्धा असमतोल होत असल्याची टीका दीर्घकाळ होत होती. अनुभवी अधिकारी आणि पहिल्यांदा परीक्षा देणारे तरुण उमेदवार यांच्यातील स्पर्धा समान राहात नाही, असा आक्षेप सातत्याने मांडला जात होता. नव्या नियमानुसार, मागील निकालात भारतीय प्रशासकीय सेवा किंवा भारतीय परराष्ट्र सेवा यामध्ये नियुक्ती झालेला आणि त्या सेवेचा सदस्य म्हणून कार्यरत राहिलेला उमेदवार 2026 च्या नागरी सेवा परीक्षेस पात्र राहणार नाही. तसेच भारतीय पोलीस सेवेत आधीच निवड झालेल्या उमेदवाराला पुन्हा त्याच सेवेत जाण्यासाठी 2026 च्या निकालाच्या आधारे संधी दिली जाणार नाही. यामध्ये स्पष्टपणे ‘एक सेवा – एक संधी’ हा विचार पुढे आणलेला दिसतो. तसेच, 2025 किंवा त्यापूर्वीच्या कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊन सेवेत असलेल्या उमेदवारांना 2026 किंवा 2027 या वर्षी फक्त एकदाच नागरी सेवा परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. ही संधीही सेवेतून राजीनामा न देता देण्यात येणार आहे. मात्र 2028 किंवा त्यानंतर परीक्षा द्यायची असल्यास, संबंधित उमेदवाराला आधी आपल्या सेवेतून राजीनामा देणे बंधनकारक असेल. या निर्णयामागे आयोगाचा प्रमुख हेतू म्हणजे प्रशासनिक स्थैर्य राखणे. वारंवार परीक्षा देण्यासाठी अधिकारी प्रशिक्षणात व्यत्यय आणतात, सेवेत पूर्ण लक्ष देत नाहीत, अशी टीका अनेकदा पुढे आली आहे. प्रशिक्षण पूर्ण न करता किंवा नियुक्त सेवेत रुजू न होता दुसर्या सेवेच्या प्रतीक्षेत राहणे, यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता कमी होते, असा आयोगाचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. याशिवाय, एकाच उमेदवाराला अनेक संधी मिळाल्यामुळे इतर पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना समाजात निर्माण झाली होती. देशात लाखो तरुण दरवर्षी नागरी सेवा परीक्षेची तयारी करतात. त्यांच्यासाठी प्रत्येक जागा, प्रत्येक संधी अत्यंत महत्त्वाची असते. अशा वेळी आधीच निवड झालेल्या उमेदवाराने पुन्हा संधी घेणे हे स्पर्धेच्या न्याय्यतेला बाधा आणते, असा युक्तिवाद बळकट ठरतो. मात्र या बदलांचा दुसरा पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक उमेदवार पहिल्याच प्रयत्नात निवड होऊनही आपली खरी क्षमता दुसर्या सेवेसाठी योग्य असल्याचे मानतात. ग्रामीण भागातून आलेले, मर्यादित संसाधनांतून तयारी करणारे उमेदवार अनेकदा पहिल्या यशानंतर अधिक चांगल्या सेवेसाठी प्रयत्न करण्याचे स्वप्न पाहतात. नव्या नियमांमुळे ही दारे अंशतः बंद झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. विशेषतः भारतीय पोलीस सेवा किंवा भारतीय वन सेवा यांसारख्या सेवांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी हा निर्णय मानसिक दबाव वाढवणारा ठरू शकतो. आता मिळालेलीच सेवा स्वीकारावी लागेल ही सक्ती काहींना अन्यायकारक वाटू शकते. नव्या नियमांमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिल्यास दोन्ही सेवांचे वाटप रद्द होण्याची तरतूद. यामुळे ‘सेवा मिळवूनही रुजू न होण्याची’ प्रवृत्ती रोखण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतो. नागरी सेवा ही केवळ प्रतिष्ठेची संधी नसून ती देशसेवेची जबाबदारी आहे, हा संदेश आयोगाने ठामपणे दिला आहे. 24 मे 2026 रोजी पूर्व परीक्षा आणि 21 ऑगस्ट 2026 पासून मुख्य परीक्षा होणार असल्याचे आधीच जाहीर झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनी केवळ अभ्यासावरच नव्हे, तर नव्या नियमांच्या अचूक समजुतीवरही भर देणे आवश्यक आहे. कोणत्या वर्षी परीक्षा द्यायची, सेवेतून राजीनामा द्यायचा की नाही, याचा विचार आता अधिक काळजीपूर्वक करावा लागणार आहे. एकूणच, नागरी सेवा परीक्षेतील हे नवे नियम प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता आणि संधींचे समतोल वितरण यासाठी उचललेले पाऊल असल्याचे दिसते. मात्र त्याची अंमलबजावणी करताना उमेदवारांच्या मानसिकतेचा, सामाजिक पार्श्वभूमीचा आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार होणे तितकेच आवश्यक आहे. प्रशासन मजबूत करण्यासाठी घेतलेले निर्णय लोकाभिमुख आणि न्याय्य ठरले, तरच ते खर्या अर्थाने देशाच्या हिताचे ठरतील. नागरी सेवा ही केवळ परीक्षा नसून राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया आहे, हे विसरता कामा नये.

COMMENTS