भारतीय शिक्षणव्यवस्था ही केवळ पदव्या देणारी यंत्रणा नसून समाजरचनेवर दूरगामी परिणाम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कोणतेह

भारतीय शिक्षणव्यवस्था ही केवळ पदव्या देणारी यंत्रणा नसून समाजरचनेवर दूरगामी परिणाम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कोणतेही धोरणात्मक बदल हे केवळ प्रशासकीय सोयीपुरते मर्यादित न राहता सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक मूल्यांच्या कसोटीवर तपासले जाणे आवश्यक ठरते. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अधिसूचित केलेल्या नवीन नियम 2026 संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली तात्पुरती स्थगिती ही याच व्यापक चिंतेची दखल घेणारी आहे. यूजीसी नियम 2026 जाहीर होताच देशभरात त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेषतः सामान्य श्रेणीतील उमेदवारांवर अन्याय होतो, हा आरोप केंद्रस्थानी होता. विविध याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या नियमांच्या अंमलबजावणीला स्थगिती देत 2012 मधील नियम पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे स्पष्ट केले. हा निर्णय केवळ तात्कालिक दिलासा देणारा नसून, शिक्षणधोरणातील दिशादर्शक ठरण्याची क्षमता त्यात आहे.
मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने व्यक्त केलेली चिंता अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जातविरहित समाजाच्या दिशेने चाललो आहोत की उलट दिशेने? हा सवाल केवळ न्यायालयीन टिप्पणी नसून, संपूर्ण समाजाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा आहे. सामाजिक न्यायाच्या नावाखाली जर नव्या प्रकारचे अन्याय निर्माण होत असतील, तर त्याचा पुनर्विचार होणे अपरिहार्य ठरते. भारतीय राज्यघटना दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देण्याची मुभा देते, मात्र त्याच वेळी समान संधी आणि गुणवत्तेच्या तत्त्वालाही तेवढेच महत्त्व देते. यूजीसी नियम 2026 मध्ये या दोन मूल्यांमधील समतोल साधण्यात अपयश आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. नियमांतील अस्पष्टता, अंमलबजावणीतील संभाव्य गैरवापर आणि निवड प्रक्रियेत निर्माण होणारी असमतोल परिस्थिती, याबाबत न्यायालयाने व्यक्त केलेली शंका दुर्लक्षित करता येणार नाही. शिक्षणतज्ज्ञांचे मत असे आहे की उच्च शिक्षण संस्थांमधील नियुक्त्या, पदोन्नती किंवा प्रवेश प्रक्रिया या केवळ आरक्षणाच्या चौकटीत न पाहता, गुणवत्ता, पारदर्शकता आणि संस्थात्मक स्वायत्तता या निकषांवर आधारित असाव्यात. अन्यथा शिक्षणसंस्थाच सामाजिक संघर्षांचे केंद्र बनण्याचा धोका निर्माण होतो. यूजीसी नियम 2026 विरोधातील असंतोष याच भीतीचे प्रतिबिंब आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निर्णयप्रक्रियेतील सहभागाचा अभाव. अनेक सामाजिक संघटना आणि शैक्षणिक संस्थांनी असा आक्षेप घेतला आहे की नियम अंतिम करण्यापूर्वी व्यापक चर्चा, सल्लामसलत आणि तज्ज्ञांचे मत पुरेशा प्रमाणात घेतले गेले नाही. धोरणे वरून लादली गेली, अशी भावना निर्माण झाली, तर ती अंमलबजावणीच्या टप्प्यावरच अपयशी ठरण्याची शक्यता अधिक असते. न्यायालयाने केंद्र सरकार आणि यूजीसीकडून सविस्तर उत्तर मागवून तसेच तज्ज्ञांची विशेष समिती नेमण्याचा पर्याय खुला ठेवून, संवादाचा मार्ग सुचवला आहे. हा दृष्टिकोन स्वागतार्ह आहे. शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर न्यायालयीन आदेश अंतिम उत्तर देऊ शकत नाहीत; ते केवळ प्रक्रियेला योग्य दिशा देऊ शकतात. धोरणात्मक सुधारणा करताना सामाजिक वास्तव, आकडेवारी, घटनात्मक चौकट आणि भविष्यातील परिणाम यांचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. यूजीसी कायदा 1956 आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत ठरणार्या तरतुदी असल्याचा आरोप हा गंभीर आहे. जर नियम कायद्याच्या चौकटीत बसत नसतील, तर त्यांचा पुनर्विचार करणे ही सरकारची जबाबदारी आहे. केवळ न्यायालयीन हस्तक्षेपाची वाट पाहणे, हे धोरणात्मक अपयशाचे लक्षण ठरेल. या पार्श्वभूमीवर, शिक्षण धोरणातील सुधारणांचा उद्देश स्पष्ट असायला हवा-समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करणे आणि त्याच वेळी गुणवत्तेचा र्हास होऊ न देणे. या दोन टोकांमध्ये समतोल साधणे कठीण असले, तरी अशक्य नाही. मात्र त्यासाठी स्पष्ट नियम, पारदर्शक अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण पुनरावलोकन आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रातील धोरणांवर नव्याने विचार करण्याची संधी देतो. तो सरकार, यूजीसी, शिक्षणतज्ज्ञ आणि समाज यांच्यातील संवादाचा प्रारंभबिंदू ठरायला हवा. अन्यथा प्रत्येक सुधारणा न्यायालयाच्या पायर्यांवरच अडकून राहील आणि शिक्षणव्यवस्थेतील अस्थिरता वाढत जाईल. 19 मार्च रोजी होणारी पुढील सुनावणी केवळ कायदेशीर निकालापुरती मर्यादित न राहता, व्यापक सामाजिक संदेश देणारी ठरेल, अशी अपेक्षा आहे. शिक्षण हे संघर्षाचे नव्हे, तर समन्वयाचे माध्यम बनावे-हीच अपेक्षा या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे. नियम बदलले जातील की सुधारले जातील, हे काळ ठरवेल; मात्र या प्रक्रियेत संविधानिक मूल्ये, सामाजिक समतोल आणि शिक्षणाची गुणवत्ता अबाधित राहिली पाहिजे, हेच खरे आव्हान आहे.

COMMENTS