Homeताज्या बातम्यासंपादकीय

उध्दव ठाकरे : पुरोगामी गुण चिकटलेला नेता !

विचारांचा कोणताही बदल न करता, थेट पुरोगामी ठरवले जाऊन जनतेच्या सहानुभूतीला पात्र ठरलेले उध्दव ठाकरे, हे महाराष्ट्रातील बदललेल्या राजकारणाचे सर्वा

आरक्षण आंदोलनातील न्यायतंत्र हरवले !
माध्यान्ह भोजनातून विषबाधा, कॅग कडाडले!
असली बेबंदशाही ओबीसी खपवून घेणार नाही ! 

विचारांचा कोणताही बदल न करता, थेट पुरोगामी ठरवले जाऊन जनतेच्या सहानुभूतीला पात्र ठरलेले उध्दव ठाकरे, हे महाराष्ट्रातील बदललेल्या राजकारणाचे सर्वात मोठे बळी तर ठरलेच; पण, तितकेच ताकदवर होऊन त्यांनी महाराष्ट्राचे राजकारणात आपले ठळक अस्तित्व उभे केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून सेना-भाजप युती तुटली. अर्थात, यात केवळ मुख्यमंत्री पदाचाच वाद होता असे नव्हे; तर, २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांच्याशी केलेल्या वर्तन-व्यवहाराची किनार होती. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील उत्तरार्धाच्या काळात शिवसेनेत सतत फूट पडत गेली. छगनराव भुजबळ यांच्या नंतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडल्याचे दोषारोप सर्वाधिक उध्दव ठाकरे यांच्यावर केले होते. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच उध्दव ठाकरे यांनी पक्षावर पकड जमवली होती, हे स्पष्ट होते. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी एकदा उध्दव ठाकरे यांच्या विषयी वक्तव्य करताना ‘मैत्रीला न जागणारा माणूस वर्णन केले होते. शिवसेनेत जेवढेही आमदार किंवा खासदार झाले हे पक्षाच्या भूमिकेमुळे झाले, हे मान्य केले तरी त्या लढाऊ आणि संघटक नेत्यांचे स्वतः चे योगदान ही मोठे होते व आहे, हे अमान्य करून चालणार नाही. असो.‌ शिवसेनेचा इतिहास आपल्याला पहायचा नाही; तर, वर्तमान राजकारणात उध्दव ठाकरे यांचे स्थान काय, हा खरा मुद्दा आहे. तसं पाहिलं तर कोणताही अनुभव नसताना ते तीन पक्षांच्या आघाडी चे मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्री पदाच्या काळात, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य माजी मुख्यमंत्री असलेले नेते ही होते. खरे तर, उद्धव ठाकरे यांनी आपल्या विचारात कोणताही बदल केलेला नव्हता; परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी केलेले व्यवहार हे त्यांच्या मतभेदाचे कारण होते. महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्ता जायला नको, अशी भावना होती. केवळ त्या एकमेव कारणाने उद्धव ठाकरे यांना पुरोगामी हा गुण चिकटला! परंतु, त्यांना पुरोगामी ठरवल्यानंतर त्यांनीही आपल्याला त्या साच्यात ओतून घेण्याचे काम मात्र व्यवस्थित केले. त्यामुळे एका बाजूला त्यांना आपला हिंदुत्ववाद जोपासत असतानाच, ज्या शिवसेनेत ओबीसींच प्राबल्य आहे, त्यामध्ये आंबेडकरवादी दलितांना घेणं हे देखील त्यांचे एक महत्वपूर्ण पाऊल ठरत गेले. सुषमा अंधारे यांना पक्षात घेऊन त्यांनी एकाच वेळी पुरोगामी असणं आणि आंबेडकरवादी भूमीकेचा स्वीकार करण्याचे आपल्या व्यवहारातून दाखवून दिले. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत त्यांनी थेट युतीचा हात पुढे केला होता. याची परिणती म्हणजे पुरोगामी पक्षांच्या आघाडीत जाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाही पुरोगामी जनतेने उद्धव ठाकरे यांच्यावर अधिक विश्वास दाखवला. त्याचा परिणाम संपूर्ण पक्ष लयाला जाऊनही उद्धव ठाकरे हे फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊन, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ही राजकारणामध्ये ठळक व्यक्तिमत्व होऊन पुढे आले. काळाच्या संदर्भामध्ये त्यांनी आपले विचार बदलले असं मानलं तरी, अजूनही त्यांना बऱ्याच व्यवहारांची सिद्धता करावी लागेल. अर्थात, सत्तेवर आल्यानंतर त्यांना आपल्या आजोबांच्या विचारसरणीवर काम करायला निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता बाध्य करेल. परंतु, जर ते वरवरचे पुरोगामी ठरत असतील, तर, निश्चितपणे तसं काम त्यांच्याकडून होईल की नाही ही शक्यता आपण आजच वर्तवण्यात अर्थ नाही! कारण, अडीच वर्षे त्यांचा मुख्यमंत्री पदाचा काळ हा खूप निर्णयांचा काळ नसला तरी, जनतेला तो सुसह्य वाटला; कारण २०१४ ते २०१९ या फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात, महाराष्ट्रात एक प्रकारे पोलीस राज अवतरले होते. त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या सत्ता काळात शिथिलता किंवा पोलिसांची दंडूककेशाही कमी झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे मुख्यमंत्री पदावर असणे आवडले होते. येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा ते विराजमान होतील, असा अंदाज महाराष्ट्रातील निम्म्या जनतेला आता वाटू लागला आहे.

COMMENTS