पुणे : भरदिवसा सोसायटीतील बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरणार्या महिलांना चतु:शृंगी पोलिसांनी गजाआड केले. बाणेर रस्त्यावरील सिंध सोसायटीत महिला
पुणे : भरदिवसा सोसायटीतील बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरणार्या महिलांना चतु:शृंगी पोलिसांनी गजाआड केले. बाणेर रस्त्यावरील सिंध सोसायटीत महिलांनी 66 लाखांची घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून पाऊण किलो सोन्याचे दागिने, दीड किलो चांदी असा 43 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
खुशबू दिलीप गुप्ता उर्फ खुशबू कठाळू काळे (वय 19, रा. जालना), अनू पवन आव्हाड उर्फ अनू राहुल भोसले (वय 26, रा. बीड) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
बाणेर रस्त्यावरील सिंध सोसायटीत 11 डिसेंबर 2022 रोजी घरफोडी झाली होती. सदनिकेतून चोरट्यांनी 66 लाख रुपयांचा ऐवज लांबविला होता. या गुन्ह्याचा तपास चतु:शृंगी पोलिसांच्या पथकाकडून करण्यात येत होता. सिंध सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात महिलांनी घरफोडीचा गुन्हा केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी घरफोडी करणार्या सराईत महिलांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. खुशबू काळे आणि अनू आव्हाड यांनी अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक आणि पथकाने तपास सुरू केला. आरोपी महिला या बीड आणि जालन्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी महिला सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करायच्या. खिडकीची लोखंडी जाळी कापून अल्पवयीन मुलाच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
COMMENTS