अहमदनगर/प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ असलेल्या कातरवाडी येथील थम्सअप सुळक्यावरून (हडबीची शेंडी अर्थात अंगठ्याचा डोंगर) खाली पडून मयूर दत्तात्र
अहमदनगर/प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ असलेल्या कातरवाडी येथील थम्सअप सुळक्यावरून (हडबीची शेंडी अर्थात अंगठ्याचा डोंगर) खाली पडून मयूर दत्तात्रेय म्हस्के (24) व अनिल शिवाजी वाघ (34, रा. सावेडी, नगर) या नगरमधील दोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी चांदवड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनमाड येथील हडबीचा शेंडी डोंगर प्रसिद्ध आहे. अंगठ्याच्या आकाराच्या या दगडी सुळक्यावर चढाई करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते. पण या सुळक्याचे दगड ठिसूळ असल्याने येथे चढाई टाळण्याचे आवाहन नेहमीच तज्ज्ञ गिर्यारोहकांकडून केले जाते. या पार्श्वभूमीवर नगरच्या इंद्रप्रस्थ गुप्रच्या 15 ट्रेकर्सने (गिर्यारोहक) या सुळक्यावर यशस्वी चढाई केली व नंतर यापैकी 12जण सुख़रूप खालीही उतरले. पण ही मोहीम संपत असताना तीन ट्रेकर्स कड्यावरून खाली कोसळले. त्यात दोघांचा मृत्यू झाला व एकजण जखमी झाला. बुधवारी सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेचे वृत्त रात्रीच सोशल मिडियावरून नगर शहर व जिल्ह्यात पसरल्यावर हळहळ व्यक्त करण्यात आली. अनिल वाघ व मयुर म्हस्के हे मामा-भाचे असल्याने या दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
याबाबतची माहिती अशी की, नगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपचे गिर्यारोहक आठ दिवसांच्या ट्रेकींग मोहिमेसाठी गेले होते. हा ग्रुप गिर्यारोहणाच्या धाडसी मोहिमा नेहमी आयोजित करीत असतो. भावी पिढीमध्ये गिर्यारोहणाची आवड रुजावी म्हणून गडकिल्ल्यांवर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यावर त्यांचा भर असतो. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या अशा मोहिमा सुरू असतात. बुधवारी (2 फेब्रुवारी) या ग्रुपतर्फे 8 मुली आणि 7 मुले असे 15 जणांचे पथक आठ दिवसांच्या ट्रेकिंग मोहिमेवर होते. मनमाडजवळच्या हडबीची शेंडी (थम्पअप-अंगठ्या डोंगर) येथून त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. दुपारी त्यांनी या सुळक्यावर चढाई सुरू केली. सर्वजण हा दगडी डोंगर चढून वर गेले. अंगठ्याच्या आकाराच्याया सुळक्यावर त्यांनी यशस्वी चढाई केली. यासाठी खिळ्यांच्या सहाय्याने रोप-वे (दोर) बांधण्यात आला होता. त्यावरून सर्वजण वर गेल्यावर मोहीम यशस्वी झाल्याच्या आनंदात जल्लोष करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी डोंगर उतरण्यास सुरुवात केली. पथकातील सर्वजण रोप-वेच्या मदतीने खाली उतरले. या ग्रुपचे पट्टीचे ट्रेकर अशी ओळख असलेले मयूर दत्तात्रेय म्हस्के (24) व अनिल शिवाजी वाघ (34) या मामा-भाच्याच्या जोडीवर रोप-वेची जबाबदारी होती. त्यामुळे ते सर्वांत शेवटी होते व त्यांच्या समवेत मदतीला प्रशांत पवार होते. खाली उतरताना ते रोप-वेचे खिळे काढून घेत असताना एका ठिकाणी त्यांचा अंदाज चुकला आणि म्हस्के, वाघ व पवार हे तिघेही एका सुळक्यावरून खाली पडले व मयुर म्हस्के आणि अनिल वाघ यांचा मृत्यू झाला व पवार जखमी झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यावर नगरहून त्यांचे अन्य सहकारी बुधवारी रात्रीच मदतीसाठी रवाना झाले. अहमदनगर येथील अन्य गिर्यारोहकांनी त्यांना डोंगरावरून खाली आणण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. तिघांनाही मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वाघ व म्हस्के या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर पवार याच्यावर उपचार सुरू आहेत.
हातवार्यांनी ग्रामस्थ अस्वस्थ
समवेत असलेले तिघेजण थम्पअप शेंडीवरून पडल्याचे पाहून त्यांच्यासोबत असलेल्यांनी आक्रोश आणि आरडाओरडा केला. मात्र, या डोंगराची उंची जास्त असल्यामुळे खाली कातरवाडी गावात त्यांचा आवाज पोहचू शकला नाही. मात्र, त्यांचे हातवारे पाहून काही तरी अघटित घडल्याची जाणीव ग्रामस्थांना झाली आणि संघरत्न संसारे, तुषार बिडगर, अमोल झाल्टे, प्रवीण संसारे, राजेंद्र गांगुर्डे, संतोष झाल्टे, तेजस ढोणे, कल्पेश सरोदे, दत्तात्रय झाल्टे, ऋषी गुंजाळ, किरण झाल्टे, विजय संसारे आदी तरुणांनी डोंगरावर जाऊन दोघांचे मृतदेह खाली आणले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण प्रचंड घाबरले होते. कातरवाडीच्या ग्रामस्थांनी धीर देत सर्वांना गावातील मंदिरात आणले.
COMMENTS