एर्नाकुलम/वृत्तसंस्था ः अनेकदा जीपीएसवर डोळे झाकून विश्वास ठेवत प्रवास केला जातो, मात्र हाच विश्वास दोन डॉक्टरांच्या जीवावर बेतल्याचे समोर आले
एर्नाकुलम/वृत्तसंस्था ः अनेकदा जीपीएसवर डोळे झाकून विश्वास ठेवत प्रवास केला जातो, मात्र हाच विश्वास दोन डॉक्टरांच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. जीपीएसने दाखवलेल्या रस्त्याने कार घेऊन गेल्याने दोन डॉक्टरांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे यातील एका डॉक्टरचा त्याच दिवशी वाढदिवस होता.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथरुथ येथील ही घटना आहे. रविवारी रात्री 12.30च्या दरम्यान ही घटना घडली. या दुर्घटनेत डॉ. अद्वैत आणि डॉ. अजमल आसिफ यांचा मृत्यू झाला आहे. डॉ. अद्वैत यांचा रविवारी वाढदिवसही होता. डॉ. अद्वैत चार मित्रांसह कोचीहून कोडुंगल्लूरला वाढदिवसाच्या खरेदीसाठी गेले होते. तेथून परतताना रात्री मुसळधार पाऊस आणि अंधार असल्याने योग्य रस्ता दाखवण्यासाठी त्यांनी जीपीएसचा आधार घेतला. मात्र जीपीएस त्यांना मृत्यूचा मार्ग दाखवत आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. जीपीएसच्या सूचनेनुसार ते सरळ चालत राहिले. मात्र एका जागी जीपीएसने त्यांना जो रस्ता दाखवला तो रस्ता थेट नदीत जात होता. मात्र जीपीएसच्या सूचनेनुसार कार नेल्याने कार थेट नदीत बुडाली. कारमधून तीन जण कसेबसे बाहेर पडले. मात्र डॉ. अद्वैत आणि डॉ. अजमल आसिफ यांना बाहेर निघणे शक्य झाले नाही. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. मात्र या घटनेत नेमकी मानवी चूक होती की तांत्रिक चूक होती, याबाबत आताच स्पष्ट सांगता येणार नाही.
पावसाळ्यात जीपीएस वापरणे धोक्याचे – खरंतर पावसाळ्यात ओळखीचा रस्त्यानेच प्रवास करायला हवा, अन्यथा जवळच्या कोणत्यातरी व्यक्तीकडून माहिती घेवूनच पुढील प्रवास करायला हवा. कारण पावसाळ्यात, जीपीएस अल्गोरिदम ड्रायव्हर्सना कमी रहदारी असलेल्या रस्त्यांचा मार्ग दाखवतात. परंतु ते रस्ते सुरक्षित असतातच असे नाही. पावसात रात्रीच्या वेळी जीपीएस सिग्नलमध्ये लॉस्ट होतात, त्यामुळे रस्ताही वेगळा दाखवला जाऊ शकतो. अशावेळी नेहमीच्या रस्त्याने जाणे कधीही सोयीचे ठरु शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
COMMENTS