अंतरिक्षात गेली जवळपास 300 दिवस वास्तव्य करीत असलेले सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं वास्तव्य अंतरिक्षात आठ दिवसापेक्षा अधिक होणार नव्हते;

अंतरिक्षात गेली जवळपास 300 दिवस वास्तव्य करीत असलेले सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं वास्तव्य अंतरिक्षात आठ दिवसापेक्षा अधिक होणार नव्हते; परंतु जो बायडेन यांनी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या पृथ्वीवर परत येण्याच्या मोहिमेत विलंब केला; तो जाणीवपूर्वक होता. त्यामध्ये बायडेन प्रशासनापेक्षा त्यांना अधिक प्रसिद्धी मिळेल, हे टाळण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला, असा आरोप अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार तथा उद्योगपती एलन मस्क यांनी केला आहे. याच्यामागे जो बायडेन यांचा फक्त राजकीय डावपेच होता; असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अर्थात, अमेरिकेसारख्या महासत्तेला अशा प्रकारच्या निर्णयातून नेमकं काय साध्य करायचं असेल, यावर मात्र ट्रम्प आणि मस्क दोघेही प्रकाश पाडत नाहीत. अमेरिका ही जगाची महासत्ता असताना आणि दुसऱ्या बाजूला चीन हा देश जागतिक महासत्तेच्या रांगेत प्रथम क्रमांकावर येऊ पाहत असताना, अमेरिका अशा प्रकारचा निर्णय का घेईल? याची तर्क संगत वस्तुस्थिती मात्र त्यांच्या विधानातून दिसत नाही. कारण सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांचे अंतरिक्षात दीर्घकाळ राहणे म्हणजे, अमेरिकेच्या तंत्रज्ञानाची विफलता आहे! किंबहुना, त्यांना इतक्या दीर्घकाळ त्यात यश येत नसेल तर, जगाच्या दृष्टीने ती नामुष्कीची बाब अमेरिकेसाठी ठरू शकेल. हे महासत्तेच्या सत्ताधाऱ्यांना न कळण्याइतपत त्यांचे राजकारण दूधखुळे निश्चितच नाही; हे आपण मानायला हवे. अलीकडच्या काळामध्ये जगभरातच राजकीय सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक नवा पैलू समोर येतो आहे की, आपल्या मनाला वाटेल तशी विधाने करून लोकांमध्ये एक प्रकारे थ्रिलिंग निर्माण करावी. जेणेकरून लोकांची विचार करण्याची प्रक्रिया अन्य दिशेकडे वळते आणि सत्ताधाऱ्यांना जनहिताच्या कामापासून जनतेचे लक्ष विचलित करून जनतेला संभ्रमित ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करता येते. जेणेकरून जनता ही भलत्याच गोष्टींवर विचार करायला लागते. त्यावर चर्चा करते आणि त्यावर चर्वित चवर्ण केल्यासारखं, जनता आपल्या हक्काच्या विषयांवर विचार करणे सोडून देते. नेमकं हेच उद्दिष्ट अलीकडच्या राजकीय सत्ताधाऱ्यांचं एक सूत्र बनलेले आहे. तेच सूत्र डोनाल्ड ट्रम्प हे प्रत्यक्षात बोलत आहेत. त्यांना मस्क सारखा अतिशय सकारात्मक उद्योगपती असलेले व्यक्तिमत्व दुजोरा देते, हे धक्कादायक आहे. बायडेन यांनी अंतराळवीरांना “सोडून” दिल्याचा ट्रम्पचा सोशल मीडियावरील दावा असूनही, विल्यम्स आणि विल्मोर यांनी नाकारला आहे. त्यांनी अडकल्याची भावना नाकारली. “आम्हाला सोडून दिल्यासारखे वाटत नाही, आम्हाला अडकल्यासारखे वाटत नाही, आम्हाला अडकवल्यासारखेही वाटत नाही,” “आम्हाला अपेक्षेपेक्षा थोडा जास्त काळ रहावे लागले आहे, एवढंच”, अस विल्यम्स आणि विल्मोर यांनी म्हटले आहे. अर्थात, विल्यम्स आणि विल्मोर ट्रम्प आणि मस्क यांचा दावा खोटा ठरवून त्यांच्यासाठी धोका निर्माण घेताहेत का? यावर देखील आपल्याला विचार करायला हवा. कारण, यापुढे, किमान ४ वर्ष ट्रम्प आणि मस्क हे सत्तेच्या केंद्रस्थानी राहतील. असे असताना त्यांचा दावा आकाशात अधांतरी वावरत असलेल्या अवकाशवीरांनी नाकारणे ही साहसिक बाब आहे. या उलट, एलन मस्क त्यांच्या उद्योगाची विश्वासार्हता धोक्यात आणत आहेत. त्यांच्या मते जो बायडेन हे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या पुढे आपल्याला जाता येत नव्हते. हे जर खरे असेल तर व्यवसायात लागणाऱ्या सचोटीचे काय, असा प्रश्न साहजिकच निर्माण हो तो. कारण, सध्यातरी अवकाशातील यात्रेकरूंना पृथ्वीवर परत आणण्याचा व्यवसाय एलान मस्क यांचा आहे.
COMMENTS