Homeताज्या बातम्यासंपादकीय

खरा न्याय जनतेच्या दरबारातच …

राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका समोर आली आहे. पक्षात बंड झाल्यानंतर अजित पवारांनी थेट पक्ष

सत्ता संघर्षांचा तिढा आणि घटनात्मक पेच
सरकारची दुहेरी कोंडी
अमली पदार्थ आणि महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका समोर आली आहे. पक्षात बंड झाल्यानंतर अजित पवारांनी थेट पक्ष आणि चिन्हावरच दावा सांगितल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. खरंतर या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी कुठेही आकंड-तांडव केला नाही, किंवा आपल्या सहकार्‍यांना कुठेही गद्दार, दगा दिला असा शब्दप्रयोग केला नाही. उलट त्यांनी आपल्या सहकार्‍यांवर टीका करण्याऐवजी पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्याचबरोबर आपले सहकारी तिकडे गेल्यामुळे आपल्याला त्यांच्या भविष्याची चिंता असल्याचे वक्तव्य पवारांनी केले. यामागील वास्तव बघितल्यास, पवारांची गुगली असल्याचे बोलले जात आहे. मात्र पवारांनी ही गुगली नसून रॉबरी असल्याचे म्हटले आहे. मात्र पवार या प्रसंगाला ज्या धीरोदत्तपणे सामौरे जात आहेत, त्याचबरोबर कायदेशीर, विधिमंडळ प्रक्रिया ज्या वेगाने राबवत आहे, त्यातून शरद पवार हार मानणार्‍यातील नाहीत, हेच यातून स्पष्ट होत आहे. अजित पवारांसोबत काही आमदार गेले असते, तर काही नवल वाटले नसते. मात्र शरद पवारांचे पाठीराखे म्हणवले जाणारे, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ ही जुनी-जाणती मंडळी, या बंडामध्ये सहभागी झाल्यामुळे पक्षाला मोठा झटका बसला आहे. मात्र असे झटके, असे पेचप्रसंग पवारांना हाताळण्याची सवय आहे. त्यामुळे या बंडाला पवारांची फूस नसल्याचे दिसून येत आहे. मात्र शेवटी पक्षाला वाचवण्यासाठी आगामी काळात शरद पवार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणारे आहे. शिवसेना देखील याच पेचप्रसंगातून गेली आहे. मात्र पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी लगेच आपली तलवार म्यान करत, राजीनामा देणे पसंद केले. तसेच आपल्याच सहकार्‍यांविषयी आक्रस्ताळेपणा, आकंड-तांडव, संजय राऊतांचे महाराष्ट्रात परत आल्यास मुडदे पडतील, ही भाषा कालच्या बंडानंतर ना शरद पवारांनी वापरली, ना सुप्रिया सुळेंनी ना, जयंत पाटील यांनी. याउलट माझा जनतेवर विश्‍वास असून, जनतेमध्ये जावून आम्ही कौल मागणार, असे पवारांनी स्पष्ट केले. खरंतर अजित पवारांना नेमका किती आमदारांचा पाठिंबा आहे, त्यांचे बंड वैध आहे का, विधानसभा सभापती काय निर्णय घेतात, यावर बर्‍याच काही बाबी अवलंबून आहेत. शिवाय भाजप आणि शिंदे गटाचे सरकार सत्तेत असतांना, त्यांना अजित पवारांच्या गटाची गरज का भासली, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. ज्या राष्ट्रवादी काँगे्रसवर देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचाराचे, सिंचन घोटाळ्याचे आरोप करतात, त्याच पक्षाला काही तासांनंतर सोबत घेतले जाते, किती हा विरोधाभास आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे पानीपत होतांना दिसून येत आहे. मात्र खरा निकाल जनतेच्या दरबारातच लागणार आहे. या बंडखोरांना जनता स्वीकारते की, त्यांना नाकारते, याचा फैसला आगामी निवडणुकांच्या वेळीच होणार यात शंका नाही. महाविकास आघाडीतून जरी अजित पवार बाहेर पडले असले तरी, आघाडीने मित्रपक्षांची मोट बांधण्याची गरज आहे. यात वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांना सामावून घेण्याची गरज आहे, तरच महाविकास आघाडी अजूनही मजबुतीने वाटचाल करू शकते. कारण जनतेच्या दरबारात न्याय होणारच असतो. एकेकाळी इंदिरा गांधींना सपाटून पराभव पत्कारावा लागला होता, त्यामुळे जनतेच्या दरबाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काल अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर सर्वसामान्यांचा व्यक्त होणारा रोष याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मतदान, मतदार याची काही किंमतच राहिली नसल्याचा मतदारांचा रोष व्यक्त होत होता. त्यामुळे याची किंमत आगामी निवडणुकांमध्ये बंडखोरांना मोजावी लागेल, यात शंकाच नाही.

COMMENTS